अन्नदाते आणि रूग्णांचे ‘मसिहॉं’ हरखचंद सावला!

अन्नदाते आणि रूग्णांचे ‘मसिहॉं’ हरखचंद सावला!

Tuesday December 15, 2015,

6 min Read

गेल्या ३० वर्षात दहा ते बार लाख कॅन्सरग्रस्त रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे मोफत भोजन देणारे मुंबईचे हरखचंद सावला परळ येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटल परिसरात सर्वपरिचित आहे. अत्यंत साधे राहणीमान असलेले हरखचंद सावला कर्करोगग्रस्तांची व त्यांच्या नातेवाईकांची आस्थेने चौकशी करून त्यांना आधार देत असतात. ‘जीवनज्योती’ ट्रस्टच्या माध्यमातून ते कर्करोग्यांचे आधारवड बनले आहेत. त्यांनी शेकडो रुग्णांना नवी आशा दिली आहे. माणुस देव शोधतो...पण कुठे? कोणी मंदीरात तर कोणी मस्जिदमध्ये...पण गेल्या ३० वर्षात कॅन्सरग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांना देव सापडला तो हरखचंद सावला यांच्या रुपात...

image


मुंबईच्या परळ भागातील प्रसिद्द टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील फूटपाथवर उभा राहून तिशीतील एक तरुण खाली उभ्या असलेल्या गर्दीकडे एक टक लावुन पाहत राहायचा. मृत्युच्या दारात उभे राहिल्यामुळे रुग्णांच्या चेहर्‍यावरील दिसणारी ती भीती, त्यांच्या नातेवाइकांची भकास चेहर्‍याने होणारी ती धावपळ पाहुन तो तरुण खुप अस्वस्थ व्हायचा....बहुसंख्य रूग्ण बाहेर गावाहुन आलेले गरीब लोक असायचे....कुठे कोणाला भेटायचे, काय करायचे हे देखील त्यांना ठाउक नसायचे...औषध पाण्यासाठी नव्हे तर त्यांच्याकडे जेवायला देखील पैसे नसायचे... हे सारे दृष्य पाहुन तो तरूण खिन्न मनाने घरी परतायचा...आणि शेवटी याच तरूणाने एक मायेचे पाऊल उचलले...

टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या परिसरात असंख्य पेशंटचे नातेवाईक फूटपाथवर पथारी पसरून रहातात. कॅन्सरवरील महागड्या उपचारांसाठी ते घरातील मौल्यवान ऐवज, जमिनीचा तुकडा विकतात. पेशंटला अॅडमिट केल्यावर नातेवाईकांना हॉटेलमध्ये राहणे परवडत नसे. मग नातेवाईक फूटपाथवरच राहतात. काही तर तिथेच अन्न शिजवतात. पण सर्वांनाच फूटपाथवर चूल पेटवून जेवण करणे शक्य होत नाही आणि हॉटेलचा खर्चही परवडत नाही. ३० वर्षापूर्वी हरखचंद सावला यांना या लोकांचे दुःख जाणवले. एकीकडे कॅन्सर पेशंटच्या वेदना तर दुसरीकडे नातेवाईकांच्या पोटातील आग, हे सर्व पाहिल्यावर सावला यांनी टाटा हॉस्पिटलच्या जवळील कोंडाजी चाळीजवळ दररोज २५ कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना दररोज चपाती, डाळ-भात, भाजी देण्यास सुरवात केली. छोट्या स्वरूपात सुरू केलेल्या अन्नदानाच्या या यज्ञाचा हळूहळू महायज्ञ झाला. आता हा महायज्ञ जे.जे. हॉस्पिटल, सेंट जॉर्ज कामा हॉस्पिटलमध्येही सुरू झाला. आजच्या घडीला या तीनही हॉस्पिटलमध्ये ३०० व्यक्तींना दोन वेळचे मोफत जेवण देण्यात येते. मुसळधार पाऊस असो अथवा मुंबई बंद, अन्नदानाच्या या महायज्ञात खंड पडलेला नाही.

image


image


हरखचंद यांचा जन्म गुजरातमधील कच्छ येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. संस्कारक्षम वयात एका आजोबांनी त्यांना सांगितले, की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपल्यावर ऋण आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे! त्या एका वाक्याने त्यांचे आयुष्य बदलले. त्यांनी लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे याची मनाशी खुणगाठ बांधली. ते अडचणीत असलेल्या व त्यांच्यापर्यंत पोचलेल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करू लागले. त्यांच्या लहानपणी त्यांचा मित्र शाळेची फी भरू शकत नव्हता, तेव्हा सावला काही महिने शाळेत पायी गेले आणि त्यांनी त्यांच्या बसप्रवासाला लागणारे पैसे वाचवून त्यातून त्यांच्या मित्राची फी भरली. त्यांच्या गावातील एक बाई त्यांच्याकडे १९८५ साली आली. तिच्या आईला स्तनांचा कर्करोग झाला होता. तिचे मुंबईत कोणीच नव्हते. सावला तिला टाटा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, टाटा हॉस्पिटलला जनरल वॉर्ड आहे, तेथे मोफत उपचार मिळतात. ती बरी झाली. अशिक्षित किंवा गावाकडून येणार्‍या ज्यांच्याकडे पैसे नसतात आणि ज्यांना योग्य ती माहितीही नसते, ज्यांची मुंबईत राहण्याची सोय नसते अशा रुग्णांना मदतीची गरज आहे याची जाणीव सावला यांना त्या प्रसंगातून तीव्रतेने भिडली.

image


देशाच्या कानाकोपर्‍यातून मुंबईत येणार्‍या गरीब पेशंटच्या नातेवाईकांना राहण्याची आणि दोन वेळच्या जेवणाची चिंता असे. पण या पेशंटच्या नातेवाईकांसाठी मोफत दोन वेळचे पोटभर जेवण मिळत असल्याने हरखचंद सावला यांनी तेथील पेशंटच्या वेदनेवर फुंकर घातली आहे. तेथील जनतेला सुद्धा हा उपक्रम आवडला आणि त्यांनीही या उपक्रमाला होईल तसा हातभार लावला.

आज त्यांनी स्थापन केलेल्या जीवन ज्योत ट्रस्टच्या वतीने साठ हून अधिक उपक्रम राबविले जातात. सावलांचे हे व्रत गेली ३० वर्षे सुरू आहे. त्याची बातमी आता आली, व्हॉट्स ऍपवर संदेश आता फिरले. ते फिरले नाही फिरले त्याची त्यांना फिकीर नाही. प्रसिद्धीचा सोस नाही. वह्या वाटप, कुठे बागांमध्ये बाके, एखादा पाण्याचा कुलर लावून चमकेशगिरी करणा-या समाजसेवकांसारखे ते नाहीत. समाजासाठी करणं हे असं असायला हवं. त्यांच्यासारखेच आणखी काही अवलिया आहेत. आजच्या युगात आपल्या कार्याची बातमी नको, प्रसिद्धी नको, फोटोबिटो तर अजिबात नको म्हणणारे अवलियाच म्हणावे लागतील. मध्यंतरी सावलांच्या आणि त्यांच्यासारख्याच अवलियांच्या समाजकार्याला एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्धी दिली होती. त्यानंतर या समाजव्रतींची कामे समाजासमोर आली.

समाजासाठी काय करायला हवं, कसं करायला हवं याचं उत्तर सावलांसारखे अनेक समाजव्रती त्यांच्या आचरणातून देत असतात. आपल्याच अवतीभवती असतात ही मंडळी. कुणी देवळाजवळील गरीबांसाठी दररोज केळी खरेदी करून खाऊ घालतो, कुणी मृतदेहांना कफन पुरवतो, कुणी तरूण मंडळी बेवारस मृतदेहांना अखेरचा निरोप देण्यासाठी वेळ राखून ठेवतात. कुणी औषधोपचारांसाठी जमले तितकी मदत करतो. परळ भागातील कुणी रहिवासी फक्त कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भाड्याने खोल्या राखून ठेवतात. समाजासाठी हेच तर करायचे असते. उत्तर आपोआप मिळून जातं! अशा या ६० वर्षीय अन्नदाते हरखचंद सावला यांच्या कार्याला शतशः प्रणाम!

और कारवॉं बनता गया....
सावला यांनी १२ वर्षे स्वतःच्या खिशातून पेशंटच्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण देण्याचे काम केले. मग सन १९९६ मध्ये जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट स्थापन केली. आता केवळ अन्नदान नाही, तर फूटपाथवर जेवण करणार्‍या पेशंटसाठी औषध बँक, अँब्यूलन्स सेवा, पुर्नवसन असे विविध साठ उपक्रम राबवले जात आहेत. ‘औषध बँक’ केल्याबरोबर अनेकांनी आपल्या घरातील शिल्लक औषधे आणून देण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी एक व्हॅन ठेवली असून घरोघरी तसेच डॉक्टरांकडे येणारी सॅम्पल औषधे गोळा करण्याचे काम सुरू केले आणि आज त्यांच्याकडे गोण्यांनी भरून औषधे जमा झाली. एकट्या व्यक्तीला हे सर्व कसे जमते, असे विचारले असता, ‘‘अकले चले थे हम और कारवॉं बनता गया.....’’. तेव्हा एकटा होतो पण, आता मदतीचे अनेक हात पुढे येत असल्याने ते समाधान व्यक्त करतात. रुग्ण दगावला आणि त्याचे कोणी नातेवाईक नसतील तर ते मृताच्या अंत्यसंस्काराचे कामदेखील पाहू लागले. कर्करोग पसरला तर रुग्णाचे अवयव कापून त्याला जीवदान दिले जाते. पण तशा अपंग झालेल्या रुग्णांना आधारासाठी इतरांची गरज भासते. ती गरज ओळखून ते रुग्णांना कृत्रिम अवयवदेखील मिळवून देऊ लागले. रस्यावरील भिकारी हे बर्‍याच वेळा मानसिक रुग्ण असतात. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना त्यांचे घर किंवा नातेवाईक आठवले तर त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था केली जाते. सावला यांनी अनोखा हृदयस्पर्शी ‘घर वापसी’ सोहळा अनेकदा अनुभवला आहे. काही जणांची कुटुंबे त्यांना पुन्हा सामावून घेण्यास नकार देतात. अशा वेळी, त्यांना पुन्हा मुंबईला आणून अनाथाश्रमात दाखल करण्याचे कामही ते तितक्याच आत्मीयतेने करतात.

सावला यांनी आतापर्यंत एकशेदोन वेळा रक्तदान केले आहे. सावला यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, पण त्यांनी स्वतःला झगमगाटापासून दूर ठेवले आहे. त्यांचे स्वप्न कर्करोग्यांची काळजी आत्मीयतेने घेणारे कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याचे आहे. त्यांची पत्नी त्यांच्या कार्यात त्यांच्याबरोबर आहे. चिंतन आणि नियासा ही त्यांची मुले त्यांच्या कार्यात जमेल तशी सहभागी होतात. चिंतनचा स्वत:चा व्यवसाय आहे. नियासा डॉक्टर आहे. ‘जीवनज्योती ट्रस्ट’ची वेबसाईट तयार करण्यात तिचा वाटा आहे.

हरखचंद सावला यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. योग, व्यायाम इत्यादी नित्यक्रम आटोपल्यावर, ते साडेआठ वाजता काम सुरू करतात. मग दिवसभरात जशी गरज असेल त्याप्रमाणे सेवा करतात. झोपण्याची वेळ नक्की नसली तरी झोपी जाताना त्यांच्या चेहर्‍यावर समाधान असते!

  • तीन कोटींची गरज
साखला यांच्या अविरतपणे सुरु असलेल्या या समाज कार्याला महिन्याकाठी ८ ते ९ लाख रूपये खर्च होतात. निधीची कमतरता जरी असली तरी त्यांच्या या सेवेत आजपर्यंत कधीही खंड पडलेला नाही. दरवर्षाला एक कोटी रूपयांचा निधी जमतो. पण या कामासाठी वार्षिक तीन कोटी रूपयांची गरज आहे.