“पंकजा मुंडेंची व्यक्तिरेखा साकारणे हा अविस्मरणीय अनुभव ” - अभिनेत्री श्रृती मराठे

0

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर आधारित संघर्षयात्रा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. साकार राऊत यांचे दिग्दर्शन असणाऱ्या या सिनेमात अभिनेता शरद केळकर गोपीनाथ मुंडेची भूमिका साकारतोय यासोबतच मुंडेचे कुटुंबही या सिनेमात दिसणारे. या कुटुंबातलीच एक महत्वाची व्यक्ति म्हणजे मुंडे यांची कन्या आणि आजचे युवा राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे पंकजा मुंडे.

सध्या ग्रामविकास आणि महिला बाल कल्याण मंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या पंकजा यांचा राजकीय प्रवास हा मुंडे हयात असताना सुरु झाला आणि आजही तो अविरत सुरु आहे. संघर्षयात्रा सिनेमामध्ये पंकजा आणि गोपीनाथजी यांच्यातली वडिल आणि मुलीचे भावबंध पहायला मिळतील शिवाय पंकजा यांची राजकीय जडण घडणही दिसणारे. अशा या पंकजाताईंची भूमिका सिनेमात साकारतेय अभिनेत्री श्रृती मराठे.

मराठीतली आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी श्रृती या भूमिकेबद्दल जेवढी उत्साही आहे तेवढीच ही भूमिका साकारण्यामागची जबाबदारीही ती चांगल्या पद्धतीने जाणते. जनमानसामधले पंकजा ताईंचे आदराचे स्थान ती चांगलेच ओळखते. श्रृती सांगते की मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारले गेले तेव्हा मला फक्त पंकजा मुंडे ही नव्याने उद्याला येणारी एक युवा राजकारणी म्हणून माहित होती, मात्र त्यांची भूमिका साकारताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खोलवर पैलू मला समजू लागले. त्यांचे बालपण, शिक्षण, त्यांची सामाजिक आणि राजकीय जडणघडण जाणून घेता आली जे माझ्यासारख्या युवा कलाकारासाठी आणि इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

गोपीनाथजी हयात असतानाच पंकजा या निवडणुकीत उतरल्या होत्या, त्या निवडूनही आल्या पण गोपीनाथजींच्या अपघाती निधनानंतर खऱ्या अर्थानं पंकजा मुंडे यांच्या सामाजिक तसेच राजकीय विचारांची नोंद समाजाने घ्यायला सुरुवात झाली असे श्रृतीला वाटते. ही भूमिका साकारताना श्रृतीला पंकजाताईंचे मार्गदर्शन मिळाले असेल असे तुम्हाला वाटेल पण प्रत्यक्षात असे घडले नाही.

संघर्षयात्रा या सिनेमाशी मी जेव्हा जोडले गेले तेव्हा माझ्या दुदैवाने माझी आणि पंकजाताईंची भेट घडू शकली नाही कारण तोपर्यंत त्या मंत्री झाल्या होत्या आणि त्यांच्यावरचा कामाचा व्यापही वाढलेला, पण तरीही त्यांच्या जवळच्या लोकांशी बोलून तसेच सोशल नेटवर्किंग साईटवरचे त्यांचे व्हिडिओ बघत मी ही भूमिका साकारायचा प्रयत्न केला. त्यांच्यातला उत्तम वक्ता, निर्भिडपणा, जिज्ञासूवृत्ती ही या व्हिडिओमध्ये आवर्जून पहायला मिळते. शिवाय काही वर्षांपूर्वी तप्तपदी या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान पंकजाताईंना भेटण्याचा योग एकदा मला मिळाला. त्यावेळी त्यांच्याशी बोलणे झाले होते. माझ्या या भुमिकेचा अभ्यास करताना भेटीतल्या अनुभवांचा मी पुरेपूर वापर केला.

चरित्रात्मक सिनेमे जेव्हा बनवले जातात तेव्हा त्या व्यक्तिरेखांचे दिसणे, त्यांचे चालणे बोलणे या सर्वांकडे काटेकोर लक्ष दिले जाते. म्हणजे मग त्याचे जनतेसमोरचे भाषण, त्यांचे हिरीरीने बोलणे, गोपीनाथजींसोबतचे त्यांचे नाते, या सर्व बाजूंचा नीट अभ्यास करत पंकजाताईंची व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न श्रृतीने केलाय.