एक असाही रिक्षाचालक...

0

काळ्या रंगाची तीन चाकी गाडी....आपल्याला इच्छित स्थळी सोडणारी किंवा नेमकी गरज असते तेव्हा न मिळणारी, अडचणीच्या वेळस मदतीस धावणारी तर कधी सुट्ट्या पैशांवरून भांडणारी. ‘ती’ आणि ‘ती’चा ड्रायव्हर. दुपारच्या वेळेस टाईमपास म्हणून पत्ते खेळणार्‍या रिक्षा ड्रायव्हरचे अनेक चेहरे आपल्या समोर येतात. आता तुम्हाला वाटत असेल की, ही का बरं रिक्षावाल्यांबद्दल एवढं बोलते आहे. अहो त्याला कारणही असंच आहे. कसं असतं काही माणसांची आपल्याला एवढी सवय झालेली असते की, आपण त्या व्यक्तीला गृहित धरतो की, त्यात काय ते त्याच कामच असतं. जसं की, आपली आई जी आपल्यासाठी मर मर मरते, आपल्याला हवे नको ते पाहते. पण आपल्याला वाटतं की, त्यात काय एवढं, ते तिचं कामच आहे किंवा रोज पेपर देणारा पेपरवाला, दूधवाला त्याचप्रमाणे रिक्षावालाही....पण ही गोष्टी वेगळी आहे. कारण नवी मुंबईतील एक रिक्षावाला तो त्याचे दररोजचे काम तर करतोच....पण त्यासोबत शासनाचा एक दुवा म्हणूनही प्रवाशांच्या मदतीला येतो...


नवी मुंबईतील रिक्षाचालक संतोष गायकवाड हा तसा सामान्य कुटूंबातूनच...परंतू या सामान्य रिक्षाचालकाने सामाजिक कार्याचा संकल्प करीत एक असामान्य उपक्रम हाती घेतला आहे. आजच्या काळात आपले शासन समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही विशेष योजना राबवित असतो. पण त्यातल्या जेम तेम योजनाच तुम्हाला माहित असतील...ते ही जे माध्यमांच्या संपर्कात असतात त्यांना....पण वृत्तपत्र व माध्यम यांच्या दुनियेतून खूपच लांब असतील त्यांना कसे माहिती पडणार या शासनाच्या योजना? याचे उत्तर देणारा संकल्प केलाय नवी मुंबईतील रिक्षाचालक संतोष गायकवाड याने. रिक्षाचालक संतोष गायकवाड याने त्याच्या रिक्षामधून प्रवास करणार्‍या नागरिकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचविण्याच्या कार्यासाठी सुरवात केली. त्याच्या रिक्षामध्ये जर एखादा प्रवासी बसला तर टाईमससाठी त्यांच्या कानामध्ये कोणत्याही प्रकारचे हेडफोन नसतात, तर कोणी मोबाईल फोन चाळताना दिसत नाही. संतोष गायकवाडच्या रिक्षामध्ये बसल्यानंतर येथील प्रवासी रिक्षामध्ये लावलेले विविध शासकीय योजनांचे बोर्ड वाचताना दिसून येतो. एवढेच नाही तर रस्ता सुरक्षा, मुलगी वाचवा देश वाचवा, एड्स निर्मूलन, व्यसनमुक्ती, हुंडाविरोधी, भष्ट्राचारविरोधी व मतदान वाढवा अभियानातून ‘जनजागर’ करण्यात येतो आणि उदयास आणि ‘सोशल लायब्ररी’. गेल्या १० वर्षापासून संतोेष गायकवाड याने घेतलेला सामाजिक वसा अखंडपणे सुरू असून त्याच्या या उपक्रमाची दखल घेत लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्याच्या सोशल लायब्ररीत सरकारी योजनांची माहितीपत्रके स्वखर्चाने उपलब्ध करून दिली जात आहेत. संतोषच्या समाजसेवेत त्याला कुटुंबीयांची देखील मोलाची साथ लाभत आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा चालविणार्‍या व्यक्तीच्या आतही काही कलागुण दडलेले असू शकतात याचा आपण कधीही विचार करीत नाही. सगळेच रिक्षा चालविणारे कमी शिकलेले व त्या रूढार्थाने ‘अडाणी’ असतात हा समजच मुळात चुकीचा असतो, हे रिक्षाचालक संतोष गायकवाड याने सिद्ध केले आहे. तसेच जर एखाद्या अपंगाला कुठे जायचे असेल तर तो मोफत प्रवास देतो. गेल्या १० वर्षात त्याने तब्बल २५ हजार अपंगाना मोफत प्रवास दिला आहे.


नवी मुंबईतील जवळपास पाच हजार रिक्षाचालकांना बरोबर घेऊन संतोषने महापालिका व सरकारच्या विविध योजना समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सोशल लायब्ररी’ची संकल्पना राबवली आहे. या लायब्ररीत सरकारी योजनांची माहितीपत्रके स्वखर्चाने उपलब्ध करून दिली जात आहेत. संतोषच्या समाजसेवेत त्याला कुटुंबीयांची देखील मोलाची साथ लाभत आहे. घणसोलीतील संतोष गायकवाडने २००४ रोजी उदरनिर्वाहासाठी रिक्षाचालकाचा व्यवसाय पत्करला. मात्र त्यांच्यातील समासेवकाने त्याला स्वस्थ बसू दिले नाही. हा व्यवसाय करतानाच अपंगांना इच्छिस्थळी मोफत सोडण्याच्या उपक्रमास त्याने सुरुवात केली. त्याचा हा समाजसेवेचा व्याप वाढत गेल्याने सेवेसाठी दिवसभर त्याचा मोबाइल खणाणतो. रात्री-बेरात्रीही सेवेसाठी सदैव तत्पर असलेला संतोष अपंगांच्या मदतीला क्षणात धावून जातो, अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे.

त्याचा हा संकल्प इतका प्रसिद्ध झाला आहे की, आता अशी सोशल लायब्ररी रिक्षामधून उपलब्ध करून देणारा एकच रिक्षाचालक राहिलेला नाही. त्याच्या या संकल्पनेला साथ देत नवी मुंबईतील अनेक रिक्षाचालक त्याच्यासोबत हा उपक्रम राबविताना दिसून येत आहेत. हे झालं रिक्षावाल्याबद्दल, आता तुमचा रिक्षावाल्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन थोडा फार का होईना बदलला असेल. कारण कसं आहे, प्रत्येक व्यक्तीला वाटत असेल की, आपण खूप मोठं व्हावं. आपल्या हातात पैसे असायला हवे पण काही कारणास्तव शक्य होत नाही. त्यामुळे काहीजण नाईलाजाने किंवा काहीजण स्वत:ला हवं म्हणून रिक्षा चालवतात, पण एवढ्या सगळ्या व्यापात ते समाजसेवेचा छंद जोपासतात हे काही कमी नाही, पण आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.

जीवनात यश मिळविण्यासाठी माणसाने सतत धडपडणे गरजेचे आहे. जो माणूस जीवनात जेवढा मोठा संघर्ष करतो त्याला तेवढे मोठे यश मिळते.

Related Stories