जगातल्या कुठल्याही कंपनीचे टेंडर तुम्ही भरू शकता ‘टेंडरबोल्ट’वरून…

जगातल्या कुठल्याही कंपनीचे टेंडर
तुम्ही भरू शकता ‘टेंडरबोल्ट’वरून…

Thursday October 08, 2015,

4 min Read

आजचे यूग कल्पनेचे यूग आहे. कल्पना काकणभर जरी… परी ब्रह्मांडाचा भेद करी… डॉक्टर, इंजिनिअर किंवा आयएएस बनणे म्हणजेच आयुष्यात यशस्वी होणे, असा समज दृढ असण्याचा काळ आता केव्हाच लोटलाय. किंबहुना त्यावर आता पडदा पडलाय. तुमच्याकडे एक नवी कल्पना असेल तर तेच तुमचे भांडवल आहे. आणि मग तुम्ही अगदी आकाशाला तुमची शिडी लावू शकता. आकाशावर चढू शकता. कुणी तुमचे पाय ओढणार नाही. कुणी तुम्हाला पाडणार नाही. तुमच्या नव्या कल्पनेने तुम्हाला तुमच्या आकाशातल्या परमोच्च आसनावर अगदी अलगद अधिष्ठित केलेले असेल.

नवी कल्पना, नवा विचार आणि काही वेगळे करण्याच्या जिद्दीचे नवे नाव आहे सन्मित शाह… केवळ ‘आयडिया’च्या बळावर सन्मित शाह यांनी कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या वर्षातच २० हजार युरो म्हणजे भारतीय चलनातले १३ लाख रुपये एवढी कमाई करून दाखवली. सन्मितचे काम काय, तर जगभरातल्या दीडशे देशांतील कंपन्यांच्या पसाऱ्यात उपलब्ध बिझनेसची (टेंडर, प्रोजेक्टस्) माहिती इतरांना उपलब्ध करून देणे.

image


‘बाल वैज्ञानिक’ हा मानाचा पुरस्कार

सन्मित शाह यांना बालपणापासून शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे वातावरण मिळाले. कुटुंबात सर्वाधिक महत्त्व शिक्षणालाच होते. सगळे शिकलेले होते म्हणून नव्हे तर मनाप्रमाणे शिकू शकलेले नव्हते म्हणून! महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात त्यांची पिढीजात शेती. वडील अर्थातच शेतकरी. आई गृहिणी. दोघांची इच्छा होती सन्मितने मेडिकलला जावे. डॉक्टर व्हावे. सन्मित मात्र यासाठीच्या शिक्षणासाठी तयार नव्हता आणि त्याच्या क्षमतांचा मेळही इथं बसत नव्हता. विज्ञान आणि विज्ञानाशी संबंधित सृजनात्मक क्रियाकलापांमध्ये सन्मितला रस नव्हता असे नाही. कमालीचा रस होता.

राष्ट्रीय स्तरावरील एनसीएसटीसी परीक्षेत त्याने ‘बाल वैज्ञानिक’ हा मानाचा पुरस्कारही पटकावला होता. जे होते, ते चांगल्यासाठी असे जे म्हटले जाते, ते सन्मितच्या बाबतीत तंतोतंत लागू पडले. सन्मितचे जीवन त्याला एका नव्या वळणावर न्यायला जणू टपूनच बसलेले होते. ‘सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या वळणाचे माध्यम ठरले. वरून कॉम्प्युटर हा त्याचा आवडता विषय होता.

प्रत्येक नोकरीचे वय महिने तिन...

इथेच कॉम्प्युटरच्या ओघात लॅपटॉपशीही ओळख झाली. इंटरनेटशी सख्य जुळले मग काय अवघ्या जगाशी मैत्रीही जुळली. इंटरनेट… माहितीच्या महाजालात तो गुरफटून गेला. नवे जीवनच जणू मिळालेले होते. सन्मितच्या मनात यादरम्यान आलेच, की ही सगळी माहिती जी विनामूल्य मिळते आहे, यातून स्वत:साठी काही मूल्यवान आपल्याला मिळू शकेल. ‘उंदरा’वर बसून मग शोध सुरू झाला. कॉलेज आटोपल्यावर थोड्याथोडक्या कालावधीसाठी का असेना खूप साऱ्या कंपन्यांतून काम केले. इंटरेटवरूनच आपण आपल्यासाठीचे जग निर्माण करू, हा त्याचा भरवसा नोकरीगणिक मजबूत होत गेला. आणि संबंधित माहिती मिळवण्याच्या उद्देशाने त्याने ‘एडव्हीएस ब्रोकिंग लिमिटेड’ नावाच्या कंपनीत पाऊल ठेवले. सन्मितचे कष्ट आणि हुशारीने रंग उधळलेच. तीन महिने उलटले आणि त्यांना ‘टेंडर न्यूज डॉट कॉम’मध्ये नोकरीची संधी मिळाली. जास्तीत जास्त तीन महिने कामावर ही नोकरीची आतापर्यंतची पद्धत इथेही कायम राहिली. इथंही राम-राम ठोकला. ध्येय स्पष्टपणे नजरेसमोर दिसत असेल तर वीर पुरुष रस्त्यांची पर्वा करत नाही, असे म्हटले जाते. ‘टेंडर न्यूज डॉट कॉम’ची नोकरी सोडल्यानंतर स्वत:साठी काही वेळ सन्मित यांनी घेतला. नव्या आव्हानासाठी ते ताजेतवाने झालेले होते. मग ऑक्टोबर २०१२ मध्ये त्यांनी स्वत:ची टेंडरबोल्ट कंपनी सुरू केली.

टीम टेंडरबोल्ट

टीम टेंडरबोल्ट



दररोज दहा हजार सूचना अपलोड

एका पोर्टलच्या रूपात इंटरनेटवर ‘टेंडरबोल्ट’ची नोंदणी करण्यात आली. जगभरातल्या बिझनेस कंपन्यांची माहिती देणे हे या कंपनीचे मुख्य काम… ठरलेले होते. अर्थात माहिती विशेषत: टेंडरसंदर्भातच… कंपनीच्या नावातही टेंडर त्यामुळेच. जगभरातल्या कंपन्यांचे नवे प्रकल्प, कुठल्या प्रकल्पाचे काम कुठली कंपनी करते आहे, अशी अन्य माहितीही या पोर्टलवरून उपलब्ध होते. टेंडरबोल्ट पोर्टलसमवेत तुम्ही कनेक्ट झालात म्हणजे जगभरातल्या बिझनेसमध्ये कुठे काय चाललेले आहे, हे तुम्हाला कळलेच म्हणून समजा. सन्मित शहा यांनी या कामात स्वत:ला झोकून दिले. माहिती उपलब्ध करून देणारे दहा हजारांहून अधिक स्त्रोत त्यांच्याकडे आज आहेत. दीडशेवर देशांतून या स्त्रोतांचे सूर जुळलेले आहेत, हे विशेष! स्त्रोतांकडून माहिती मिळवून ती आपल्या ग्राहकांना मेलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे अहर्निश कार्य आज सन्मित करताहेत. दररोज विविध कंपन्या मिळून सुमारे दहा हजार सूचना अपलोड होतात, यावरून कंपनीचा व्याप सहज लक्षात येतो.

जगभरातल्या जिभांवर रुळेल असे नाव

पोर्टलसाठी नाव ठरवण्यातही सन्मित यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जे कुठले नाव ते पसंत करत, निवडत ते नेमके आधीच कुणीतरी डोमेनवर नोंदवलेले निघायचे. सन्मित एका अशा नावाच्या शोधात होते, जे जगभरातल्या जिभांवर सहज रुळेल. नावातून कामाचा वेग असा सुसाट सुटेल. आठवडाभर खल चालला. खूप डोकेमारी केली. अखेर समर्पक नाव सुचलेच… ‘टेंडरबोल्ट’ ‘थंडरबोल्ट’ शब्दाच्या धर्तीवर हे नाव होते. शेक्सपिअर म्हणतो, ‘नावात काय आहे.’ पण ‘टेंडरबोल्ट’ या नावाचा सन्मित यांच्या कार्याला गती देण्यात सिंहाचा वाटा राहिला. नावात वेग होता. कामालाही या नावाने वेग दिला!

टेंडरबोल्ट समवेत एकदा सब्सक्राइब केल्यानंतर क्लायंटला वर्षभर माहिती मिळत राहाते. नव्या क्लायंटला त्यासाठी अनामत रक्कम द्यावी लागते. सन्मित विश्वासाने सांगतात, स्पर्धेच्या या जगात आपले स्थान निर्माण करणे त्यांना फारसे जड गेले नाही. पहिल्याच वर्षी तेरा लाख रुपयाची कमाई त्याचा पुरावा आहे. टेंडरबोल्टचे कार्यक्षेत्र विशेषत: आंतरराष्ट्रीय बाजार आहे. युरोप, मध्यपूर्व आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील विविध देशांच्या कंपन्या आहेत. कामाला सुरवात केली तेव्हा सन्मित यांच्याकडे केवळ युरोपियन बाजारातली माहिती उपलब्ध होत असे. कार्यक्षेत्र पुढे विस्तारत गेले.

आणखी अन्य व्यवसायात सन्मित यांना सध्या पडायचे नाही. संपूर्ण लक्ष त्यांनी आपल्या पोर्टलवर केंद्रित केलेले आहे. हेच काम वाढवण्यावर त्यांचा भर आहे. आणखी अधिक उत्तम तंत्राचा वापर करण्याच्या तयारीत ते आहेत. पोर्टलचा पसारा वाढवायचाय. अधिकाधिक लोक पोर्टलच्या कक्षेत यावेत म्हणून दिवसरात्र कष्ट उपसताहेत. आपण दिलेल्या माहितीतून जास्तीत जास्त लोकांच्या जीवनात विकासाच्या नवनव्या वाटा तयार होत असतील, तर त्याहून अधिक आनंददायी माझ्यासाठी दुसरे काय आहे, अशी सन्मित यांची भावना आहे.


इतरांच्या मार्गातील विकास-वाटांतून ‘टेंडरबोल्ट’चा खारीचा वाटा…

सन्मित शाह यांच्यासाठी याच जणू आनंदाच्या उसळत्या लाटा…