एक ध्येयवेडा अवलिया माणूस (मॅन ऑन अ मिशन!) : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे

एक ध्येयवेडा अवलिया माणूस (मॅन ऑन अ मिशन!) : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे

Saturday August 26, 2017,

15 min Read

तुकाराम मुंढे यांच्या कहाणीचा हा भाग दुसरा. आपले कर्तव्य पार पाडताना ज्यांनी कुणाचीही तमा बाळगली नाही असे हे अधिकारी. २००५ च्या तुकडीतील सनदी अधिकारी जे सध्या पुणे परिवहन सेवेचे मुख्याधिकारी आहेत. गेल्या बारा वर्षात मुंढे यांच्या नऊ वेळा बदल्या झाल्या आहेत याचे कारण त्यांची बेधडक पणे काम करण्याची पध्दत जे आपण पहिल्या भागात पाहिले.


image


सोलापूर भाग-२ : ‘माझ्या जीवनातील दुसरा कठीण निर्णय'.

जून- जुलैच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक वारकरी पंढरीच्या वारीला जातात. सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या तीरी हे तीर्थक्षेत्र आहे. २०१२ मध्ये एका ट्रक खाली मोठ्या प्रमाणात भाविक चिरडले गेले, एका जमावाने त्यांच्या शवासहीत रास्ता रोको केला आणि मागणी केली की जिल्हाधिकारी यांनी त्यांना भेटावे. त्यामुळे मुंढे यांना तेथे जावे लागले आणि गर्दीला त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोवर त्यांचे धार्मिक प्रमुख सांगत नाहीत तोवर प्रेतांना तेथून दूर करण्यास गर्दीने नकार दिला. तोवर गर्दी वाढत जावून हजारभर माणसे तेथे जमली होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्थानिक वारकरी नेत्यांशी चर्चा झाली त्यात त्यांनी मागणी केली की प्रशासनाने ट्रक चालकाला त्यांच्या ताब्यात द्यावे. ज्यावेळी ही घटना घडली तो दिवस राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. त्यामुळे जिल्ह्याचे सारे प्रमुख अधिकारी मुंढे यांच्यासह तेथे हजर होते. त्यांनी कठोर कारवाईचा इशारा दिल्यावर मात्र लोकांनी प्रेत हलविण्याची तयारी दर्शवली. मात्र मुंढे यांनी ही प्रेते रुग्णालयात नेण्याचे आदेश देताच जमावाने दगडफेक सुरु केली. त्यात पाच सहा पोलिस शिपायांना इजा झाली.

स्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसत होती, जमाव पाच हजारांच्या आसपास झाला होता. मुंढे त्या जमावाच्या दिशेने गेले कारण त्यांना माहिती होते की ते जर पळू लागले तर लोक प्रत्यक्षात पकडून हल्ला करतील. अधिकारी त्यांना दूर जायला सांगत होते मात्र तेवढ्यात जमावाने हल्ला केला. मुंढे म्हणाले “आम्ही मग सक्रीय झालो. हे सारे अर्धा तासात झाले. आम्हाला वाटले की सारे मारले जावू. आम्ही मोठ्या प्रमाणात पोलिस आणि राखीव पोलिस बोलावू शकलो असतो, मात्र त्याला दोन तास वेळ लागला असता. बातम्या आल्या की, अधिवेशन सोडून मंत्री घटनास्थळी येत आहेत.”

साडेसहा वाजता मुंढे यांना जाणवले की फारकाळ अश्या प्रकारे दबावाखाली ते राहू शकत नाही आणि गर्दीचा जाच सहन करू शकत नाहीत. थोडासा विचार करून त्यांनी आदेश दिला “ गोळीबार करा” त्यामुळे सारे चक्रावले. धडक कृती दलाने जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशाची वाट पाहिली. मुंढे म्हणाले की ते जिल्हाधिकारी म्हणून जे काही होईल त्याला जबाबदार आहेत. त्यानंतर मिनिटाभरात जमाव पांगला. या गोळीबारात तीन जण दगावले, सात वाजेपर्यंत सारे काही सुरळीत झाले. मंत्री साडे आठ वाजता घटनास्थळी आले, त्यांच्या मागोमाग औरंगाबादहून जिल्हा पोलिस महानिरिक्षक आणि उपमुख्यमंत्री देखील पोहोचले. मुंढे आणि त्यांच्या सहकारी अधिका-यांनी दुस-या दिवशी पहाटे पाचला घटनेचा अहवाल सादर केला आणि सरकारला पाठवला कारण अधिवेशन सुरू होते. मुंढे म्हणतात की, ही दुसरी सत्वपरिक्षा घेणारी वेळ होती ज्यावेळी मला सामान्य लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश द्यावे लागले. लाखो वारकरींच्या सोईसाठी मला असे करण्याशिवाय पर्यायच नव्हता. कारण त्यांच्या जीवीताला आणि मालमत्ताना हानी झाली असती. या घटनेच्या दोन बाजू आहेत मात्र अशावेळी त्या पाहता येत नाहीत ( ट्रक चालक मुस्लिम होता,) त्यामुळे सामाजिकदृष्ट्या तणाव होता, दुसरे स्थानिक पोलिसांच्या बाबतीत लोकांत असंतोष होता आणि काही काळाबाजार करणारे लोक जे माझ्या विरोधात होते त्यांना स्थिती खराब करायची होती.” हे फारच सोपे होते की माघार घेवून प्रकरण मार्गी लागले असते. मात्र अशा वेळी धेर्य आणि संयमाची परिक्षा असते.” ते म्हणाले.

मुंढे यांचा विश्वास आहे की जे कुणी सार्वजनिक क्षेत्रावर टीका करतात, की येथे हाजी हाजी चालते त्यांना येथील मुलभूत गोष्टीच माहिती नसतात. लोकांच्या शक्तीचा वापर करत मुंढे यांनी ३३०० किमीचे पाणंद रस्ते (दोन शेतातून जाणारे रस्ते) सा-या जिल्ह्यात तयार केले जे नोव्हे. २०११ आणि मार्च २०१२ दरम्यान लोकांच्या सहभागातून शक्य झाले त्यातून सात ते आठ कोटी रूपयांची कामे झाली.


image


सोलापूरच्या कार्यकाळात मुंढे यांनी पाच हजार हेक्टर पेक्षा जास्त जमिनी भराव घालून बेकायदेशीरपणे बळकावण्यापासून वाचविल्या आहेत. उन्हाळ्याच्या अखेरीस टॅकर लॉबी सक्रीय होते ते माहिती असल्याने त्यांनी या यंत्रणेला जीपीएसला जोडून त्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे त्यात होत असलेल्या काळाबाजाराला आळा घालता आला आणि गरजूंनाच पाणी मिळणे सोपे झाले.

१४३ कोटीचे वर्षभरात झाले पाचशे कोटी

सप्टेंबर २०१२मध्ये, मुंढे यांची विक्रीकर खात्यात मुंबईसह आयुक्तपदी बदली करण्यात आली. तेथे मुंढे यांनी संशोधन हाती घेतले. त्यांची या जागी नियुक्ती होण्यापूर्वी तेथील सर्वात जास्त वसूलीची रक्कम होती १४३ कोटी रूपये. त्यात त्यांनी पाचशे कोटी रूपये पर्यंत वाढ करून दाखवली. तेथे त्यांनी नवी पध्दत सुरू करून दिली. मात्र पुन्हा एकदा त्यांच्या कार्यपध्दतीमुळे ते वाद आणि चर्चा यांच्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांना दिसून आले. काही मोठ्या आर्थिक संस्थांचे हितसंबंध त्यांच्यामुळे दुखावले होते. त्यांना २०१४च्या नोव्हे. महिन्यात पुन्हा सोलापूरात जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आले.

 टँकरग्रस्त जिल्हा ते टँकरमुक्त जिल्हा!

अवर्षण प्रवण भागात येत असल्याने सोलापूर जिल्हा दुष्काळी समजला जातो. मात्र तरीही राज्यातील सर्वाधिक साखर कारखानदारी याच जिल्ह्यात आहे. दरवर्षी उन्हाळा जवळ आला की जिल्हा आणि शहरात पाण्याची टंचाई जाणवते आणि शेकडोने टँकर्स सुरु होतात. जनावरांच्या चारा छावण्या सुरू केल्या जातात. मुंढे यांनी या सा-या स्थितीचा अभ्यास केला आणि त्याची कारणे काय असावी याचा वेध घेतला असता त्यांच्या लक्षात आले की चुकीच्या पध्दतीने पाण्याचा वापर आणि नियोजनाचा आभाव हीच या टंचाईच्या स्थितीच्या मुळाशी आहेत.

दरम्यान डिसेंबर २०१४ मध्ये राज्य सरकारने जलयुक्त शिवार ही जलसंधारण योजना सुरू केली. मुंढे यांनी ही योजना सोलापूरात लागू केली, त्यात त्यांनी स्वत:चा खास असा मुंढे पॅटर्न राबविला जो नंतर सा-या राज्यात प्रसिध्द झाला. त्यांनी निकषानुसार २८२ गावे निवडली आणि खालील तीन बाबींवर काम सुरू केले. परिसर विकास, पाणी वाहून जाण्याच्या भागात विकास आणि पाण्याचा योग्य शास्त्रीय वापर.

त्यांनी जलसंधारण काम पूर्ण केले त्यात विहीरीचे पुनर्भरण आणि नालबांध कामांचा समावेश होता. पाच महिन्यात तेरा हजार हेक्टर जमिनींवर ही कामे करण्यात आली. तीस हजार विहीरींचे लोकसहभागातून पूनर्भरण करण्यात आले. त्यांनी नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम देखील हाती घेतला. त्यामुळे १५० कोटी रूपये मुल्याची कामे पूर्ण झाली. त्यामध्ये लोकांचा सहभाग ७०-८० कोटी रूपयांचा होता. हा कार्यक्रम लोक चळवळ म्हणून हाती घेण्यात आला आणि मुंढे यांनी गावक-यांना नद्याचे आणि पाण्याचे व्यवस्थापन नियोजन करणे सक्तिचे केले त्यांनी उपलब्ध होणा-या पाण्याची मालकी देखील जलसंधारणासाठी लोकांना देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक पुढे आले आणि ३० हजार पेक्षा जास्त विहीरी पुनरूज्जीवित झाल्या आणि नद्यांचे खोलीकरण करण्यात आले. जुन्या योजनांचे दुरूस्ती आणि पुनरूज्जीवन देखील त्यातून शक्य झाले. 


 भारताचे जल विशेषज्ञ राजेंद्र सिंह सोलापूर येथे लोकसहभागातून  जलसंवर्धन कार्याची पाहणी करताना 

 भारताचे जल विशेषज्ञ राजेंद्र सिंह सोलापूर येथे लोकसहभागातून जलसंवर्धन कार्याची पाहणी करताना 


याशिवाय मुंढे यांनी पाण्याच्या लेखापरिक्षणावर भर दिला. किती पाणी आहे आणि त्यावर नियंत्रण आणि त्याचा हिशेब ठेवून योग्य वापर करण्याची पध्दत त्यांनी लोकांना शिकवली. त्यासाठी जलसंधारणाचा जनजागृती कार्यक्रम, पिक पध्दती मधील सुधारणा आणि ठिबक सिंचनाला चालना देवून पाणी वाचविण्याला प्राधान्य देण्यावर त्यांनी भर दिला. त्यातून जिल्ह्यातील पाणी टंचाईची स्थिती कमी होण्यास मदत झाली.

सोलापूर जो टंचाईग्रस्त भागातील कार्यक्रमात डिपीएपी (अवर्षण प्रवण विकास) मध्ये गणला जातो ज्यातील दहा - अकरा विभागात २०१२-१३ मध्ये सहाशे टँकर्स होते, त्यात २०१४-१५मध्ये केवळ ४० टँकर्स इतकी कमी आली आणि २०१६-१७मध्ये तर एकही टँकर या जिल्ह्यात सुरू करावा लागला नाही! हे श्रेय मुंढे यांनी राबविलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांना द्यावे लागेल.!

पंढरपूर वारी आणि स्थलांतर मुक्त जिल्हा

सोलापूर मध्ये मुंढे यांना पंढरपूर येथील वारीची जबाबदारी देण्यात आली होती आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. वारीच्या वेळी सर्वात मोठा धोका साथीच्या रोगांची शक्यता असते कारण १४-१५ लाख लोक यावेळी वारीला हजेरी लावतात. त्यापैकी बहुतांश उघड्यावर शौचविधी करतात त्यातून नदी प्रदूषित होते. त्यामुळे वारीच्या वेळी पंढरपूरातील निम्मे लोक अन्य स्थळी स्थलांतर करून जातात कारण त्यांना आजारी पडण्याची भीती असते.

उच्च न्यायालयाने चंद्रभागेच्या पात्रात वारकरींना जाण्यास आणि तेथे मुक्काम करण्यास मनाई केली आहे, मात्र वर्षानुवर्षे हे करणारे वारकरी तसे करण्यास आता नकार देत आहेत. मुंढे यांनी उच्च न्यायालयाला विनंती केली की नदीच्या पात्रात धार्मिक विधी करण्यास मनाई करू नये आणि काही प्रमाणात दिलासा मिळवला.

त्यांनी त्यानंतर ६५ एकर जागा विकसित केली आणि सारे वारकरी मंदिराकडे स्थलांतरीत केले. या ठिकाणी पाणी, वीज आणि शौचालयांची सुविधा देण्यात आली. हे सारे २१ दिवसांत केवळ पाच कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आले. जवळपास ३ हजार शौचालये तयार करण्यात आली. त्यांनी घटना घडल्यास तातडीने मदत देणारी यंत्रणा निर्माण केली. त्यांनी ९१ दिवसांत कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधले त्यासाठी १०कोटी रूपये खर्च केले. आणि वारकरींना तेथे स्नानाची सुविधा निर्माण करून दिली. मुंढे यांनी शास्त्रीय पध्दतीने काही घटना घडल्यास प्रतिसाद देणारी आपत्कालीन यंत्रणा तयार केली त्यामुळे कायद्याच्या माध्यमातून वारीच्या वेळी सुविधा निर्माण झाली.

मात्र, त्यांची खरी परिक्षा वारीच्या मुख्य दिवशी एकादशीला होती. किमान ३ ते ४ लाख लोक रांगेत दर्शनाला उभे असतात. पूर्वीपासून रात्री १२ ते पहाटे पाच पर्यंत मंदीर समितीच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या पुजेसाठी दरवाजे बंद केले जातात, मुख्यमंत्र्याना याबाबत प्रस्ताव देवून त्यांनी हा कालावधी कमी करून घेतला. त्याला मंदीर समितीने विरोध केला आणि देवाला आराम करायला वेळ मिळाला पाहिजे असे सागितले, मुंढे म्हणाले की, “देव अश्यावेळी आराम कसा करेल जर त्याचे भक्त त्याच्यासाठी रांगेत तिष्ठत उभे असतील”.


पंढरपूर पूजा

पंढरपूर पूजा


दोनदा सराव केल्यानंतर आणि ब-याच विरोधानंतर त्यानी रात्री १२.४० ते २.३० पर्यंत मुख्यंमंत्र्यांच्या पुजेसाठी मंदीर दर्शन प्रवेश बंद करण्यात यश मिळवले. असे असले तरी त्यांनी त्याशिवाय कोणालाही व्हिआयपी दर्शन देण्यास मनाई केली. या सा-या उपाययोजना केल्याने दर्शन रांग जी तीस तास संपत नसे ती आता १५-१८ तासांत पूर्ण होऊ लागली आहे.

या वर्षीपासून मुंढे यांच्या पुढाकारातूनच सिध्देश्वराची यात्रा देखील जानेवारी महिन्यात सुरळीत होण्यास मदत झाली आहे. या यात्रांचे सुनियोजित पध्दतीने नियोजन केल्यानंतर मुंढे यांच्या देखरेखीत खाणीतून मिळणा-या महसूलात देखील ९० कोटीवरून १८० कोटी रूपये अशी दुपटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या शिवाय पिक कर्जाच्या रकमा देखील तीन हजार कोटी रूपयांवरून दहा हजार कोटी रूपयांपर्यत वाढल्या आहेत. यामध्ये देखील सोलापूर जिल्हा मुंढे यांच्या कार्यकाळात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी बक्षीसास पात्र ठरला होता. मात्र असे असूनही त्यांना पुन्हा लक्ष्य करण्यात आले कारण त्यांनी अनेक शक्तिवान लोकांना दुखावले होते. १८ महिन्यांच्या सोलापूरातील त्यांच्या कामगिरीनंतर त्यांना नवी मुंबईत बदली करून महापालिका आयुक्त म्हणून मे २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान नेमणूक देण्यात आली.

लोकांचे आयुक्त

आता पर्यंत मुंढे यांचा लौकीक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून राज्यभर झाला होता. 


तुकाराम मुंढे Tukaram Mundhe during ‘Walk with the Commissioner’

तुकाराम मुंढे Tukaram Mundhe during ‘Walk with the Commissioner’


नवी मुंबई हे मोठ्या प्रमाणात नियोजित शहर आहे, ज्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार १,१२०,५४७ आहे. या शहराचा कारभार नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत चालतो. आयुक्त म्हणून येथे आल्यावर मुंढे यांनी नागरिक आणि तंत्रज्ञानावर आधारित धोरणावर भर देवून महत्वाचे प्रश्न मार्गी लावले. त्यांनी नव्याने काही गोष्टी सुरू केल्या आणि त्यातील महत्वाच्या पुढील प्रमाणे:

१. ऑनलाईन वरून नागरिकांच्या तक्रारीचे निवारण: त्यांनी याद्वारे लोकांच्या दैनंदिन तक्रारीचे निराकरण करणारी पध्दत सुरू केली, त्याला कालबध्द पध्दतीने प्रतिसाद आणि प्रश्न सोडविल्यानंतर त्याबाबत नागरिकांचा अभिप्राय घेण्यास सुरूवात केली. या साठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले.

२. आयुक्त तुमच्या भेटीला : या उपक्रमांतर्गत वरिष्ठ अधिकारीवर्गासह आयुक्त प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या भागात जावून लोकांना भेटत. यावेळी चर्चा केल्यानुसार लोकांच्या सूचनांची दखल घेवून त्यात सुधारणा होत आहे की नाही याची माहिती घेणारी यंत्रणा त्यांनी तयार केली.

३. सुलभ व्यवसाय करण्यासाठी : व्यावसायिक परवाने, आणि विविध परवानग्या लोकांना घेता याव्या यासाठी एक खिडकी योजना सुरू केली त्यातून त्यांना लागणारा वेळ वाचला आणि सुलभपणे दाखले मिळू लागले.

४. कॅशलेससाठी पुढाकार : ऑनलाइन व्यवहार व्हावेत आणि पोर्टलच्या माध्यमातून, मोबाईल ऍपच्या मध्यमातून सुलभपणे लोकांना व्यवहार करता यावे म्हणून नागरी सुविधा केंद्राचा त्यांनी विकास केला.

५. घन कचरा व्यवस्थापनासाठी योजना: कचरा विघटन करण्याची प्रक्रिया त्यांनी सुलभ केली, त्यासाठी त्यांनी दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद केली. त्यामुळे कच-याचे वर्गिकरण करून देण्याचे प्रमाण ५ टक्क्यांवरून ८० टक्के पर्यत वाढले. याशिवाय कचरा गोळा करण्याची यंत्रणा प्रभावीपणे राबवून शहरात उघड्यावर कचरा टाकण्याची प्रथा बंद केली.


image


या शिवाय मुंढे यांनी लोकांच्या सहभागाच्या योजनामध्ये अधिक पारदर्शीपणा आणि परिणामकारकता आणण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी उपायुक्त प्रकाश कुलकर्णी जे मालमत्ता कर विभागाचे प्रमुख होते यांच्यासारख्या अनेक अधिका-यांवर कारवाई केली, त्यांनी गेैरलागू असलेल्या योजना रद्द करण्यास अजिबात मागेपुढे पाहिले नाही. त्यातून वाचलेल्या निधीतून त्यांनी अपंगांना मदत करण्यासाठी शहरात नव्या योजना लागू केल्या. त्यांच्या या प्रयत्नांची केंद्र आणि राज्य सरकारने दखल घेतली होती.

त्यानंतर मुंढे यांची नियुक्ती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पीएमपिएमएल या पुण्यातील परिवहन सेवेसाठी मार्च २०१७मध्ये करण्यात आली.

पीएमपिएमएल आणि आतापर्यंत

त्यांच्या सध्याच्या जबाबदारीनुसार ते व्यवस्थापन आणि शिस्त यांच्यानुसार कार्यान्वयन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मार्च २०१७पासून मुंढे यांनी पुण्याच्या परिवहन व्यवस्थेत ज्या सुधारणा केल्या त्या पुढील प्रमाणे:

प्रति किमी उत्पन्न (ईपीकेएम) ५१ रूपये होता तर त्यावर लागणारा खर्च सीपीकेएम (काॅस्ट पर किलोमीटर ) ८४ रूपये होता. याचे कारण मोठ्या प्रमाणात आस्थापनावर खर्च केला जात होता, कंत्राटी कामगार, देखभाल करण्याच्या नियोजनाचा आभाव, वाईट स्थितीत असलेली वाहने, सुट्या भागांचा प्रश्न आणि वापरात नसलेल्या कार्यशाळामुळे येथील कामकाज ४० टक्क्यावरून ६ टक्के पर्यत घसरले होते.

मोठ्या प्रमाणात परिवहन सेवेची वाहने बंद पडत असत. गेल्या तीन महिन्यात बंद पडल्याने वापरात नसलेल्या वाहनांची संख्या तीनशे वरून ५० वर आली आहे. परिवहन सेवेने योग्य ती देखभाल केल्यास ३७०० किमी नंतर वीस हजार किमीला हाफ डॉकींग (docking)आणि चाळीस हजार किमीला फूल डॉकींग केली जात आहे.

१. पूर्वी बसची स्वच्छता बाहेरून केली जात असे, आता परिवहन सेवा स्वत:च सा-या बस स्वच्छ राहतील याची काळजी घेते.

२. वाहक आणि चालक पूर्वी उद्धट वागत असत, मुख्याधिकारी यांनी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आणि ८-१० जणांना निलंबित केले. ज्यांनी महिला किंवा ज्येष्ठ नागरीकांना उद्दामपणे वर्तन करून बसण्यास नकार दिला होता. प्रवाश्याची संख्या जी पूर्वी ६.५ लाख ते सात लाखांच्या घरात होती ती वाढून ९ लाखांच्या घरात गेली आहे.

प्रत्येक बस वरील उत्पन्नात मागील प्रति दिवस आठ हजार रूपये वरून दहा हजार रूपये अशी वाढ गेल्या तीन महिन्यात झाली आहे. त्यामुळे रोजच्या उत्पन्नात देखील १.४कोटी वरून १.७ कोटी अशी वाढ झाली आहे.

एकूण २०४५ बसेस पैकी १२५० बस मार्च २०१७मध्ये कार्यरत होत्या त्यात वाढ होवून आता १६शे बस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केल्या जात आहेत.

पुणे परिवहन बस ही देशातील पहिली रियल टाइम इ -टिकीटींग बस म्हणून दावा करण्यास सज्ज झाली आहे. एएफसीएस यंत्रणेमुळे मुख्याधिकारी केंव्हाही या तिकीटींग यंत्रणेवर नियंत्रण आणि निरिक्षण करू शकतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये ४० टक्के वरून शंभर टक्के अशी वाढ गेल्या तीन महिन्यात झाली आहे.

पुणे परिवहन सेवेचा स्वत:चा अॅप विकसित करण्यात आल्याने नेटीझन्सला त्याद्वारे तक्रारी करणे किंवा माहिती घेणे सुलभ झाले आहे असे मुंढे म्हणाले. ते म्हणाले की, “ ज्यावेळी तुम्ही तक्रार करता तुम्हाला एक क्रमांक मिळतो, तुमची तक्रार एका अधिकाऱ्याकडे सोपविली जाते. जर त्या अधिकाऱ्यामार्फत २४ तासात कारवाई झाली नाही, ती तक्रार आपोआप वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाते. आणि त्या अधिका-याला वर्गवारी नुसार१ श्रेणी मिळते. अधिका-यांना त्यांच्या कार्यकौशल्याच्या तपासणीच्यावेळी या प्रकारच्या श्रेणी किती मिळाल्या होत्या ते पाहिले जाईल.” पुणे परिवहन मध्ये देखील पारदर्शकता आणि येथे काम करणा-यांच्या कार्यकुशलतेचा कस लागणार आहे असे मुंढे म्हणाले.


image


पीएमपिएमएल ही सेवा आर्थिक व्यवहार, शिक्षण, बाजार, आरोग्य, याशिवाय पर्यावरण अश्या सा-या जीवनातील अंगांना कार्यान्वित करणारी बाब आहे. यातून शाश्वत विकास होत आहे. केवळ वाहतूक हाच उद्देश नाही. आम्ही परवडणारी, सर्वांच्या आवाक्यातील, प्रभावी आणि सुरक्षित सेवा देवू. माझे काम ही व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि स्वयंचलितपणे उभी राहणे यावर लक्ष देण्याचे आहे. त्याला आणखी काही वेळ लागेल मात्र आम्ही त्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत.”

माणूस म्हणून मुंढे

मुंढे यांचा विश्वास आहे की, त्यांच्यात आत्मिक बळ आहे ज्यातून ते नेतृत्व करतात एक क्रांतीकारक आणि सुधारक त्यांच्यात आहे. ते म्हणतात, “ मी स्वत:ला विचारतो की जर मी नाहीतर कोण? सनदी अधिकारी म्हणून, जर मी ही व्यवस्था बदलू शकलो नाही तर जर मी लोकांना नेतृत्व देवू शकलो नाही तर, त्यांना प्रोत्साहन देवू शकलो नाही तर कोण त्यांना हे सारे देणार आहे?” ते गांधीजीच्या त्या वक्तव्यावर विश्वास ठेवतात - तुम्हाला हवा तो बदल घडवा."

मुंढे यांना वाटते की त्यांचा अतिवेग हीच त्याची कमजोरी आहे कारण त्यामुळे अनेकदा लोक नाराज होतात जे सोबत काम करत असतात, आणि त्यांची बांधिलकी त्यांच्यातील कामाच्या झपाट्याशी आहे.

बारा वर्षे नऊ बदल्या

त्यावेळी मुंढे यांना वाईट वाटते ज्यावेळी काही महिन्यात त्यांची बदली होते, मात्र ते यावर विश्वास ठेवतात की, ते आणखी काही काळ राहीले तर चांगला बदल घडवू शकतात. ते म्हणतात, “ वर्षभरात मी व्यवस्था बदलू शकतो मात्र तिला स्थिर करू शकत नाही. मला काही वेळा वाईट वाटते की मला इथून तिथे बदलण्यात येते. मात्र मला माहिती आहे की मी योग्य तेच करत आहे. मला विश्वास आहे की प्रत्येक जागी मला जास्त वेळ मिळाला तर मी अधिक प्रभावीपणे काम करेन.”

ते म्हणतात की अनेक लोक त्यांच्यासोबत जात नाहीत कारण त्याचा वेग जास्त असतो. ते सारे काही प्राधान्यावर ठेवतात. पुणे परिवहनमध्ये ते आयटीएम, भांडार, शिस्त, इंधन व्यवस्थापन आणि भविष्याच्या योजना या सा-यावर एकाचवेळी काम करत आहेत. ते म्हणतात, “ हे शक्य आहे कारण माझ्या कारकिर्दीत मी चुका केल्या असतील तरी मला माहिती आहे की माझा हेतू प्रामाणिक आणि पारदर्शी आहे. येथे काही लोकांना माझ्या कामाचा त्रास होणारच. आणि काही शक्तिवान लोकांचे नुकसान देखील होवू शकते. त्यांना माझ्या बद्दल आकस असेल, कारण माझ्या कार्यपध्दतीने त्यांना हानी होते आहे. जर त्यांना माझ्या कामात काहीच चुका काढता आल्या नाहीत तर ते म्हणतात की मी उध्दट आहे, कारण मी त्यांचे ऐकून घेत नाही. हा इतकाच आरोप माझ्या बारा वर्षाच्या सेवेदरम्यान माझ्यावर झाला आहे, आणि काहीच नाही.”

जर त्यांना पुणे परिवहन मध्ये अधिक काळ मिळाला किमान दोन वर्ष त्यांना आशा आहे ते ही सेवा सक्षम करतील आणि सुरळीत देखील. ते पुढे म्हणाले की, “ मला नाही वाटत तेवढा वेळ मला दिला जाईल. माझा प्रयत्न हाच असेल की जे काही द्यायचे ते मी आहे तोवर मला देता यावे.”


Tukaram Mundhe with his family

Tukaram Mundhe with his family


संस्था उभारणी राष्ट्र उभारणी

मुंढे सा-यांना आवाहन करतात की, त्यांनी देशाच्या उभारणीत हातभार लावावा. त्यांना वाटते की या बदलात सारे सहभागी व्हावेत. ते म्हणतात की, “ तुम्ही नेहमी म्हणता की देशात भ्रष्टाचार आहे. ज्यावेळी तुम्ही हे म्हणता त्यावेळी तुम्ही स्वत: देखील त्यात मोडता. तुम्ही भ्रष्टाचारापासून दूर राहून त्यावर उजेड टाकला पाहिजे, इतरांना त्यापासून दूर ठेवले पाहीजे, हे कठीण आहे आणि त्यात सहभागी होणे देखील सोपे नाही.”

ते पुढे सांगतात की, “ जर तुम्हाला शहर स्वच्छ करायचे असेल, तर ते घाण करू नका. मी तुम्हाला ते स्वच्छ करा असे सांगत नाही. देशाच्या विकासासाठी तुम्ही केवळ एक प्रश्न विचारा कि, तुम्ही स्वत:पेक्षा आणखी कुणाच्या भल्यासाठी झटत आहात.”

मुंढे यांच्या मते, यश स्वत:हून बोलते. जरी ती सरकारी संस्था असेल किंवा खाजगी असेल तरी. संस्था प्रगतीपथावर न्यायची असेल तर तुम्हाला त्यासाठी नेतृत्व आणि काम करावेच लागेल. ते विशद करतात की, “ तुम्हाला खूप कठीण कार्य करावे लागेल, ज्या पध्दतीत तुम्ही काम करत आहात, त्यासाठी काही काळ लागेल. तुम्ही तुमची पध्दत लागू करून काम करताना तुम्हाला विरोध आणि टीका होणारच.”

कुटूंब आणि भविष्य

मुंढे यांचे कुटूंब या सा-या त्यांच्या प्रवासात सोबत असते. त्यांच्या मते ते त्यांच्या पत्नी आणि मुलांना न्याय देवू शकत नाहीत, कारण त्यांना हवा तितका वेळ त्यांना देता येत नाही.

मुंढे यांचे सोपे तत्वज्ञान आहे, कामात तत्परता आणि त्याचे जे काही परिणाम होतील ते स्विकारण्याची तयारी, ते म्हणतात, “ ज्या कोणत्या क्षेत्रात मी असेन, किमान दोन पाय-या तरी बदल घडवला पाहिजे. ज्यावेळी मी तेथे जावून कार्यभार हाती घेतो. त्यातून सामान्य माणसांच्या जीवनात बदल झाला पाहिजे. मी प्रभावी अधिकारी म्हणून माझ्या सा-या नेमणूकांमध्ये लक्षात राहिलो पाहिजे या पेक्षाही चांगला अधिकारी म्हणून लक्षात राहिलो पाहिजे. कारण चांगले अधिकारी असणे प्रभावी असेलच असे नाही.”

लेखक : आलोक सोनी

अनुवाद : नंदिनी वानखडे -पाटील

    Share on
    close