महाराष्ट्रासह देशभरात लवकरच ई-टोल - नितीन गडकरी यांची घोषणा मेक इन इंडियाच्या यशस्वी आयोजनासाठी गडकरींकडून राज्यसरकारचे कौतुक!

0

टोल नाक्यावरील प्रवासातील व्यत्ययामुळे नागरिकांना होणारा त्रास यापुढे टळणार आहे. टोल आकारणीसाठी यापुढे ई-टोलचा पर्याय सुरू करण्यात येणार असून त्यासाठी वाहनावरच ई-स्टिकरचा वापर करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. तसेच हजारो सामंजस्य करार आणि कोट्यवधीच्या गुंतवणुकीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘मेक इन इंडिया सप्ताहा’च्या यशस्वी आयोजनातील सहभागासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. बांद्रा-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात उभारण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया सेंटर’मधील माध्यम कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते.


गडकरी म्हणाले की, देशभरात यापुढे वाहनांवर ई-स्टिकर देण्यात येतील. वेगवेगळ्या बँकेच्या मार्फत ई-स्टिकर वाहन चालकांना खरेदी करता येतील. हे ई स्टिकर पुन्हा रिचार्ज सुध्दा करता येणार आहेत. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी असणाऱ्या टोल नाक्यांवरुन आपल्या वेगात वाहनांना विना अडथळा प्रवास करता येईल. महाराष्ट्रासह देशभरातील वाहनांसाठी ही सुविधा लवकरच उपलब्ध होईल. ई-स्टिकर संदर्भात बँकांसोबत बोलणी झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आम्ही रस्ते, रेल्वे वाहतूक आणि जलवाहतूक यासंदर्भातील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करणार असून देशात ३०० रिंग रोड तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे. सोबतच देशातील जलवाहतूकीचा दर वाढविण्याचा प्रयत्न नजीकच्या काळात केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सागरी वाहतुकीसोबतच गंगा नदीसह अन्य ठिकाणीही जलवाहतुकीला प्राधान्य देणार आहे. महाराष्ट्रातील बंदरांचे बळकटीकरण आणि जलवाहतूकीला चालना देण्याचे काम नजीकच्या काळात गतीने होणार आहे. देशातील दोन हजार बंदरांचा विकास करण्यात येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.

महानगरांमधील वाहनांचे प्रदूषण लक्षात घेता देशभरातील बहुतेक महानगरांच्या सीमेवर ३५० वाहनतळे उभारण्यात येणार आहेत. याठिकाणी पेट्रोलपंपापासून ते कोल्ड स्टोरेजपर्यंतच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध राहतील. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास आणि कृषीवर आधारित आर्थिक दरवाढीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच मुंबईतील या पहिल्या ‘मेक इन इंडिया सप्ताहा’मध्ये त्यांच्या संकल्पनेचा विस्तार ठिकठिकाणी दिसून येतो. भारतीय तरुणांच्या नवनवीन प्रयोगांना या सप्ताहामध्ये स्थान मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकारने या आयोजनात निभावलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.


working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte