"यश प्राप्तीसाठी कष्टाबरोबरच हुशारी बाळगणे गरजेचे" : मणी अब्रोल, वरिष्ठ संचालक, याहू! इंडिया

"यश प्राप्तीसाठी कष्टाबरोबरच हुशारी बाळगणे गरजेचे" :  मणी अब्रोल, वरिष्ठ संचालक, याहू! इंडिया

Sunday November 08, 2015,

5 min Read

मणी अब्रोल

मणी अब्रोल


मणी अब्रोल यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा बऱ्याचशा नाविन्यपूर्ण संस्थांबरोबर काम करण्याचा १८ वर्षांचा अनुभव आहे. आज त्या याहू! इंडिया (Yahoo! India) मध्ये अभियांत्रिकीच्या वरिष्ठ संचालक आहेत. त्यांचा आजच्या तरुणींना हाच सल्ला आहे की तंत्रज्ञानापासून दूर राहू नका.

त्यांनी त्यांच्या यशाचे रहस्य आपल्या सगळ्यांसमोर मांडले आहे. त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणातला काही अंश येथे देत आहोत.

बुद्धीचा वापर करून हुशारीने केलेले कष्ट तुम्हाला यशस्वी करतात

मी चंदिगढमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झाले. माझे पालक शिक्षक आहेत आणि म्हणूनच मी खूप शैक्षणिक वातावरणात वाढले. माझ्या आई-वडिलांनी मला योग्य व्यावसायिक शिक्षण घेण्यास उद्युक्त केले. त्या काळी भारतात आपल्याकडे शैक्षणिक क्षेत्रात जास्त पर्याय उपलब्ध नव्हते. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखांपैकी काहीतरी एक निवडावं लागायचं. मी अभियांत्रिकीची निवड केली.

‘कष्ट केल्याने तुम्ही यशस्वी होता’ हा मंत्र माझ्या पालकांनी माझ्यावर खूप लवकर बिंबवला होता. मी ती शिकवण आजपर्यंत पाळत आले आहे. पण, आजच्या युगात, मला नाही वाटत की फक्त कष्ट करणे पुरेसे आहे. तुम्ही त्याबरोबर हुशारीने काम केले पाहिजे. आजच्या बदलत्या काळाबरोबर तुम्ही जुळवून घेतले पाहिजे. प्रत्येक गोष्ट आजकाल किती वेगाने बदलत आहे.

मी चंदिगढमध्ये खूप सुरक्षित आयुष्य जगले. म्हणूनच स्वतः आव्हानात्मक अनुभव घेण्यासाठी मी माझ्या पूर्वीच्या सरधोपट आयुष्यातून बाजूला झाले व अमेरिकेला निघून गेले. जरी मला चंडीगढमध्ये राहणे खूप आवडत होते, तरी मला माझ्या अनुभवांचे क्षितीज माझ्या जन्मगावाच्या पलीकडे नेऊन अधिक विस्तारायचे होते.

अमेरिकेला प्रयाण

मी पंजाब अभियांत्रिकी विद्यालयात विद्युत अभियांत्रिकीला (Electrical Engineering) प्रवेश घेतला होता. पण लवकरच मला हे लक्षात आले की त्यात मला रस नाही. माझ्या स्नातक अभ्यासक्रमातसुद्धा मला संगणकीय अभ्यासक्रम (Programming Course) जास्त आवडला होता. मी माझ्या पदव्युत्तर शिक्षणक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला संगणक शास्त्राकडे वळले.

अमेरिकेला जाणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते, कारण मला तिकडे जास्त कष्ट करावे लागले. कामाचा अतिरिक्त भार आणि कुटुंबापासून दूर राहणे सुरवातीला फार जड गेले, पण सहा महिन्यांनी मी त्या सगळ्या गोष्टींची मौज अनुभवायला सुरुवात केली.

'शोध’ जगतातील कारकिर्द

पदवीधर झाल्यावर लगेच मी मेरीलँड येथील डिजिटल इक्विप्मन्ट कॉर्पोरेशन मध्ये रुजू झाले आणि १९९६ पर्यंत तेथे काम केले. मी माझ्या यजमानांना अमेरिकेमध्ये भेटले आणि आम्हां दोघांनाही कॅलिफोर्निया येथे स्थलांतरीत व्हायचे होते. कारण आमचे बरेचसे वर्गमित्र तेथे राहत होते. मी १९९७ मध्ये तेथील 'वेरिटी' नावाच्या एका कंपनीमध्ये रुजू झाले. मला ‘शोध’ विभागात काम करण्यात खूप रस होता आणि वेरिटी ‘उद्योग शोध उत्पादनांवर’ (Enterprise Search Products) काम करत होती. त्या वेळेस शोध विभागाची नवीन सुरुवात होत होती आणि मी वेरिटीमध्ये २००५ सालापर्यंत काम केले. मी तेथील नोकरी सोडली कारण आम्ही भारतात परत येण्याचा निर्णय घेतला.

मी वेरिटीमधील माझी वर्ष खूप मजेत व्यतीत केली आणि तेथे मला अतिशय हुशार लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्या दरम्यान मला इतर मोठ्या कंपन्याकडून कामासाठी विचारणा होत होती, पण मी वेरिटीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला कारण तेथे मला खूप शिकायला मिळत होते. मला माझ्या निर्णयावर कधीही पश्चाताप झाला नाही. आम्ही तेथे ‘ विविध उत्पादनांचा शोध घेणाऱ्या योजनेवर ’ काम करत होतो आणि मला माहित होतं की अशा प्रकारच्या कामाचा अनुभव मला इतरत्र कुठेही मिळणार नाही. माझ्या आयुष्यात मला त्या दिवसांत मिळालेला अनुभव फारच उपयुक्त ठरला.

भारतात परत येणे

मी जेंव्हा बंगलोरला स्थलांतरित झाले तेंव्हा याहू! मध्ये रुजू झाले. मी ‘याहू! प्रयोगशाळा आणि संशोधन’ साठी माहिती संकलनाचे काम करत होते. पाच वर्ष याहू! मध्ये काम केल्यानंतर, मी एका नवीन कंपनी ‘लेक्सिटी’ बरोबर काम करण्यासाठी याहू! मधील नोकरी सोडली. खरे तर मी ‘लेक्सिटी’ च्या संस्थापकाबरोबर वेरिटीमध्ये काम केले होते आणि मी त्याला खूप चांगलं ओळखत होते. त्याने मला लेक्सिटीसाठी संपूर्ण भारतातील संघ बनवण्याची जबाबदारी दिली. मी सुरुवातीपासूनच खूप कार्यक्षम होते आणि उत्पादनावर काम करत होते. दोन वर्षांच्या आत, जेंव्हा याहू!ने लेक्सिटीचा ताबा घेतला त्यावेळी आम्ही भारतातले वीसजण तेथे काम करत होतो. आम्हां सगळ्यांना याहू!ने त्यांच्या कंपनीत सामावून घेतलं आणि त्यानंतर मी याहू!मध्ये भारतीय संघाची वरिष्ठ संचालक झाले.

आतापर्यत माझा भारतातील कारकिर्दीचा प्रवास फारच रोचक झाला आहे.

मारिसा मेयरच्या नेतृवाखाली याहू! चे भवितव्य उज्वल आहे

नवीन नेत्यामुळे याहू! मध्ये आज खूप अधिक सकारात्मक उर्जा निर्माण झाली आहे. सगळ्यात लक्षणीय बाब ही आहे की आम्ही लेक्सिटीमध्ये ज्याप्रमाणे लहान व्यवसायांमध्ये गुंतवणूक करीत असू, त्याचप्रमाणे याहू!नेसुद्धा आमची पद्धत चालू ठेवली आहे. माझ्यासाठी वैयक्तिक दृष्ट्या ही गोष्ट फार मोलाची आहे.

आम्ही लहान आणि मध्यम उद्योगांना यशस्वी होण्यास मदत होईल अशा प्रकल्पांवर काम करत आहोत, आणि हे फार आव्हानात्मक आहे. लहान उद्योग-धंद्याला यशस्वी करणे खरोखरच अवघड आहे, विशेषत: जाहिरातींच्या क्षेत्रात. जर तुम्ही आजच्या जाहिरात क्षेत्रावर दृष्टीक्षेप टाकला तर ती बाजारपेठ अशा लोकांसाठी रचली गेली आहे, ज्यांच्याकडे मोठ्या आर्थिक योजनेचं पाठबळ आहे. अशा रीतीने मुळ समस्याच अतिशय शोचनीय आहे. माझा ह्यावर पूर्ण विश्वास आहे की जर तुम्ही लहान उद्योग-धंद्यांना यशस्वी होण्यास हातभार लावला तर संपूर्ण अर्थव्यवस्था भरभराटीस येईल. मला असं वाटतं, याहू! चे उत्तम दिवस आता लवकरच येणार आहेत. मारिसा ही एक लोकविलक्षण नेता आहे आणि तिच्या नेतृत्वगुणांमुळे आपल्याला नजिकच्या भविष्यकाळात प्रचंड उर्जा आणि आवेग पाहायला मिळणार आहे.

वैयक्तिक ओढ

माझ्या कारकीर्दीमध्ये यशाच्या पायऱ्या कशा चढत राहायच्या, ह्याबद्दल मी कधीच जास्त विचार केला नाही. मात्र, मी निरंतर स्वतःला हेच विचारते की मी जे काही करते आहे त्यातून मला आनंद मिळतो आहे का आणि मी माझ्यातर्फे कामामध्ये योग्य हातभार लावत आहे का? तुमचा हुद्दा काय आहे हे महत्वाचं नाही जोपर्यंत तुम्ही काहीतरी नवीन शिकत राहता आणि तुमच्या कामाची गुणवत्ता वाढवता. मी स्वतःला आवडणारी कामं करत पुढे जात राहते, अशावेळेस मिळालेला हुद्दा किंवा पदवी दुय्यम ठरते.

तरुणाईला सल्ला: तंत्रज्ञान आपलंसं करा

जरी तुम्हाला व्यवस्थापकीय विभागात काम करायचं असेल, तरी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करा. तांत्रिक तज्ञ असणे ही बाब तुम्हाला तंत्रज्ञान माहित नसणाऱ्या इतर लोकांच्या तुलनेत वरचढ ठरवते. स्वतःला सतत आव्हानं द्या व सतत वृद्धिंगत होत राहा.

उत्पादनक्षम कसे राहावे

माझ्या वेळेचे व्यवस्थापन करताना माझ्यासाठी माझं कुटुंब सर्वात महत्वाचं आहे. संध्याकाळी मी काही वेळ माझ्या परिवारासाठी राखून ठेवते आणि त्या वेळेत मी माझे इमेलसुद्धा वाचत नाही. मी जेंव्हा माझ्या दिवसाची सुरुवात करते तेंव्हा माझ्याकडे दोन-तीन गोष्टींची यादी असते, ज्या मला त्या दिवसामध्ये पूर्ण करायच्या असतात. अशा पद्धतीने मी स्वतःला मानसिक स्तरावर तयार करते, जेणेकरून मला खात्री असते की मी सर्व आघाड्यांवर पुढे राहून योग्य रीतीने काम करत आहे. मला माहित आहे की अशा काही गोष्टी आहेत ज्या मी नाही करू शकत, पण मी त्या गोष्टींसाठी स्वतःला त्रास करून घेत नाही. त्याऐवजी मी काय करू शकते आणि कुठल्या गोष्टी मला पूर्ण करायच्या आहेत ह्यावर माझे लक्ष केंद्रित करते.

वाचन हे आरामदायक आहे

मी खूप अधाशी वाचक आहे. मी खूप कथा- कादंबऱ्या व कधी कधी आत्मकथासुद्धा वाचते. मी खूप सारे ब्लॉग्स व इंटरनेटवर प्रकाशित झालेले साहित्य देखील वाचते. नुकतेच मी ‘द बुक थीफ’ हे पुस्तक वाचले जे मला प्रचंड आवडले.

    Share on
    close