‘मन की बात’ ने पालटले त्रिमुर्तींचे नशीब, स्वयंरोजगारातून देत आहेत इतरांनाही रोजगार!

0

एमसीए, बीसीए सारख्या पदव्या घेतल्यानंतर प्रत्येक युवकाला वाटते की, त्याला एखाद्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळावी. जास्त वेतन मिळावे. आरामदायी जीवन मिळावे. परंतु, बनारसच्या तीन युवकांना मात्र असे अजिबात वाटत नाही. त्यांनी तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वतःचा रोजगार मिळविण्याचा निश्चय केला आणि बघता बघता त्यांनी आपल्या आयुष्याचे चित्रच पालटले. आज ते स्वतः नोकरी करत नाहीत तर, दुस-यांना नोकरी देतात. असेच तीन युवक आहेत, आशुतोष गुप्ता, अमित चौबे आणि राकेश कुमार.

कशी मिळाली प्रेरणा

बनारसच्या रस्त्यारस्त्यावर आज या तीन युवकांची खूप चर्चा आहे. दिवसेंदिवस हे युवक घराघरात आपली ओळख निर्माण करत आहेत. यांची ओळख प्रत्येक घरातील स्वयंपाक घरापर्यंत पोहोचली आहे, केवळ शहरच नाही तर, गावातल्या शेतक-यांच्या तोंडावर देखील त्यांचे नाव सतत असते. हो, बनारसचे हे युवक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रभावित आहेत. बनारस सारख्या शहरात या युवकांनी ऑनलाईन भाजी विकण्याचे काम सुरु करून विपणनाचा ट्रेंड बदलला आहे.

संपूर्ण देशात ऑनलाईन विपणनाचा व्यवसाय मोठ्या गतीने वाढत आहे. धावपळीच्या जीवनात आता लोक दुकानांवर वेळ घालविण्याचे सोडून ऑनलाईन सामान विकण्यात स्वारस्य दाखवत आहेत. केवळ मेट्रो शहरातच नव्हे तर, लहानशा शहरांतील लोक देखील मोठ्या संख्येने ऑनलाईन विपणन करत आहेत. लोकांच्या याच अभिवृत्तीला बनारसच्या युवकांनी आणि ऑनलाईन भाजी विकण्याचे काम सुरु केले. २३वर्षाचा तरुण व्यावसायिक अमित चौबे यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “काही महिन्यांपूर्वी मी रेडियो वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमात मोदी यांनी तरुणांच्या बाबतीत आपले मनातले विचार मांडले, ज्यात त्यांनी स्टार्टअप इंडियाबाबत सांगितले. या कार्यक्रमानंतर माझ्या डोक्यात काहीतरी आगळे वेगळे करण्याची जिद्द निर्माण झाली.”

काही दिवसात अमित यांची ही जिद्द महत्वाकांक्षेमध्ये परावर्तीत झाली. एमसीएचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमित यांनी एखाद्या कंपनीत नोकरी न करता स्वतःचा रोजगार मिळविण्याचा निश्चय केला. अमित यांनी आपले मित्र आशुतोष गुप्ता आणि राकेश यांच्यासोबत विचारमंथन केले. अमित यांच्या सारखेच आशुतोष यांनी देखील बीसीएचे शिक्षण घेतले, तर राकेश यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. या तिघांनी नोकरीसाठी भटकणे सोडून स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार केला. अहमदाबादचे प्रसिद्ध ऑनलाईन भाजीचे संकेतस्थळ “सब्जी वब्जी”ने प्रेरित होऊन बनारसमध्ये देखील असेच काहीसे करण्याचा निश्चय केला. काही करून त्यांनी ७०हजार रुपये जमा केले. संकेतस्थळ तयार केले आणि ऑनलाईन भाजी विकण्याचा व्यवसाय सुरु केला. या युवकांच्या संकेतस्थळाचे नाव banarasisabji.com आहे. या संकेतस्थळामार्फत हे तीन युवक घराघरात भाजी पोहोचविण्याचे काम करत आहेत. पहिल्या दिवशी १५ऑर्डर्स मिळाले. अमित यांच्या व्यवसाय करण्याच्या अनेक परीक्षणानंतर आता काशी येथे राहणा-या लोकांना याचा फायदा होत आहे. 


काय आहे बनारससब्जी डॉट कॉम?

banarasisabji.com वर सर्व प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात. सर्व भाज्यांचे भाव संकेतस्थळावर असतात. ज्यामुळे ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. संकेतस्थळावर नंबर देखील देण्यात आला आहे. ग्राहकांना दोन तासाच्या आत भाजी घरपोच दिली जाते. संकेतस्थळाच्या ग्राहकांना वेळोवेळी सेल आणि ऑफर दिले जातात. १२०रुपयांपेक्षा अधिकची भाजी विकत घेण्यावर कुठल्याही प्रकारचा डिलिवरी चार्ज नाही. २०जानेवारी पासून सुरु झालेल्या banarasisabji.com ला लोकांची चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. आतापर्यंत जवळपास ४५०लोक यात सामिल होऊन ऑनलाईन भाजी विकत घेत आहेत. या त्रिकुटाच्या मेहनतीच्या बळावरच काही रुपयांनी सुरु झालेला या तिघांचा व्यवसाय आतापर्यंत लाख रुपयांच्या घरात पोहोचला आहे. आपल्या कामाला सहज बनविण्यासाठी आणि ग्राहकांच्या सुविधेसाठी अमित आणि त्यांच्या मित्रांनी १०डिलिवरी करणारे मुले ठेवली आहेत, जे शहराच्या कोप-या कोप-यात लोकांच्या घरी भाज्या पोहोचवतात. 

कसे काम करते, बनारसीसब्जी डॉट कॉम?

आपल्या संकेतस्थळामार्फत अमित आणि त्यांच्या मित्रांनी भाज्यांच्या बाजारात दलालांच्या साखळीला देखील तोडले आहे. साधारणत: बाजारात दलाल आणि मोठ्या व्यापारी लोकांचा बोलबाला असतो. हे दलाल शेतक-यांकडून कवडीमोल भावात त्यांच्या भाज्या विकत घेतात आणि पुन्हा त्याला जास्त भावात किरकोळ विक्रेत्याला विकतात. या मोठ्या साखळीमुळे आमच्या आणि तुमच्या थाळीपर्यंत पोहोचणा-या भाज्यांचे भाव गगनाला भिडत आहेत. त्याचा सर्वात मोठा परिणाम शेतकरी आणि सामान्य जनतेवर पडत आहे. शेतक-यांकडे बाजारा व्यतिरिक्त कुठलाही दुसरा पर्याय नसता, तर ग्राहक मजबुरीने महागड्या भाज्या विकत घेतात. हेच कारण आहे की, ग्राहकांना ताजी आणि स्वस्त भाजी मिळावी म्हणून हे युवक शेतक-यांना संपर्क करतात, जे भाज्यांची शेती करतात. अमित आणि त्यांचे मित्र गावा गावात जातात. या पावलामुळे जेथे शेतक-यांना आवश्यक मेहनताना मिळतो, तेथेच संकेतस्थळाच्या ग्राहकांना ताजी आणि स्वस्त भाजी मिळते. अमित यांची योजना आहे की, येणा-या काळात ते भाज्यांची शेती करणा-या शेतक-यांना वैज्ञानिक पद्धतीने जागरूक करतील. जेणेकरून शेतकरी देखील शेतीच्या नव्या पद्धती जाणू शकतील. अमित त्यासाठी बीएचयूच्या कृषी वैज्ञानिकांची मदत घेतील. येणा-या दिवसात शेतक-यांसाठी प्रशिक्षण शिबीर लावले जाईल. अमित सांगतात की, शेतक-यांना तंत्रासोबत सामील करणे माझे खरे लक्ष्य आहे. 

banarasisabji.com कडून आता नवयुवकांना रोजगाराची संधी देखील मिळत आहे. जवळपास ३०युवक या कंपनीत सामील होऊन नोकरी करत आहेत. अमित यांच्या मते, “आमचे लक्ष्य केवळ व्यापार करण्याचेच नाही तर अशाच युवकांना नोकरी प्रदान करण्याचे आहे, जे रोजगारासाठी नोकरीच्या शोधात आहेत. काही दिवसांपूर्वी पीएम मोदी यांचे आदर्श गाव जयापूर मध्ये रोजगार मेळ्याच्या आयोजनात अनेक मोठ्या कंपन्यांसोबत आम्ही देखील भागीदारी केली होती आणि २५नवयुवकांना आपल्या कंपनीत काम करण्यासाठी निवडले होते. केवळ बेरोजगारच नाही तर, अंधांना (दिव्यांग) देखील कंपनी कडून पूर्ण संधी दिली जात आहे".

कंपनी आपल्या ग्राहकांपर्यंत सामान पोहोचविण्यासाठी केवळ अंधांनी बनविलेल्या बँगचाच वापर करतात, जेणेकरून या अंधांमध्ये देखील स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळू शकेल. अमित यांनी युवर स्टोरीला सांगितले की, आम्ही अंधांना मजबूर नव्हे तर मजबूत बनविण्याची जाणीव देऊ इच्छितो. स्वतः मोदी यांनी देखील अंधांना प्रोत्साहित करण्यासाठी अपील केले आहे. अशातच आमचे नैतिक कर्तव्य असते की, आपण अंधांना साथ द्यावी. 

खरेच पीएम नरेंद्र मोदी यांच्या एका विचाराने अमित सारख्या लाखो युवकांच्या स्वप्नात रंग भरले आहेत. अमित आणि त्यांच्या मित्रांनी आज त्याच रस्त्याला निवडले आहे, जो सहज नाही. मात्र त्यांना विश्वास आहे की, हाच रस्ता एक दिवशी लक्ष्य गाठून देईल. व्यापाराची ही पद्धत बनारसमध्ये केवळ नवा ट्रेंड बनूनच उदयास आला नाही तर, बेरोजगारांना देखील याचा फायदा झाला आहे. आशा आहे की, अमित यांच्या या प्रयत्नाने अनेक युवा प्रेरणा घेतील आणि मोदी यांच्या मेक इन इंडियाच्या स्वप्नांना साकार करतील.

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या Facebook page ला लाईक करा

आता वाचा या संबंधित कहाण्या :

चार अशिक्षित आदिवासी महिलांच्या ‘घुमर’ स्वयंसेवी गटाने बनविली कोट्यावधींच्या उलाढालीची कंपनी! जंगलातून सीताफळ आणून विकणा-यांची कामगिरी !

आता शेतीमालही ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध, postall.in वर करा कृषी उत्पादनांची खरेदी विक्री 

दोन अभियंता मित्रांचा ‘सात्विक’ प्रयत्न, सेंद्रीय अन्न खा निरोगी रहा ! आता शेतातील ‘शुध्द’ फळं भाज्या थेट तुमच्या स्वयंपाकघरात !

लेखक : आशुतोष सिंह
अनुवाद : किशोर आपटे