दोन क्रिएटीव्ह महिलांनी घेतलाय क्रिएटीव्ह नाशिक बनवण्याचा ध्यास

0

आर्किटेक्ट शिल्पा धामने अमेरिकेतून जेव्हा नाशिकला परतल्या तेव्हा पुन्हा नाशिकच्या वातावरणात अॅडजस्ट होताना त्यांना थोडासा त्रास व्हायला लागला. काही वर्षांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांचा आपल्या भोवतालकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता. अर्थात अमेरिका आणि भारत यात थेट तुलना होणं शक्य नव्हतं. तिथं पर्यावरण आणि आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात येतो. इथं नाशिकमध्ये अगदी त्याविरोधातला वातावरण होतं. त्यामुळे आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला खेळायला कुठे घेऊन जायचं हा प्रश्न त्यांना रोज भेडसावू लागला. नाशिकमध्ये लहान मुलांना खेळता येतील अशी फार कमी मैदानं आहेत. ती शिल्पा राहत असलेल्या ठिकाणांपासून बऱ्यापैकी दूर होती. ज्या काही गार्डनवजा प्लेग्राऊंड वजा बाग होत्या त्या कमालीच्या अस्वच्छ होत्या. तसं पाहिलं तर नाशिकच्या काही सोसायट्यांमध्ये मोकळ्या जागा तर होत्या पण त्यांची अवस्था फार वाईट होती. तिथं घाणीचं साम्राज्य होतं. प्लास्टीकच्या पिशव्या, वाढलेलं गवत, उंदीर घुशिंनी  पोखरलेली बिळं आणि दुर्गंधी. अनेक सोसायटींनी तर या जागेचा वापर डंपींग ग्राऊंड म्हणून केला होता. काही ठिकाणी इतकी बिकट परिस्थिती नव्हती. पण निगा न राखल्यानं तिथं गवत वाढलं होतं. या जागा अगदी भकास वाटत होत्या. या अश्या मोकळ्या जागेंचा काहीतरी वापर करायला हवा. असं शिल्पा यांना वाटत होतं. त्यांच्यातल्या आर्किटेक्टला या जागांमध्ये चांगला बगीचा करण्याची कल्पना सुचली.  शिल्पा यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना या संदर्भात सांगितलं आणि या अस्वच्छ मोकळ्या जागेत सुशोभिकरणीची योजना बोलून दाखवली. त्यांना साथ मिळाली ती लॅन्डस्केप आर्किटेक्ट असलेल्या रश्मी हंसवानी यांची.

" नाशिक शहरात मोकळ्या जागांची अवस्था फारच वाईट होती. लहान मुलांना खेळण्याजोग्या जागा कमीच होत्या. जागा नाही म्हणून मग  घरात बसून मुलांनी  मोबाईल आणि कंम्पुटर गेम्सला आपलंसं केलं. मुलांचे मैदानी खेळ कमी झाले.  आपण आपल्या मुलांना हेच देणार का हा प्रश्न माझ्या मनात येऊन गेला. काय करता येईल याचा विचार करताना रश्मी भेटली. ती ही तसाच विचार करणारी,  मग कॉर्पोरेट कंपन्यांच्या मदतीनं या जागा स्वच्छ करता येतील असा विचार पुढे आला. त्यासाठी 'एनरीच ग्रीन लाईफ फाऊंडेशन' या सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून हे काम करण्याचं आम्ही ठरवलं." शिल्पा सांगत होत्या. 


शिल्पा धामने आणि रश्मी हंसवानी 
शिल्पा धामने आणि रश्मी हंसवानी 

शिल्पा आणि रश्मीसाठी मोकळ्या जागांच्या सौदर्यीकरणाची ही मोहीम त्यांना वाटत होती तितकी सोपी नव्हती. एखाद्या सोसायटीतली जागा घ्यायची म्हटलं तर पहिला विरोध व्हायचा तो तिथल्या लोकांकडून. या दोघींना नक्की काय फायदा असे प्रश्न येत असत. " जागा शोधल्यानंतर ती मिळवण्यासाठी आलेले अनुभव फार गमतीशीर होते. लोकांचा पटकन विश्वासच बसत नव्हता. आम्ही हे का करतोय हे त्यांना कळत नव्हतं, त्यामुळे आमच्या विषयी  काहीसा अविश्वास निर्माण व्हायचा. त्यांचा विश्वास संपादीत करणं हे मोठं काम होतं. हळूहळू आम्ही हे का करतोय हे लोकांना समजू लागलं तसं आमचं काम सोपं झालं."

कशा शोधतात मोकळ्या जागा

सोसायटी तयार होत असताना य़ा मोकळ्या जागा जाणिवपूर्वक ठेवल्या जातात. शहर विकास योजनेतही या मोकळ्या जागा असतात. शिल्पा आणि रश्मी यांनी या जागांचा शोध घेण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला. जागा सापडली की तिथल्या रहिवाश्यांची परवानगी आणि इतर गोष्टी व्हायच्या. जागा पक्की झाल्यावर नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, त्यांनी मोकळ्या जागेच्या सौंदर्यीकरणाची कल्पना उचलून धरली. हे करण्यासाठी मात्र पैश्याची गरज होती. त्यासाठी मग आसपासच्या कॉर्पोरेट कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनीही सीएसआर अंतर्गत फंडींग करण्याचं मान्य केलं. "सर्व गोष्टी जुळवून आल्या. आम्ही आमच्या कारागिरांना घेऊन काम करायला लागलो. अगोदर कचरा बाजूला.केला. जमिनीचं सपाटीकरण करण्यात आलं. गवत उगवलं, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांना खेळता येतील असं काही मोजकं साहित्य आणलं आणि या मोकळ्या जागेचं सौंदर्यीकरण  करण्यात आलं. या माध्यमातून तिहेरी फायदा झाला, एक जागा स्वच्छ झाली, दुसरं तिथं मुलांना खेळता येऊ लागलं आणि तिसरं तिथे एका सुंदर जागेत फिरण्याचा आनंद लोकांना मिळाला. लोकांना ही संकल्पना आवडली, आमच्या कल्पनांना आकार मिळाला आणि यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला" शिल्पा आनंदाने सांगत होत्या. 

अस्वच्छ मोकळी जागा 
अस्वच्छ मोकळी जागा 

गेल्या काही महिन्यात 'एनरीच ग्रीन लाईफ फाउंडेशन'तर्फे नऊ मोकळ्या जागेंचं सौदर्यीकरण करण्यात आलंय. " लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता आम्हाला अनेकजण संपर्क करतात. बरं वाटतं. ज्या जागेवर घाण होती त्या जर तुम्ही आता पाहिल्यात तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की कधीतरी ही जागा अस्वच्छतेचं आगार होती. काल परवापर्यंत तिथं कुणी बघतही नव्हतं, आता लोक तिथं येतात, बसतात, त्यांची मुलं खेळतात. आपण समाजाला काहीतरी सकारात्मक देतोय याचा आनंद वेगळाच आहे." शिल्पा सांगत होत्या. 

एनरीच ग्रीन लाईफ फाऊंडेशनने स्वच्छ केलेली जागा 
एनरीच ग्रीन लाईफ फाऊंडेशनने स्वच्छ केलेली जागा 

एनरीच ग्रीन लाईफ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना एका मोकळ्या जागेचं सौदर्यीकरण करण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. त्या दिवसांमध्ये या जागेचा संपूर्ण कायापालट होतो. त्याची देखभाल ही फाऊंडेशनच करते. आता संपूर्ण नाशिक शहरातल्या मोकळ्या जागांना नवं रुप देण्याचा ध्यास रश्मी आणि शिल्पा यांनी घेतलाय. 

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

स्वखर्चाने जनकल्याणाच्या-पर्यावरण रक्षण,पक्षी संवर्धनाचा ध्यास घेणारी कल्याणची ‘ईकोड्राइव्ह फाऊंडेशन’ची तरूण मंडळी!

भिंतीमध्ये वाढलेल्या देशी झाडांच्या पुनःरोपणातून जैवविविधतेचे रक्षण करणारी ‘ग्रीन अम्ब्रेला’

हरवलेला ‘चिवचिवाट’ पुन्हा जागविण्यासाठी प्रयत्नशील प्रमोद माने