कर्करोगावर मात करुन फिनिक्सभरारी घेणाऱ्या लीसा रे

कर्करोगावर मात करुन फिनिक्सभरारी घेणाऱ्या लीसा रे

Monday November 30, 2015,

4 min Read

मॉडेल, बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटातील अभिनेत्री म्हणून करियर घडविलेल्या लीसा रे, यांच्या आयुष्याचा प्रवास स्वप्नवत सुरू होता. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या लीसा रे यांचे आयुष्य एका आजारामुळे अचानक पालटून गेले. लाईमलाईटमध्ये असलेल्या लीसा रे यांना कर्करोगाने ग्रासले होते. मात्र त्यांनी सुरुवातीपासूनच या आजारापुढे झुकण्यास नकार दिला आणि या आजारातून त्या सुखरुप बाहेर पडल्या. कर्करोगाशी यशस्वी झुंज देणाऱ्या लीसा रे यांनी अनेक कर्करोग्यांसमोर आदर्श ठेवला आहे. लीसा रे यांची रियल लाईफ स्टोरीदेखील बॉलीवूडच्या एका पटकथेप्रमाणेच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजल्या गेलेल्या अभिनेत्री लीसा रे यांनी अनेक चित्रपटात आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. कॅनडा येथे एका पोलीश मातेच्या पोटी जन्मलेल्या लीसा यांचे वडिल भारतीय होते. कॅनडा येथेच त्यांचे बालपणदेखील व्यतित झाले. भारतात सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या लीसा रे यांना मॉडेलिंग विश्वाची ओळख येथेच झाली. त्यानंतर त्यांनी भारतात एक यशस्वी मॉडेल म्हणून कारकिर्ददेखील घडविली. याशिवाय ऑस्करसाठी नामांकन झालेल्या कॅनडाच्या ʻवॉटरʼ चित्रपटात त्यांनी भूमिकादेखील साकारली होती. २००९च्या उन्हाळ्यात लीसा यांनी मल्टीपल मायलेमा (हा एक कॅन्सरचा प्रकार आहे) झाल्याचे तपासाअंती सिद्ध झाले.

image


ʻमला माहित होते की, बऱ्याच दिवसांपासून काहीतरी चुकतयं. मात्र माझे व्यक्तीमत्व अशा प्रकारचे होते की, कर्करोगाचे निदान झाल्यानंतर मला माझ्या आयुष्यात गरजेचे बदल करावे लागले.ʼ, असे लीसा सांगतात. प्रथमदर्शी तपासात कर्करोगाचे निदान झाल्यानंतर लीसा यांना धक्का बसला होता. त्याची परिणीती म्हणजे लीसा यांनी हे सत्य नाकारले. मात्र अखेरपर्यंत आशा गमावली नसल्याचे लीसा सांगतात. इतरांना काही मदत होऊ शकेल, यासाठी मी माझ्या अनुभवांमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, असे त्या सांगतात. लीसा पुढे सांगतात की, ʻमाझ्या वडिलांचे माझ्यावरील निर्विवाद प्रेम आणि बिनशर्त पाठिंबा ही माझी जमेची बाजू होती. जेव्हा माझ्यावर स्टेम सेल ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया होणार होती, तेव्हा रुग्णालयातील माझ्या खोलीत ते माझ्या कॉटशेजारी झोपायचे. त्यांच्या या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले. मी त्यांचे बरेच काही देणे लागते.ʼ, असे लीसा सांगतात. याशिवाय जगभरातील चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा यामुळेच मी कर्करोगावर मात करू शकले, असे त्या सांगतात. प्रामुख्याने भारतातील चाहत्यांनी त्यांना कर्करोगावर मात करण्याची प्रेरणा दिली. प्रार्थनेवर माझा विश्वास आहे, असे लीसा सांगतात. ʻआयुष्य हे माझ्यासाठी आहे, माझ्याविरोधात नाहीʼ, या मूलमंत्रावर लीसा यांचा विश्वास होता. त्या सांगतात की, ʻमी भरपूर जिद्दी होते. मला असे आडमरण येणार नाही, असा माझा विश्वास होता. मात्र हा प्रवास सोपा नसणार, याची मला पुरेपुर कल्पना होती. यातून बाहेर पडण्यासाठी मी पुष्कळ मेहनत घेतली. ध्यानधारणा, सकारात्मक विचार आणि कर्करोगावरील उपचार यामुळेच मी यातून बाहेर पडले. वाईट कर्मामुळे अशा गोष्टी घडतात, असे काही मला वाटत नाही.ʼ

image


जुलै २०१० मध्ये अखेरीस लीसा यांना रोगमुक्त घोषित करण्यात आले. कर्करोगावर मात करणे, हे सोपे नक्कीच नाही मात्र अशक्यदेखील नाही, असे लीसा सांगतात. कर्करोगावरील उपचार घेतानाचा कालावधी हा माझ्यासाठी अवघड होता. मात्र लिखाण आणि विनोदबुद्धीने मला मदत केली. ʻअनेकदा मी फक्त रडायचे आणि या दुःखातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायचे.ʼ, असे त्या सांगतात. कर्करोगावरील पर्यायी उपचारपद्धती याबाबत त्यांनी शोध घेतला. कर्करोगातून मुक्त होण्यासाठी लीसा यांनी त्यांच्याशी संपर्कदेखील साधला. कर्करोगावर मात करुन पुर्ववत आयुष्य जगताना कसे वाटते, याबाबत विचारले असता लीसा सांगतात की, ʻमला आता स्वतःबद्दल अधिक आरामदायी वाटते. काम आणि प्रमाणीकरण महत्वाचे नाही. मी नेहमीच माझ्या लयीने काम केले आहे. तुमची आवड शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंर्तमनात पाहता आले पाहिजे, असे मला वाटते. मला अभिनयाची आवड आहे. याशिवाय मला लिखाणाची आणि व्यावसायिक उपक्रमांचीदेखील आवड आहे. मी वयाच्या १६व्या वर्षापासून काम करत आहे. व्यवसायात एवढी प्रदिर्घ कारकिर्द घडविणे, निश्चितच कठीण आहे. माझ्या मते, मी जे स्वतः नियम आखले आहेत, त्यानुसारच मी माझा प्रवास साध्य करणार आहेʼ, असे लीसा सांगतात. ʻअनेक अनुभव माझ्या या सध्याच्या आयुष्यात माझ्या गाठीशी आहेत, असे मला वाटायचे. परिणामी मला या सर्व गोष्टी सहजरित्या घेणे गरजेचे आहे.ʼ, असे त्या सांगतात. सध्या त्या टोरंटो येथे त्यांच्या योगा स्टुडियोमध्ये व्यस्त आहेत. तसेच जगभरातील मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे, मुंबईतील घराचे नुतनीकरण करणे, आगामी चित्रपटातील भूमिका आणि डीएनए करिता स्तंभलेखन करणे, अशी कामे त्या करत आहेत. मॉडेलिंगव्यतिरिक्त ‘More Beautiful for Having Been Broken’ नामक प्रेरणादायी संवाद त्या साधतात. याशिवाय इनसाईड व्हॅकेशनसाठीच्या त्या ग्लोबल ब्रॅंड एम्बॅसेडरदेखील आहेत आणि भारतातील प्रवासाला त्या प्रोत्साहन देतात. त्यांच्या ʻBeauty Gives Backʼ नामक राष्ट्रीय कर्करोग मोहिमेचे नुकतेच कॅनडा येथे अनावरण करण्यात आले. याव्यतिरिक्त गेल्या काही वर्षांपासून लीसा कॅनडा येथे कर्करोग्यांमध्ये सजगता निर्माण करण्याचे काम करत आहेत. तसेच भारतात या क्षेत्रात अधिक काम करणे, गरजेचे आहे, असे त्यांना वाटते. लीसा सांगतात, ʻकॅन्सर इन्सिस्ट्युटमधील अनेक लोकांशी मी चर्चा करते आणि आम्ही सर्वात पहिल्यांदा आमचे धोरण निश्चित करणार आहोत.ʼ कर्करोगाबद्दल लोकांमध्ये सजगता निर्माण करणे, हे त्यांच्या आयुष्यातील ध्येय आहे. लीसा सध्या त्यांच्या पुस्तकावर काम करत आहेत. लवकरच हार्पर कॉलिन्सच्या माध्यमातून ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तक लिहिण्यामागील हेतूबद्दल बोलताना त्या सांगतात की, ʻमला मनापासून लेखनाची आवड आहे. माझ्या रोगाच्या निदानाने ʻद यलो डायरीसʼ लिहिण्यासाठी मला प्रेरीत केले आणि त्याला वाचकांकडून प्रतिसाददेखील एवढा चांगला मिळाला की, मला ते पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अनेकांनी माझ्याशी करार करण्याचा प्रयत्न केला.ʼ लिखाण, अभिनय, प्रवास, कर्करोग इन्स्टिट्युटसाठी काम करणे, हॉंगकॉंगमध्ये पती आणि मुलांसोबत वेळ व्यतित करणे, या लीसा यांच्या भविष्यातील योजना आहेत.

लेखक - जय वर्धन

अनुवाद - रंजिता परब