तरुणांच्या विविध संकल्पनांचा प्रशासकीय कामकाजात निश्चित अवलंब करणार - मुख्यमंत्री

1

राज्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांमध्ये तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या फेलोंशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात चर्चा केली.

प्रशासनाला तरुणांकडून नवनव्या संकल्पना मिळाव्यात, प्रशासन आणि तरुणांमध्ये सुसंवाद वाढावा आणि तरुणांचा सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्राशी संपर्क वाढावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली सीएम फेलोशिप योजना यशस्वी होताना दिसत आहे. या योजनेसाठी निवडण्यात आलेल्या तरुणांच्या विविध संकल्पनांचा प्रशासकीय कामकाजात निश्चितच अवलंब केला जाईल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


मुख्यमंत्री कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राज्यभरातील कल्पक अशा ४४ फेलोंची निवड करण्यात आली असून मागील ७ महिन्यांपासून ते कार्यरत आहेत. या कालावधीतील आपले अनुभव यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, विविध क्षेत्रांचा विकास करताना तो शाश्वत होईल यावर भर देण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये शाश्वत काम करण्याबरोबरच लोकांची मानसिकता बदलण्यावर भर देण्यात येत आहे. जलयुक्त शिवारमधून जी गुंतवणूक करण्यात येत आहे, त्यामधून शेतीचा शाश्वत विकास होऊ शकेल.


या कार्यक्रमामुळे प्रशासकीय कामकाज जवळून पाहण्याची व त्यामध्ये योगदान देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व फेलोंनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

संग्रामपूर तालुक्यात 'मागेल त्याला शेततळे' योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तेथील लोकांनी या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे. तसेच या योजनेच्या यशस्वितेसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून फेलो नेमण्यात आले असल्याने लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या या धोरणाचे स्वागत आणि कौतूक केले असल्याचा अनुभव तिथे कार्य करणाऱ्या फेलोंनी यावेळी सांगितला.