गरीब शेतक-याचं पोर नव्हे : ‘टेक् मिलियनेअर’

रोजच्या अन्नाची ज्याला भ्रांत होती आणि त्यासाठी जीवनाचा संघर्ष त्याच्या पाचवीलाच पुजला होता . अगदी लहान वयापासून कठोर मेहनत करण्याशिवाय त्याच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. परिस्थितीने गरिबीच्या खाईत ढकललं तरी संकटांशी दोन हात करत त्याने परिस्थितीच पालटून टाकली अशा या अजिंक्यावीराचा नाव आहे वरूण चंद्रन.  एकेकाळी महाविद्यालयातून हकालपट्टी झालेला हाच विद्यार्थी आज मात्र जगभरात आपले यशाचे पंख पसरून विहरतो आहे ‘टेक् मिलियनेअर ’ म्हणूनच .

0
वरूण चंद्रन
वरूण चंद्रन

“ मला एक गोष्ट सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे, केवळ चांगले शिक्षकच तुमच्या जीवनाला आकार देतात अशातला भाग नाही. काही वेळा चांगल्या शिक्षकाचा अभाव ही परिस्थिती सुद्धा तुमच्या जीवनाला आकार देते, आणि तुम्हाला टाळलं जाणं हे तुमचं कौतूक होण्याइतकच चांगलं असू शकतं ” ज्युलिआ रॉबर्ट्स.

जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि त्यातून येणारे अनुभव हेच वरुण चंद्रनसाठी खरे शिक्षक ठरले. संघर्षमय जीवनातूनच त्यांनी प्रेरणा घेतली.

वरुण चंद्रन आज सिंगापूरच्या बाहेर टेक फर्म चालवणारे एक लक्षाधीश उद्योजक आहेत आणि जगभर त्यांचे पंख पसरत आहेत. एक काळ असा होता की जी व्यक्ती जेवणाला मोताद होती, तीच व्यक्ती आज जगभर आपल्या कर्तृत्त्वाच्या पाऊलखुणा उमटवते हे केवळ अशक्य असच आहे. पण हे कसं घडू शकतं हे वरूण यांनी दाखवून दिलं आहे.

तुम्ही त्यांची कथा वाचलीत, तर संपूर्ण कथेत तुम्हाला वरूण हे आपल्या मागच्या अत्यंत हालाखीच्या आणि वाईट दिवसांबद्दल खेद व्यक्त करताना कुठेही आढळणार नाहीत. या उलट त्यांच्या रोमांचक कथेत जगात आपलं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अतिशय उत्सुक असलेल्या नवभारताचं ओझरतं दर्शन घडेल यात शंका नाही.

सरकारी अधिका-याच्या हस्ते पदक स्वीकारताना
सरकारी अधिका-याच्या हस्ते पदक स्वीकारताना

वरूण चंद्रन यांचं वय आता 32 वर्ष इतकं आहे. या टप्प्यावर त्यांनी जगातल्या चार खंडांमध्ये काम करणा-या कॉर्पोरेट 360 या उद्योगाची उभारणी केली आहे. 

ते म्हणतात, “ केरळ राज्यात कोल्लम जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं पदम हे खेडं माझा गाव. माझे वडील शेतकरी होते. मी त्यांना त्यांच्या रोजच्या कामात मदत करायचो. यामुळं लहानपणापासूनच मला मेहनत करण्याचे धडे मिळाले. आम्हाला धड अन्न मिळत नव्हतं. आम्ही मोठ्या कष्टानं कसंबसं जगत होतो. जगणं आणि जगण्याच्या संघर्षात टिकून रहाणं यातच माझं बालपण गेलं. या परिस्थितीनुसार मी हे शिकलो की, मी जर प्रचंड मेहनत केली तरच चांगला जगू शकेन. आणि हाच माझ्या जीवनाचा नियम बनला होता. मला श्रमाचं मोल काय असतं हे उमगलं होतं.”

केरळमध्ये एका गरीब शेतक-याच्या घरात जन्मलेल्या वरूण यांनी चांगले दिवस यावेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. त्यांचे पालक केवळ इयत्ता पाचवी पर्यंतच शिकलेले होते. असं असलं तरी आपल्या मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या गावाजवळच पठाणपुरम या लहानशा शहरात असलेल्या शाळेत वरूण यांना त्यांनी दाखल करून टाकलं. शेतीच्या कामात कठोर अंगमेहनत करण्याच्या सवयीचा वरूण यांना शाळेत खेळामध्ये प्राविण्य मिळण्यासाठी मोठा उपयोग झाला. ते उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावारूपाला आले. पुढे सेंट स्टीफन एचएसएस या शाळेकडून खेळताना स्पर्धांमध्ये पदकं आणि बक्षिसं मिळवण्याचा त्यांनी धडाकाच लावला.

दहावी पास झाल्यानंतर फुटबॉल खेळण्यासाठी त्यांना केरळ सरकारनं शिष्यवृत्ती दिली. “ जर मला ही शिष्यवृत्ती मिळाली नसती तर मला माझं शिक्षण सोडावं लागलं असतं.” केरळमध्ये सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू म्हणून सुवर्ण पदक जिंकत त्यांनी त्यांच्या फुटबॉल कारकीर्दीवर ठसा उमटवायला सुरूवात केली. त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे त्यांना केरळ विद्यापीठ फुटबॉल संघ आणि केरळ युथ संघाचं कर्णधारपदही मिळालं.

फुटबालच्या मैदानात जेव्हा ते जखमी झाले तेव्हा त्यांनी सर्वात मोठा धोका पत्करण्याचा निर्णय घेतला. आणि तो धोका म्हणजे, त्यांनी फुटबॉल खेळणं सोडलं, कॉलेज सोडलं, आणि नोकरीच्या शोधात त्यांनी बंगळुरु गाठलं.

आणि ते सोपं नव्हतच.

घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती आणि कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचा त्यांच्यावर दबाव सुद्धा होता. कधीही न विसरता येणारा भूतकाळ वरूण यांना नेहमी आठवतो, ते सांगतात की, “ मला माझ्या आयुष्यात काही करता यावं म्हणून माझ्या आजीनं माझ्याकडे तिच्या सोन्याच्या बांगड्या विकण्यासाठी दिल्या. मी माझी बॅग भरली आणि घर सोडलं. ”

पदम गाव
पदम गाव

एक छोटी बॅग आणि स्वप्नाचं गाठोडं घेऊन वरूण 2002 मध्ये बंगळुरूला आले. तिथं त्यांनी इंटरनेट कॅफे कसा चालवायचा याचा अनुभव घेतला. शिवाय तिथेच तंत्रज्ञानावर आधारीत नोकरी मिळण्यासाठी जे जे शिकता येईल ते ते शिकण्याचा झपाटा लावला. त्यांची ज्ञानपिपासू वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि चांगल इग्लिश बोलता आलं पाहिजे याची त्यांना जाणीव होती मग त्यांनी शब्दकोश विकत घेतला. आपला बराच वेळ मग ते सार्वजनिक वाचनालयांमध्ये घालवू लागले. सिडनी शेल्डन आणि जेफरी आर्चरच्या कादंब-या वाचू लागले. इंग्रजी शिकण्यासाठी सीएनएन हे चॅनेल बघू लागले.

वरूण म्हणतात, “ भरपूर पुस्तकं वाचल्यानंतर एक भलं मोठ्ठं जग माझ्या गावाबाहेर आहे याची मला जाणीव झाली ” केवळ कल्पनाविलास असलेली पुस्तकं वाचून त्यांची भूक भागणारी नव्हती. त्यांनी सत्य घटनांवर आधारीत पुस्तकांचाही आधाश्यासारखा फडशा पाडला. हीच पुस्तकं त्यांची मार्गदर्शक झाली. याच वास्तववादी कादंब-यांनी त्यांना उद्योजकांचं जग काय असतं हे बघण्याची दृष्टी दिली.

वरूण म्हणतात, “ माझ्या शालेय जीवनात मी फुटबॉलपटू आय एम विजयन यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. ते माझ्यासाठी देवच होते. रस्त्यावर राहण्यापासून ते सोडा आणि शेंगदाणे विकण्यापर्यंत ची कामं करून, अथक परिश्रम करून ते भारताचे मोठे फुटबॉलपटू बनले. प्रचंड मेहनत आणि परिश्रमानं जर ते मोठं यश संपादन करू शकतात तर मी का नाही करू शकत असे विचार सतत माझ्या मनात घोळत असायचे.”


“ मी बंगळुरूमध्ये काम करत असताना सायबर कॅफेमध्ये वेळ घालवून इंटरनेटबाबत सारं काही शिकून घेतलं आणि स्वत:ला प्रोग्रॅमर म्हणून तयार केलं. या जगात काहीही अशक्य नाही यावर माझा विश्वास आहे. खरं तर, आज इंटरनेटवर हवी ती माहिती उपलब्ध असल्यामुळं तुम्ही या माध्यमाच्या आधारे बरच काही शिकू शकता. जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर सगळं काही उपलब्ध आहे.”

याच उर्मीनं त्यांनी बंगळुरूमध्ये दोन वर्ष काम केलं आणि त्यांना सिंगापूरमध्ये नोकरीची ऑफर आली. 2008 मध्ये ते सिंगापूरला रवाना झाले सुद्धा. वरूण सांगतात की ,“ सिंगापूरमध्ये अनेक सुवर्णसंधी उपलब्ध असल्याचे मला जाणवले .”

नव्या ठिकाणी काम करण वरूण यांच्यासाठी मुळीच सोपं नव्हतं. आपल्याला परिस्थिती अनुकूल कशी होईल याबाबत त्यांना सतत प्रयत्न करावे लागले. काम करत असताना त्यांनी आपलं काम अधिक सोपं व्हावं म्हणून स्वत:साठी सॉफ्टवेअर टूल कोडींग करणं सुरू केलं. ते जे काही करत आहेत ते किती महत्त्वाचं आहे याची जाणीव लवकरच त्यांच्या सहका-यांना झाली. आणि याच गोष्टीमुळं कॉर्पोरेट 360 (C360) या त्यांच्या उपक्रमाचा जन्म झाला. “ लोक बिग डेटाबाबत सतत बोलत असताना मी नेहमी ऐकलय. लोक मला विचारायचे: कंपनीचा विकास व्हावा आणि विक्रीत वाढ व्हावी यासाठी वेबवर हा सगळा डेटा आम्ही कशा प्रकारे वापरू शकतो? ”

त्यांच्या कंपनीनं टेक उद्योगांसाठी नाविण्यपूर्ण सेल्स इंटेलिजन्स सॉफ्टवेअर सुरू केलं. जगातल्या सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी काही कंपन्या आणि त्याबरोबरच अगदी नव्यानं सुरू झालेल्या टेक कंपन्या C360 च्या ग्राहक आहेत. वरुण म्हणतात, “ ब-याच कंपन्या बिग डेटा आणि विपणन पद्धतींच्या भवितव्याबद्दल बोलतात, त्याबाबत विश्लेषणही करतात, मात्र ते विशिष्ट उद्योग डोळ्यासमोर ठेवून डिझाईन करण्यास तयार नाही.” त्यांच्या नियम प्रणालीची (अल्गोरीथम्स) रचना व्यावहारिक डेटा नव्याने तयार करण्यासाठी केली जाते आणि म्हणून वेब संदर्भातील व्यवहार सामान्य डेटा निर्देशक उपलब्ध करण्यासाठी केली जाते. वरूण याबाबत अधिक माहिती देताना सांगतात, “ग्राहकांच्या सोईनुसार, गरजेनुसार आम्ही उद्योग समर्पक विक्रीची विशिष्ट स्थिती उपलब्ध करून देतो. यामुळं त्यांना योग्य वेळी योग्य लोकांसाठी, योग्य संदेश असलेली आणि सोबतच मोठ्ठं लक्ष असलेली विक्री मोहीम तयार करण्याची क्षमता प्राप्त होते.”

‘टेक सेलक्लाऊड’ हे क्लाऊड सॉफ्टवेअर हेच कंपनीचं मुख्य उत्पादन आहे. हे उत्पादन आयटी मार्केटर्सना बीग डेटा, पॅटर्न्स, सूचक विश्लेषण, स्पर्धात्मक बुद्धिमत्ता, कॉन्ट्रॅक्ट्स इंटलिजन्स, वेब अनालिसिस आणि आयटी संशोधन अशा गोष्टींनी युक्त असलेली व्यापक अशी मार्केटींग कँपेन डेटा सर्विस देता यावी यासाठी टेक सेलक्लाऊड हे उत्पादन तयार करण्यात आलं आहे.

वरूण चंद्रन यांची टीम
वरूण चंद्रन यांची टीम

“ कंपन्यांनी सीआरएम आणि मार्केटिंग ऑटोमेशन टूल्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्या आहेत. पण हे टूल्स योग्य डेटा सेट्सोबत जोडले गेले तरच आपली सर्वोत्कृष्ट क्षमता देऊ शकतात. आमचा सेल्सक्लाऊड डेटा प्लॅटफॉर्म मार्केटींग टूल्सना शक्ती देण्याचं काम करतो. याबरोबर सध्याच्या गुंतवणूकीवर जास्तीतजास्त परतावा देण्यासाठी पुरक ठरेल असा सेल्स इंटेलिजन्स डेटासुद्धा या प्लॅटफॉर्मसोबत उपलब्ध करण्यात आला आहे.”

यालाच जोडून ते म्हणतात, “ आम्हाला हे जाणवलं की, टार्गेट बेस आणि थोडाच परतावा देणा-या लिस्ट खरेदीवर खर्च केलेल्या मार्केटिंग बजेटच्या मोठ्या भागात होणा-या सततच्या बदलांना टिपण्यासाठी आयटी मार्केटर्सना संघर्ष करावा लागत आहे. म्हणून मग आम्ही या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि या समस्या सोडवता याव्यात यासाठी टेक्नॉलॉजी मार्केटर्ससाठी अभिनव अशी ‘डेटा-अज-ए-सर्विस’ ही पहिली वहिली संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. रिअल टाईम डेटा रिफ्रेश आणि विशेष डेटा मेंटनन्ससोबत सबस्क्रिप्शन मॉडेल म्हणून सेल्सक्लाऊड आयटी-मार्केटिंग डेटा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे.”

दोन वर्षं इतकंच वय असलेली या कंपनीनं नुकतच मिलियन डॉलर मार्क ओलांडला आहे. इतक्यावरच न थांबता कंपनीनं मोठ्या योजनाही आखल्या आहेत. यावर्षी 5 मिलियनचा महसुल गोळा करायचा असं कंपनीनं आपलं लक्ष ठरवलय. याबरोबरच टीमचा आकार 30 पर्यंत वाढवणं, डेटा सेट वाढवणं आणि अमेरिका, युरोप अशा ठिकाणी नवी कार्यालयं सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनाही कंपनीनं आखल्या आहेत.

ही वाटचाल करत असताना वरूण यांनी आपल्या योजनेच्या मार्गाला फाटा दिला आणि केरळमध्ये आपलं स्वत:चं गाव असलेल्या पठाणपुरम इथं एक कार्यालय उघडलं. वरूण म्हणतात, “ माझ्या स्वत:च्या गावातल्या लोकांना संधी उपलब्ध व्हाव्यात अशी माझी इच्छा होती. आमच्यात प्रतिभा किंवा कर्तृत्वाचा अभाव कधीच नव्हता, अभाव होता तो संधीचा. तिथे माझ्या सारखे पुष्कळ असतील, ज्यांना जीवनात काहीतरी करून दाखवायचं आहे. मी त्यांच्या मागे जात आहे. तिथं आम्हाला समाधान देईल असं काम आणि प्रामाणिक टीम उभी केलेली आहे. ”

सुरूवातीच्या दिवसांची आठवण काढत वरूण आपण जे शिकलो त्या बद्दल सांगतात : “ जिज्ञासू बना, जिज्ञासूपण जतन करा आणि मग पहा सर्वकाही शक्य होत जातं. ही सतत घडणारी प्रक्रिया आहे, पण आपल्याला प्रत्येक दिवशी सकारात्मक कसं राहायचंं हे शिकण्याची गरज आहे. ”

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories