‘रंग सखी मंच सखी’ कार्यक्रमात संगीत सभेबरोबरच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

0

जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला ७ मार्च २०१७ रोजी 'स्वरमंथन कला अकादमीच्या' वतीने पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘रंग सखी मंच सखी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संगीत सभेबरोबरच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या प्रार्थनेने व विठुरायाच्या गजराने झाली. या कार्यक्रमात माननीय श्रीमती शकुंतला ठाकूर, श्रीमती वर्षा ठाकूर, पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, युवर स्टोरी मराठी च्या संपादिका नंदिनी वानखडे -पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.


“केवळ एक रश्मी करंदीकर, एक मीरा बोरवणकर आणि एक किरण बेदी असून भागणार नाही तर माझ्या तमाम भगिनींना कुठल्याही क्षेत्रात  तेवढंच सक्षमतेने काम करताना बघेन तेव्हा मला आनंद होईल. वर्षातले केवळ तीन दिवस महिलांचा मान-सन्मान करायचा, त्यांना देवी मानायचं आणि इतर वेळी मात्र त्यांची कुचंबना करायची छेडखान करायची हे चित्र पाहायला मिळते”. स्त्रिया आजही सुरक्षित नसल्याचे मतही पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी व्यक्त केले आहे त्या रंग सखी मंच सखी आयोजित महिलादिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

डॉ करंदीकर म्हणाल्या की, “सातत्याने गेल्या १० वर्षापासून मी विविध जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रमाला हजेरी लावते आहे, मात्र अजूनही महिलांच्या परिस्थितीत फारसा बदल झाल्याचं दिसून येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यात बराच बदल होण्याची आवश्यकता आहे. पुरुषांनी सुद्धा पुरुषी मानसिकतेमधून बाहेर पडून महिलांकडे संवेदनने बघण्याची गरज आहे. आपण महाराष्ट्र पुरोगामी असल्याचं म्हणतो, पण तसं चित्र फारसं दिसत नाही.” मान्यवरांच्या मनोगतानंतर शाकुन्तालाताई यांनी अध्यक्षीय समारोप केला.


या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या महिलांचा साडीचोळी,स्मृतिचिन्ह व गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सौ राणी वडगावकर (सांगीतिक कार्य)म सौ प्रज्ञा कुलकर्णी (शैक्षणिक कार्य) श्रीमती लता रानडे (जेष्ठ गायिका), सौ वंदना भदाणे (उत्तम गृहिणी) श्रीमती धनश्री साळुंखे (समाज प्रबोधन) सौ रत्नप्रभा घरत (सामाजिक कार्य), सौ शिल्पा देशपांडे (कवयित्री व गझलकार), सौ अमृता धारप लघुउद्योग, श्रीमती समिधा गांधी (वैदकीय क्षेत्र) यांचा गौरव प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आला.


संगीतसभेचा प्रारंभ होण्यापूर्वी कला अकादमीच्या संचालिका सौ भाग्यश्री देशपांडे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. वर्षभरात कला अकादमीच्या वतीने विद्यार्थी विकास प्रकल्प, उत्तम संगीताचे ग्रंथालय, वर्षातून किमान दोन सामाजिक उपक्रम अर्थात मनोरंजनातून समाज प्रबोधन असे विविध सामाजिक उपक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जन्मभूमी मराठ्वाडा असली तरी कर्मभूमी ही नवी मुंबईच आहे असेही त्यांनी नमूद केले.


संगीत सभेची सुरुवात श्रीमती भाग्यश्री देशपांडे-पाटील यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग चारुकेशीतील लाज रखो गोरी ही मध्यलयीची झपतालातील बंदिश सादर केली. त्यानंतर ‘ याद पिया कि आये’ ही ठुमरी पण विस्ताराने सादर केली. त्यांच्या या सादरीकरणाला रसिकप्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. सुप्रिया जोशी यांनी हार्मोनियम तर तबल्याची सुरेख साथ प्रसाद सुतार यांनी दिली.


त्यानंतर झालेल्या संगीत सभेत भक्तीगीत, भावगीत, गझल, नाट्यगीत, गवळण, पोवाडा व जोगवा असे गाण्यातील विविध प्रकार सादर केले. यामध्ये सहभागी झालेल्या महिला कलावंत सौ राणी वडगावकर, अमृता धारप, जयश्री पुजारी, केतकी कुलकर्णी, स्नेहल चव्हाण, श्रद्धा चव्हाण, कल्पना सावंत, जयश्री पुंड, सोनम उंबरकर, सविता म्हात्रे व रूपा चपळगावकर यांनी रसिकांची मने जिकली.


कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मिले सूर मेरा तुम्हारा, कैवल्याच्या चांदण्याला, पोटापुरते देई विठठला व अवघा रंग एकची झाला या जोड भैरवीने सांगता केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा कुलकर्णी यांनी केले.

 या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.