रिलोकेशन इण्डस्ट्रीची पुनःव्याख्या करणारी २९ वर्षांची आकांक्षा

रिलोकेशन इण्डस्ट्रीची पुनःव्याख्या करणारी २९  वर्षांची आकांक्षा

Wednesday December 23, 2015,

7 min Read

तुम्हाला आठवतोय तुमचा आवडता काचेचा बाऊल ज्याचे रिलोकेशनच्या वेळी तुकडे तुकडे झाले होते ? किंवा तुमचे मौल्यवान पेंटीग जे तुटले होते ?

घर बदलणे हे कुठल्याही माणसासाठी किंवा कुटुंबासाठी एक तापदायक काम असते. एका ठिकाणाहून दुसरीकडे ट्रान्स्फर होणे हे मेट्रो सिटीमधील धकाधकीच्या आयुष्यात तर प्रत्येकवेळी त्रासदायकच ठरते. पॅकींग ऍण्ड मुविंगला त्यामुळेच बिझनेसच्या दृष्टीने खूप महत्त्व प्राप्त झाले आहे आणि प्रोफेशनल मुवर्सची गरज दिवसेंदिवस वाढते आहे. अगरवाल मुवर्स ऍण्ड पॅकर्स, ईझी मुव्ह आणि डिटीडिसी पॅकर्स ऍण्ड मुवर्स ही सर्वांच्या वापरात असलेली नावे असली तरी संपूर्ण रिलोकेशन इण्डस्ट्रीचा विचार करता हे क्षेत्र तसे विखुरलेलेच आहे. जरी या इण्डस्ट्रीमध्ये हॉस्पिटॅलिटीच्या विविध पैलूंविषयी व्यवहार होत असले तरी इथे काम करणाऱ्या लोकांमध्ये याविषयीचे प्रशिक्षण आणि जागरुकता यांचा अभाव आहे. रिलोकेशन इण्डस्ट्रीमधील अनुभवी, जवळपास तीन दशकांपासून या क्षेत्रात कार्यरत असलेले ‘पीएम रिलोकेशन्स’ आपल्या मैत्रीपूर्ण आणि प्रमाणित कार्यपद्धतीतून ही समस्या हाताळत आहेत. २९ वर्षांची आकांक्षा भार्गवा ही उत्साही मुलगी ३० करोड वार्षिक उत्त्पन्न असलेल्या या कंपनीचा कारभार सांभाळते. तिला नेहमीच रिलोकेशन इण्डस्ट्रीसाठी काम करायचे होते असे ती सांगते.

आकांक्षा भार्गवा, अध्यक्ष, सीईओ, पीएम रिलोकेशन्स

आकांक्षा भार्गवा, अध्यक्ष, सीईओ, पीएम रिलोकेशन्स


आकांक्षाने युवरस्टोरीशी केलेल्या बातचीती दरम्यान तिने ‘पीएमआर’बद्दल आणि या कंपनीने कशा पद्धतीने रिलोकेशन इण्डस्ट्रीमध्ये आवश्यक रचना आणि आंतरराष्ट्रीयकरण आणले याबद्दल सांगितले.

‘पीएम रिलोकेशन’ हे देशात किंवा देशाबाहेर रिलोकेट होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक वन-स्टॉप सोल्युशन आहे. यांच्या सर्विस पोर्टफोलिओमध्ये घरातील वस्तूंची बांधाबांध करुन ते एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर नेणे, ऑफीसचे शिफ्टींग, फाईन आर्ट्स मुविंग, ओरिएंटेशन, कल्चरल ट्रेनिंग, घर शोधणे, शाळा शोधणे, सेटलिंग इन सर्विसेस, स्थलांतर आणि ग्राहकांच्या गरजेनुसार कस्टमाइज मॉडेल्स यांचा समावेश आहे. आजघडीला ‘पीएम रिलोकेशन्स’ देशातील १३ प्रमुख शहरांमध्ये सेवा पुरविते. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व कामांमध्ये सहकार्य करण्यासाठी ‘पीएम रिलोकेशन्स’ने जगभरात आपले जाळे विणले आहे.

कंपनी देशांतर्गत ग्राहकांवर जास्त लक्ष केंद्रित करित आहे. २००९ पासून कंपनीने आपले कार्यक्षेत्र केवळ पॅकर्सपुरते मर्यादित न ठेवता रिलोकेशनसाठी सर्व प्रकारच्या सेवा पुरवायला सुरुवात केली आहे.

‘पीएमआर’ स्वतःची ओळख केवळ पॅकर्स आणि मुवर्सच्या ऐवजी सर्व गरजा पूर्ण करणारे डेस्टीनेशन सर्विस प्रोव्हायडर अशी करुन देते. ते दुसऱ्या पॅकर्स किंवा मुवर्सना कामाचे उपकंत्राट देत नाहीत किंवा काम आऊटसोअर्सही करित नाहीत. त्यांच्याकडे स्वतःचे पॅकर्स आणि सुपरवायझर्स आहेत. आकांक्षा नमूद करते की, आमची प्रशिक्षित टीम, आमचा स्वतःचा क्रू, देशभर असलेला स्वतःचा सेटअप आणि दोन दशकांपासून आमच्यावर विश्वास ठेवणारे आमचे ग्राहक हा आमचा यूएसपी आहे. शेल, अमेरिकन एम्बस्सी, अमेरिकन स्कूल, ऍमडोक्स, एचपी, ब्रिटानिआ, एसएपी, बॉस्च, आयटीसी, सीटीबँक, एचएसबीसी, नोकिया सिमेन्स, बारक्लेज, भारती एअरटेल आणि एलजी हे आमचे काही महत्त्वाचे ग्राहक आहेत.

image


भारतामध्ये हे क्षेत्र अत्यंत अव्यवस्थित आहे आणि रिलोकेशन किंवा मुविंग कंपनी म्हणजे ट्रकींग किंवा मजूरांसह टेम्पो असा समज आहे. आकांक्षा सांगते की या क्षेत्रातील संधी अजून जगासमोर आलेल्या नाहीत. या क्षेत्राकडे करिअर ऑप्शन म्हणून पाहिले जात नाही. ती म्हणते, या क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक छोट्या आणि अव्यावसायिक कंपन्यांमुळे हा व्यवसाय म्हणजे पर्सनलाइज्ड टच नसलेली हलक्या दर्जाची पॅकिंग सर्विस असा समज निर्माण झाला आहे. ही इण्डस्ट्री म्हणजे ट्रान्सपोर्टशी संबंधित आणि अशिक्षित लोकांची इण्डस्ट्री असाही लोकांचा समज आहे.

आकांक्षाला हे समज बदलायचे आहेत आणि याच उद्देशाने ती पुढे जात आहे. सगळे काही आऊटसोअर्स करता येऊ शकत असल्याने या इण्डस्ट्रीमध्ये येण्यासाठी कुठलेही बंधन नाही.

image


एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर जाऊन सेट होणे हा एक सुखद अनुभव असू शकतो आणि त्याकरिता मदत करण्यासाठी प्रोफेशनल मुविंग कंपन्या अस्तित्वात आहेत याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी बराच वेळ जावा लागेल असे आकांक्षाला वाटते. ती सांगते की देशभरात रिलोकेशनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वन-स्टॉप सोल्युशन असलेले एकही नाव नाही आणि त्यामुळेच या क्षेत्रात आता ‘पीएमआर’ची वेगळी ओळख निर्माण होत आहे. परदेशात रिलोकेशनची संकल्पना सर्रास आढळणारी आहे. मात्र भारतामध्ये याबाबत अनेकांना माहिती नाही. ही परिस्थिती लवकरच बदलण्याची गरज आहे.

‘पीएमआर’ला एफआयडीआय अधिकृत कंपनी म्हणून एर्न्स्ट यंग द्वारा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित करण्यात आले आहे. त्याशिवाय ही कंपनी आयएसओ आणि वी कनेक्ट प्रमाणित आहे. जगभरातल्या मोठमोठ्या मुव्ह मॅनेजमेंट कंपनींबरोबर ‘पीएमआर’ भागीदार आहे.

एसपी जैन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केलेली आकांक्षा सांगते, “हा माझा फॅमिली बिझनेस आहे. मी नेहमीच या व्यवसायाला पुढच्या टप्प्यावर घेऊन जायचं स्वप्न पाहिलं. रिलोकेशन इण्डस्ट्री मला नेहमीच आकर्षित करायची. २००७ मध्ये मी व्यवसायात आले. तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रवासात मी खूप अनुभव घेतले.”

पीएमआरच्या कार्यविस्तारासाठी आकांक्षा स्वतः जवळपास सहा महिने वेगवेगळ्या शहरांमध्ये राहिली. ती व्यवसायात आल्यापासून आतापर्यंत टीमची संख्या ४० वरुन ३७० वर गेली आहे.

केवळ पाच वर्षांच्या कालावधीत पीएमआरचा व्यवसाय २ करोडवरुन ३० करोड पर्यंत जाऊन पोहचला आहे. टीममधील ३७६ लोकांपैकी १३० व्हाईट कॉलर जॉबमध्ये (पर्चेस, सेल्स, मार्केटींग, ऑपरेशन्स आणि कस्टमर केअर) आहेत आणि उर्वरित ब्लू कॉलर टास्क फोर्समधील कर्मचारी आहेत.

सर्वसामान्य मुवर्स ऍण्ड पॅकर्सच्या तुलनेत पीएमआरची सर्विस दीड पट महाग असली तरी आंतरराष्ट्रीय रिलोकेशन्स कंपन्यांच्या तुलनेत सारखीच आहे.

येत्या काळात कंपनी १०-१५ करोडचा निधी उभा करण्याच्या प्रयत्नात आहे.

image


या पुरुष प्रधान क्षेत्रात आकांक्षासाठी तिच्या स्त्री असण्याबरोबरच तिचे वयही (व्यवसायात पदार्पण केले तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती) एक अडचणीत आणणारी बाब ठरते. ज्या क्षेत्राची प्रतिमा लोकांच्या मनात मजूरांचा भरणा असलेले आणि स्त्रीयांसाठी अयोग्य अशी होती, अशा क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात मुव मॅनेजमेंट कंपनी चालविणारी देशातील एकमेव महिला असल्याबद्दल आकांक्षाला स्वतःचा अभिमान वाटतो.

ती सांगते, “सप्लायर्स, मजूर, पॅकर्स आणि मोठमोठ्या ग्राहकांबरोबर व्यवहार करणं हे पुरुषांचं काम समजलं जातं. हे निश्चितच आव्हानात्मक आहे. मोठमोठी आश्वासनं, प्रवास, खालच्या स्तरावरच्या मॅनेजमेंटबरोबर व्यवहार करणं, युनिअनच्या समस्या सोडविणं, कायदे आणि राजकारणातील घडामोडींच्या अनुषंगाने निर्माण झालेले स्थानिक प्रश्न सोडविणं ही या व्यवसायाची दुसरी बाजू असते. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तरुण असल्या कारणाने अनेकजण तुम्हाला सुरुवातीला गांभीर्याने घेतच नाहीत. टीम बरोबर काम करताना आणि लोकांना नोकरीवर घेताना घडणाऱ्या घटनांमधून शिकणं, माझ्या दृष्टीकोनावर विश्वास ठेवण्यायोग्य सर्व कारणं देणं आणि पुढे जाताना मागच्या प्रत्येक टप्प्यावर दुसऱ्यांसाठी एक उदाहरण निर्माण करुन पुढची वाटचाल करणं खूप महत्त्वाचं असतं.”

‘पीएमआर’मुळे आज जवळपास ३५० कुटुंबांचे संसार सुरळीत सुरु असल्याची एक सुंदर जाणीव उद्योजिका म्हणून आकांक्षाला नेहमीच अनुभवायला मिळते. ती सांगते, “प्रत्येक सकाळी मला त्यांच्याप्रतीच्या माझ्या जबाबदारीची आणि एवढ्या लोकांना रोजीरोटी देण्याचे सौभाग्य लाभल्याची जाणीव होते. आधिकाधिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आणि प्रत्येकाला शिकता यावे आणि व्यावसायिकरित्या आणि व्यक्तिशः मोठे होता यावे यासाठी अनुकुल वातावरण कंपनीमध्ये तयार करण्याचे माझे स्वप्न आहे.”

प्रत्येकवेळी जेव्हा ग्राहक ‘पीएमआर’ची सेवा आवडल्याची पोचपावती देतात किंवा ‘रिलोकेशनबाबत आम्ही काळजीत होतो, मात्र पीएमआरने ते काम खूप सोपे केले’ असे सांगतात तो क्षण आकांक्षा आणि तिच्या टीमसाठी आनंदाचा असतो. एक क्वालिटी प्रोव्हायडर असल्याबद्दलच्या स्वाभिमानामुळेच तिचा आणि कंपनीचा प्रवास यशाच्या दिशेने निरंतर सुरु आहे. लहानात लहान टप्पा पार केल्याचा किंवा यश मिळविल्याचा आनंदही आपल्या टीमबरोबर साजरा करायला तिला आवडतो.

आकांक्षाने तिच्या वडिलांकडून प्रेरणा घेतली आहे. ती सांगते, “माझे वडिल माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहेत. ते माझे गुरु, पालक आणि मित्रही आहेत आणि आम्ही इथवर गाठलेले यश हे त्यांनी माझ्या क्षमतांवर दाखविलेल्या विश्वासामुळेच शक्य होऊ शकले. त्यांनी मला सतत पुढे जायला प्रोत्साहन दिले. माझ्या व्हिजनवरच्या त्यांच्या विश्वासाने मला पुढे जाण्यासाठी उत्तेजन मिळालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या टीमचा तुमच्यावरचा विश्वास ही सर्वात मोठी ताकद आहे.”

image


ग्राहकांना चांगली सेवा पुरविण्यासाठीच्या मुख्य प्रणालीवर विश्वास ठेवावाच लागतो हे आकांक्षा शिकली. मग तो 1 बीएचकेवाला ग्राहक असो वा 5 बीएचकेवाला, प्रत्येक ग्राहकाला पुरविलेली सेवा आणि त्याचा अनुभव सारखाच असला पाहिजे. ‘पीएमआर’ची टीम तयार करण्यासाठी आकांक्षा वेगवेगळ्या शहरात राहिली. या दरम्यान घेतलेले अनुभव तिला कॉर्पोरेट्सबरोबर व्यवहार करत असताना तसेच इतर अनेक ठिकाणीही कामी आले.

लोकांना नोकरीवर ठेवत असताना केलेल्या चुकांबद्दल आकांक्षा सांगते, “मोठमोठ्या ब्रॅण्डमधून आलेली माणसे तुमच्यासाठी चांगलं काम करत नाहीत. कर्मचारी भरतीबाबत दुसरी समस्या ही आहे की नवीन इण्डस्ट्री आणि नवीन कंपनीबाबत लोकांच्या मनात संशय असतो.” तिला असंही वाटतं की ग्राहकांबरोबर व्यवहार करताना आणि कर्मचारी निवडताना अनेकदा एक स्त्री आणि तरुण बॉस असल्यामुळेही बऱ्याच गोष्टी सुरळीत पार पडत नाहीत.

रिलोकेशनच्या सर्व गरजा पूर्ण करणारे वन-स्टॉप सोल्यूशन अशी ‘पीएमआर’ला आपली ओळख निर्माण करायची आहे. movetodelhi.com, movetobumbay.com आणि यासारख्या आणखी काही वेबसाईट तयार करण्याची कंपनीची योजना आहे. ज्यावर तुमचे शिफ्टींग सोपे करण्यासाठी सगळी संबंधित माहिती उपलब्ध असेल. लवकरच कंपनीची तीन नवीन कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये फाईन आर्ट पॅकेजिंग सेवेचाही समावेश असेल( जो सध्या खूप छोटा विभाग आहे). त्याचबरोबर लवकरच ‘पीएमआर’चे ऍपही उपलब्ध होणार आहे.

लेखक : अलोक सोनी

अनुवाद : अनुज्ञा निकम