महाराष्ट्रातील पर्यटनाच्या उद्योगाला नवसंजिवनी देणा-या ‘सार्क पर्यटन परिषदे’चे ऑक्टोबरमध्ये औरंगाबादला आयोजन!

महाराष्ट्रातील पर्यटनाच्या उद्योगाला नवसंजिवनी देणा-या ‘सार्क पर्यटन परिषदे’चे ऑक्टोबरमध्ये औरंगाबादला आयोजन!

Friday September 09, 2016,

2 min Read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानात नव्या उद्योगांच्या देशांतर्गत विकासासोबतच देशातील समृध्द साधन संपत्तींचा विकास अभिप्रेत आहे. मोदी यांच्या पदग्रहण समारंभापासूनच त्यांनी केवळ भारतच नव्हे तर शेजारी असलेल्या सार्क देशांच्या विकासाची दिशा काय असावी याचे सुतोवाच केले होते. त्याच पर्वातील नवीन अध्याय येत्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील ऐतिहासीक आणि पुरातत्वदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या औरंगाबाद मध्ये होत आहे. सार्क पर्यटन परिषद येथे होऊ घातली आहे अशी माहिती राज्याच्या पर्यटन सचीव वल्सा नायर-सिंग यांनी दिली आहे.

image


जगप्रसिध्द अजिंठा आणि वेरुळ च्या शिल्पकृती आणि चित्रकला सौंदर्यासोबतच औरंगाबादची अलिकडच्या काळातील ओळख औद्योगिक शहर म्हणूनही झाली. स्कोडा सारखे जागतिक किर्तीच्या ऑटोमोबाईल उत्पादन करणा-या प्रकल्पांपासून अनेक प्रकल्प येथील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत आहेत. युनेस्कोने या परिसरातील स्थळांना जागतिक दर्जा बहाल केला आहे हे सार्क पर्यटन परिषदेसाठी महत्वाचे आहे कारण जगप्रसिध्द लोणार सरोवर येथून काही तासांवर आहे. पर्यटन हा देखील महत्वाचा उद्योग म्हणून या भागात विकसित होऊ शकतो आणि मेक इन इंडियाच्या अभियानात त्याचा आगळ्या पध्दतीने उद्योग म्हणून विकास होऊ शकतो हे या निमित्ताने स्पष्ट होणार आहे.

image


दोन दिवसांच्या या परिषदेत मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र यावर देखील भर देण्यात येणार आहे. कारण येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक महत्वाच्या प्रकल्पांची सुरुवात येत्या काही वर्षांत केली जाणार आहे. श्रीमती नायर-सिंह म्हणाल्या की, नेपाळ, अफगणिस्थान, बांग्लादेश, भुतान,भारत, श्रीलंका, मालदीव आणि पाकिस्तान या देशांचा समावेश असलेल्या या दक्षिण आशियाई देशांच्या परिषदेत पर्यटनाच्या उद्योगाला चालना देण्यासाठी परस्पर सांमजस्य आणि सहकार्य करण्याबाबत महत्वाची चर्चा होणार आहे. 

image


देशातील अनेक राज्यातील पर्यटनाशी संबंधीत संस्था, राज्य या साठी प्रतिनिधित्व करणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन, उद्योग या विभागांकडे या परिषदेचे यजमानत्व असेल त्या दरम्यान अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सी आय आय ही देशातील उद्योजकांची महत्वाची संघटनाही सहभागी होणार आहे. राज्याच्या सहाही विभागातील पर्यटनाच्या उद्योगातील महत्वाच्या व्यक्ती, संस्था यावेळी आमंत्रित असून त्यांच्याकडील उद्योगाच्या संधी आणि त्यातील रोजगार तसेच गुंतवणुकीबाबत तपशिलवार चर्चा होणार आहे. औरंगाबाद शहराची ओळख प्रवेशव्दारांचे शहर अशी आहे. त्यामुळे या शहराच्या चारही बाजूच्या ऐतिहासीक स्थळांच्या दर्शनाची मजा काही औरच आहे. हे शहर पर्यटनाचे मूळ केंद्र (हब) आहे. त्यात अजिंठा, वेरुळ, या युनेस्कोच्या दर्जाप्राप्त स्थळांसोबतच पाणचक्की, बिबी चा मकबरा, अशा स्थळांचा समावेश आहे. सार्क देशांच्या प्रतिनीधींसोबत येथील पर्यटनाच्या संधी विस्तारण्याबात आशादायक चर्चा होतील त्यातून येथील स्थळांचा पर्यटनाच्या उद्योगाच्या दृष्टीने नव्याने विकास होण्याची अपेक्षा आहे.