मांसाहार करणाऱ्यांसाठी ताजे पदार्थ पुरवणाऱ्या 'लिशिअस'ची देशभरात विस्ताराची योजना

मांसाहार करणाऱ्यांसाठी ताजे पदार्थ पुरवणाऱ्या 'लिशिअस'ची देशभरात विस्ताराची योजना

Thursday October 22, 2015,

5 min Read


“ जेव्हा मी भारतात आलो तेव्हापासून शाकाहारी झालो ”, अशी घोषणा अभय हंजुराच्या एका मित्रानं केली, पण उत्कृष्ट आणि चवदार मांसाहारी पदार्थ मिळणाऱ्या भारतात आपल्या मित्राला असं का वाटलं याचं अभयला आश्चर्य वाटलं. खोलात जाऊन चौकशी केली असता भारतात मिळणाऱ्या मांसाहारी पदार्थांच्या दर्जाबाबत या लोकांमध्ये संभ्रम असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

ताजं मांस पुरवणाऱ्या लिशिअसची सुरूवात अभय आणि त्यांचे मित्र विवेक गुप्ता यांनी केली. विवेक यांनी निधी उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यांमध्ये ऑपरेशन्स, वेतन श्रेणी आणि व्यूहनीती या क्षेत्रात काम केलं आहे. तर अभय हे फ्युचरिस्क जोखीम सल्लागार आणि कॉर्पोरेट विमा ब्रोकरेज कंपनीत वरीष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम करतात.


image


उपाध्यक्ष आणि सह संस्थापकासमोर सादरीकरण

आपापल्या नोकऱ्यांमध्ये स्थिर असताना अभयच्या मनात एकदिवस अचानक मांसाहाराच्या व्यवसायात स्टार्टअप सुरू करण्याची कल्पना आली. त्यांनी एकदा मागवलेले कोकरुचे मांस आणि भाजलेला मासा बेचव लागल्याने ताजं मांस पुरवण्याची ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्णय झाला.

कर्मचाऱ्यांसोबत साधलेल्या संवादातून त्यांना ते गोठवलेले मांस वापरत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि अभय अनेकवेळा विवेक यांना जे सांगत होते त्यावर शिक्कामोर्तब झालं. “ पण उपाध्यक्षांसोबत एवढी वर्ष राहिल्यानंतर माझ्या एक गोष्ट लगेच लक्षात आली की मी हे गांभीर्यानं बोलत नाहीये असं विवकेला वाटल्यानं त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं,” असं अभय सांगतात.

पण आपल्याला जे वाटतंय त्यावर अभय ठाम होते म्हणून त्यांनी संशोधन करण्याचा निर्णय घेतला. मांसाहारी पदार्थ विकत घेण्यापूर्वी ग्राहक काय विचार करतात हे शोधण्यासाठी त्यांनी गुरगाव आणि बंगळुरूमध्ये संशोधन सुरू केलं. संपूर्ण बाजारपेठेचा आणि जागेचा आढावा घेतल्यानंतर अभय यांनी सादरीकरण तयार केलं आणि विवेक यांची ऑफिसमध्ये भेट घेतली.

“ सादरीकरणानंतरच मी याबाबत किती गंभीर आहे हे विवेकला समजलं. या व्यवसायाकडे आतापर्यंत कोणीही लक्ष दिलेले नाही, हा व्यवसाय अजूनही संघटित झालेला नाही त्यामुळे एक मोठी संधी असल्याचं विवेकच्या लक्षात आलं’’ असं अभय सांगतात. जेव्हा या दोघांनी आपापले बॉस कवलजीत सिंग आणि प्रवीण दास यांना ही कल्पना सांगितली तेव्हा त्यांनी तातडीनं गुंतवणूकदार होण्याचं मान्य केलं.

मित्राच्या अपार्टमेंटमधून इंदिरानगरच्या जागेत

या दोघांनी आपलं पहिलं ऑफिस एका मित्राच्या अपार्टमेंटमध्ये सुरू केलं. “ या बाजारपेठेतील समस्या सोडवावी लागेल असं आम्हाला जाणवलं पण मांस भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यानं त्याची समस्या नव्हती. त्यामुळे आम्ही ब्रँडचा मार्ग निवडला कारण हा ग्राहककेंद्रित व्यवसाय आहे आणि तुम्ही त्याला दिलेलं ब्रँडचं आश्वासन पाळलं तर तो कायम तुमच्यासोबत राहतो,” असं अभय म्हणतात.

या निर्णयामुळे ते बाजारपेठेतील सर्वोत्तम ब्रँड सल्लागाराच्या संपर्कात आले आणि त्यानंतर फ्रेस्कमीट, चॉपशॉप३६५,पापाबुचर आणि चॉम्पबॉक्स यासारख्या तीनशे ब्रँड्सपर्यंत त्यांना पोहोचता आलं. यानंतर त्यांनी इतरांनी निवडलेला मार्ग न धरता आपला मार्ग निर्माण केला आणि फक्त ताजं आणि दर्जेदार मांस पुरवण्याचा निर्धार केला.

सक्षम पायाभूत घटकांवर काम

आपली एक कोअर टीम असणं महत्त्वाचं आहे याची या दोघांना जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी लगेचच तज्ज्ञ आणि अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांची टीम तयार केली. अभय सांगतात की त्यांनी सुरूवातीला त्यांचा वेळ, बचत आणि शक्ती एकत्र करुन सक्षम प्रक्रिया आणि भक्कम पायाभूत घटक निर्माण करण्यावर भर दिला.

“ आमच्या तज्ज्ञ टीममध्ये असे लोक आहेत ज्यांनी देशातील काही पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या हायपरमार्केटसाठी बॅकएन्ड ऑपरेशन्स आणि पुरवठा साखळी यशस्वीरित्या सुरू केली आहे. त्या अर्थाने टीमला गुंतागुंतीचे स्रोत आणि वस्तुंच्या साठ्यासाठी योग्य तापमानाची व्यवस्था करण्याची चांगली समज आहे,” असं अभय म्हणतात.

लिशिअसतर्फे उत्पादनाची पुनर्पाहणी केली जाते. त्यासाठी आरोग्य, सुऱक्षितता, पर्यावरण आणि गुणवत्ता यासाठीच्य़ा निकषांवर उत्पादनाची तपासणी करण्यासाठी त्यांचं स्वत:चं सक्षम मध्य़वर्ती प्रक्रिया केंद्र आहे. उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत असलेल्या निष्ठेमुळे साखळी व्यवस्थापनाच्या नियमांप्रमाणे ते निर्मिती विभागाकडे पाठवले जाते, या विभागात तज्ज्ञ शेफ आणि कुशल कसायांची टीम कार्यरत असते. स्वच्छ, नीटनेटके आणि योग्य तुकडे करण्याकडे ही टीम लक्ष देत असते.

त्यानंतर ते तात्पुरत्या शीतगृहात ठेवले जाते, तिथूनच ते बंगळुरूमधल्या विविध वितरण केंद्रांवर पोहोचवले जाते, पण ग्राहकाने कोणत्या ठिकाणावरुन ऑर्डर दिली आहे त्यावर वितरण केंद्र अवलंबून असते. शेवटच्या क्षणालाही मध्यवर्ती केंद्रावरील व्यवस्थापक उत्पादनाची गुणवत्ता अत्यंत कडकपणे तपासतो, त्यानंतर ते उत्पादन बाहेर पाठवले जाते.

या प्रक्रियेतील संपूर्ण साखळी व्यवस्थापन नवीन पद्धतीनं करण्यात आल्यानं शेवटच्या टप्प्यातही त्यावर पूर्ण लक्ष असते. अत्यंत सक्षम, यादीची गरज नसलेले मॉडेल चालवण्याचा टीमचा प्रयत्न आहे. यामुळे ग्राहकाला शीतगृहात खूपवेळ पडून राहिलेले मांस न देता ताजे मांस देण्याची सेवा व्यवस्थित पार पाडली जाते.

“ आम्ही किती ताजा माल देतो याचं उदाहरण द्यायचं तर ज्या दिवशी कोळंबी पकडली जाते, त्याचदिवशी ती रवाना करुन पकडल्याच्या २४ तासात आमच्यापर्यंत पोहोचते. सर्वोत्तम असा सीअर मासा कोचीनहून आमच्यापर्यंत २४ तासात पोहोचतो,” असं अभय सांगतात. त्यामुळेच बंगळुरूमधील मांसाहारप्रेमी असे बरेचसे लोक लिशिअसकडे खेचले जात आहे, असा दावाही ते करतात.

आकर्षण आणि बाजारपेठ

कंपनीने माराथली इथल्या वितरण केंद्रावरुन आपलं काम सुरू केल्याच्या महिनाभरातच तेराशे ऑर्डर्स मिळाल्या आहेत. “ यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आणि आम्ही लगेचच कामनाहल्लीमध्ये आमचे दुसरं वितरण केंद्र सुरू केलं. आता आम्हाला नुकतीच गुंतवणूक मिळालेली आहे, आम्ही आता हा निधी वापरुन महिनाभरात आणखी ३ वितरण केंद्र सुरू करणार आहोत”, असं अभय सांगतात.

सुरुवातीच्या संशोधनानुसार भारतातील मांसाहाराची बाजारपेठ ३० बिलियन अमेरिकन डॉलरच्या जवळपास आहे आणि भारत हा मांसाची निर्यात करणाऱ्या सगळ्यात मोठ्या देशांपैकी एक असल्याचं टीमच्या लक्षात आलं. हा उद्योग दरवर्षाला दोन आकडी विकासदर दाखवतोय. तर यातील पोल्ट्रीसारख्या व्यवसायाच्या वार्षिक विकास दर प्रत्येकवर्षी २० टक्क्यांनी वाढतोय.

“ ९० टक्के बाजारपेठ अजूनही असंघटित आहे, तर संघटित उद्योजकांकडे उरलेल्या १० टक्क्यांचा ताबा आहे. यात बरेचसे उद्योजक हे गोठवलेल्या मांसाच्या व्यवहारात लक्ष घालतात तर संघटित उद्योजक हे निर्यातीकडेच लक्ष देत असतात,” असं अभय यांचं म्हणणं आहे.

बाजारपेठ समजून घेताना

शहरी भागातील अनेक ग्राहकांना आपल्याकडे येणारं मांस कुठून येतं हे माहित नसतं कारण ते आणण्याचं काम त्यांचे घरगडी करतात. तर काहींना त्यांचं वेळापत्रक, जीवनशैली यामुळे गोठवलेलं मांस खाण्याची सवय जबरदस्तीनं लावून घ्यावी लागलीये.

यातील कळीचा मुद्दा आहे तो मांसाची स्वच्छता, सुरक्षा आणि ताजेपणा, त्यामुळे अंतिमत: त्यांना विश्वास ठेवण्या व्यतिरिक्त हातात काहीही नसते. “त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात या व्यवस्थेमधील प्रत्येक पायरीवर आम्हाला मुल्यांची भर घालून एक संघटित व्यवस्था उभारायची आहे. पण ग्राहकाभिमुख व्यवसायातील अडचणी आणि श्रेणीचं महत्त्व समजून घेणारी सर्वोत्तम टीम आमच्यासोबत असल्यानं आम्ही या वळणावरुन बरेच पुढे गेलो आहोत,” असं अभय सांगतात.

पुढील तीन महिन्यात ग्राहकाभिमुख तंत्रज्ञानाची पुढील आवृत्ती आणण्याचं लिशिसअचं ध्येय आहे. त्याचबरोबर खवय्यांसाठी इतर काही नवीन श्रेणी आणि नवीन विभाग सुरु करण्याचाही त्यांचा मानस आहे. “ आजपासून बरोबर तीन वर्षात भारतातील ११ शहरांमध्ये पोहोचण्याचा लिशिअसचा प्रयत्न आहे. तसंच येणाऱ्या काही वर्षात लिशिअस हा एक ब्रँड म्हणून लोकांच्या पसंतीस उतरलेला असेल,” असा दावा अभय करतात.