अनेक प्राणघातक हल्ल्यानंतरही डगमगले नाहीत, रेड लाईट भागाला स्वच्छ करण्याचा प्रयत्न आजही सुरुच!

अनेक प्राणघातक हल्ल्यानंतरही डगमगले नाहीत, रेड लाईट भागाला स्वच्छ करण्याचा प्रयत्न आजही सुरुच!

Saturday December 26, 2015,

5 min Read

सभ्यता आणि संस्कृतीचा जितका जलदगतीने विकास झाला आहे, तितकाच विकास समाजात वाईट गोष्टींचा देखील झाला आहे. अशा गोष्टींचे स्वरूप बदलले असले तरी, आकार वाढला आहे. देह व्यापार समाजाच्या मुळापर्यंत अद्यापही कायम आहे. समाजातील या कलंकित गोष्टीला मुळापासून हटविण्यासाठी अनेक संघटना यासाठी काम करत आहेत, मात्र वाराणसीला राहणारे अजित सिंह आपली संघटना ‘गुडिया’ मार्फतवेगळ्या पद्धतीने रेडलाईट भागात काम करत आहेत. हा त्यांच्याच प्रयत्नांचाच परिणाम आहे की, आज या भागात अल्पवयीन मुली देहव्यापारात नाहीत. स्वतःवर अनेक प्राणघातक हल्ले झाल्यानंतरही अजित यांनी मानवी तस्करीशी संबंधित जवळपास दीड हजारपेक्षा अधिक खटले लढविले आहेत. इतकेच नव्हेतर, देह व्यापाराच्या या व्यवसायाला लगाम घालण्यासाठी ते केवळ रेडलाईट भागाशी संबंधित मालमत्तेला न्यायालयात खेचतात, तसेच अशा चुकीच्या कामात जे दलाल आहेत, त्यांना न्यायालयातून जामीन मिळू देत नाहीत. युपीच्या पूर्वांचल भागात काम करणारे अजित आज जवळपास १२ जिल्ह्यात काम करत आहेत.

image


अजित यांच्यामते, त्यांनी देहव्यापारात असलेल्या महिलांना काढण्याचे कुठून प्रशिक्षण घेतले नाही आणि कुठले शिक्षणही घेतले नाही. ते केवळ एकदा हिम्मत करून वाराणसीच्या रेडलाईट भागात गेले. अजित ‘युअर स्टोरी’ला सांगतात की, “आयुष्यात पहिल्यांदा मी अशी जागा पाहिली जेथे लोक खुलेआम निलाम होत होते आणि त्यांना कुणीही थांबवणारे नव्हते.”

त्यानंतर अजित तेथे गेले आणि एका झाडाखाली बसून तेथे उपस्थित असलेल्या छोट्या छोट्या मुलांना एकत्रित करून प्रत्येक दिवशी दोन तास शिकविण्याचे काम करायला लागले. ही बाब या भागात राहणा-या लोकांना पचली नाही, तेव्हा त्यांनी अजित यांना त्रास द्यायला सुरुवात केली. मात्र, त्यांनी हार पत्करली नाही आणि मुलांना शिकविण्याचे काम सुरु ठेवले. याप्रकारे जवळपास ५-७ वर्षापर्यंत मुलांना शिकविण्याचे काम सुरु ठेवले. तेव्हा त्यांना एक गोष्ट समजली की, ज्या मुलांना ते शिकवत आहेत, ते परतून त्याच वातावरणात जात आहेत, त्यामुळे त्यांना केवळ शिक्षित केल्यानेच बदल होणार नाही.

image


तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की, त्यांना रेडलाईट भागात राहणारे मालक, देह व्यापारमध्ये असलेल्या महिलांच्या दलालांसोबत झगडावे लागेल. त्यासाठी त्यांनी कायद्याची मदत घेतली. त्या व्यतिरिक्त या कामात जेथे पोलिसांचे ढिसाळ कामकाज दिसले, तेथे त्यांनी तोंड दिले. अजित यांनी रेडलाईट भागात येणा-या नव्या मुलींना वाचविण्यासाठी बीएचयू आणि दुस-या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली. ज्यांच्यासोबत मिळून ते अशा रेडलाईट भागात जातात जेथे मुलींना जबरदस्तीने या व्यापारात ढकलण्याचा प्रयत्न केला जात होता. ते सांगतात की, वर्ष २००५ मध्येच त्यांनी लोकांच्या मदतीने बंगाल आणि नेपाळ मधून आणण्यात आलेल्या जवळपास ५० मुलींना या व्यापारात जाण्यापासून वाचविले. त्याव्यतिरिक्त अजित यांनी रेड लाईट भागात राहणा-या महिलांवर लक्ष ठेवणे सुरु केले, जे आपल्या मुलीला जबरदस्तीने किंवा दबावात आणून या व्यापारात ढकलत होते.

image


अजित यांनी पाहिले की, याप्रकारे अधिक वेळेपर्यंत काम केले जाऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी कायदेशीररित्या रेडलाईट भागातील मालक आणि दलाल यांच्यावर दबाव वाढवला. त्यानंतर त्यांनी वाराणसीचे अनेक रेडलाईट भाग बंद केले. या कामात असलेल्या लोकांची जामीन रोखण्यासाठी अजित आपली लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यत घेऊन गेले. जेथे या कामात सर्वोच्च न्यायालयाने देखील मदत केली आणि सांगितले की, अशा लोकांना जामीन होऊ नये. हेच कारण आहे की, आतापर्यंत अजित यांनी जवळपास ५०० लोकांची जामीन रद्द केली आहे, जे देह व्यापारात सामील आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांनी साक्षीदारांच्या सुरक्षेकडे देखील विशेष लक्ष दिले, जेणेकरून मुली न घाबरता स्वतःवर होणा-या अन्यायाबाबत सांगू शकतील. त्यांनी १०८ मुलींना अशा ठिकाणी लपवून ठेवले, जे एखाद्या प्रकरणात महत्वाच्या साक्षीदार होत्या आणि त्यांच्यावर हल्ल्याची भिती होती. त्यानंतर या मुलींच्या साक्षीमुळे देह व्यापाराशी संबंधित लोकांना तुरुंगाची हवा देखील खायला लागली. अजित यांचे म्हणणे आहे की, “आम्ही रस्ता शोधत होतो, अशा मुलींना वाचविण्यासाठी, त्यासाठी आम्ही जास्त वाट पाहू शकत नव्हतो. त्यासाठी आम्ही केवळ अवैधरित्या चालणा-या रेडलाईट भागाला बंद केले, तसेच आरोपींची जामीन रोखण्याचे देखील काम केले. सोबतच साक्षीदारांची सुरक्षा करण्याचे काम केले.”

image


अजित येथेच थांबले नाहीत तर, त्यांनी ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात नेली आणि त्यांनी आतापर्यंत ११ जनहित याचिका(पीआयएल) दाखल केल्या आहेत. आपल्या एका जनहित याचिकेत त्यांनी न्यायालयाला सांगितले की, सरकारी आकड्यां व्यतिरिक्त १२ लाख अल्पवयीन मुली विभिन्न रेडलाईट भागात बंदिस्त आहेत. आज अजित मानवी तस्करीबाबत विभिन्न न्यायालयात चालणा-या जवळपास दीड हजार प्रकरणांचा एकटे सामना करत आहेत. अजित यांनी आपली संस्था ‘गुडिया’ ची सुरुवात वर्ष १९९३ मध्ये केली. मात्र ते यापूर्वीपासूनच हे काम करत आहेत. देह व्यापाराला रोखण्यासाठी ‘क्राय’ने त्यांना शिष्यवृत्ती देखील दिली. त्यांच्या कामाच्या पद्धतीला जाणून घेण्यासाठी अमेरिकन कॉंग्रेसच्या अनेक सदस्यांनी बनारसच्या रेडलाईट भागाचा दौरा देखील केला आहे. जेथे त्यांनी सांगितले की, कशाप्रकारे त्यांनी या भागाला अल्पवयीन मुलींना रेडलाईट भागातून मुक्त केले. काही वर्षापूर्वी पर्यंत या भागात मोठ्या संख्येत अल्पवयीन मुली देह व्यापारात सामील होत्या. आता त्यांचा प्रयत्न या व्यापारात फसलेल्या मुलींना कशाही प्रकारे बाहेर काढण्याचा आहे.

image


आज ‘गुडिया’मार्फत रेडलाईट भागात केवळ शिक्षणाचेच नव्हे तर, येथील मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देखील दिली जाते. त्यामार्फत संगणकाचा अभ्यासक्रम, फॅशन डिजाइनिंग आणि ब्यूटिशनचा अभ्यासक्रम शिकविला जातो. त्या व्यतिरिक्त हे लोक परिचारिकेचा देखील अभ्यासक्रम शिकवितात. ही सर्व कामे मोफत करण्यात येतात. हे ज्या मुलींना शिकवितात त्यांना ते केवळ सरकारी शाळेतच दाखल करत नाहीत तर, त्यांचे शुल्क आणि पुस्तकांचा खर्च देखील हेच उचलतात. यांनी आतापर्यंत दोन हजारापेक्षा अधिक मुलांचे भविष्य सावरले आहे. येथील अनेक मुलींनी आपले दुकान उघडले आहे, किंवा ते दुस-या दुकानात काम करत आहेत. अजित यांच्या प्रयत्नामुळे वेश्यावृत्ती व्यापारातून आतापर्यंत दीड हजारपेक्षा अधिक मुलींना वाचविण्यात आले आहे. अजित यांच्यावर आज अनेक प्राणघातक हल्ले झाले आहेत, मात्र आजही अजित रेडलाईट भागातील अशा मुलींना वाचविण्याचे आणि त्या लोकांना जे या मुलींना अशा भागात जबरदस्तीने आणतात, त्यांच्याविरोधात कायद्यामार्फत शिक्षा देण्याचे काम करत आहेत.

लेखक : हरिश बिश्त

अनुवाद : किशोर आपटे.