खरकटी काढणारा ‘तो’ आज कोट्यधीश!

खरकटी काढणारा ‘तो’ आज कोट्यधीश!

Saturday November 14, 2015,

5 min Read

डोसा हे एक दक्षिण भारतीय व्यंजन. पण भारतभरात आता ते आवडीने खाल्ले जाते. देशाची सीमाही डोशाच्या स्वादाने खरंतर केव्हाच ओलांडलेली आहे. डोसासोबतच एक यशकथा जुळलेली आहे. आणि ही यशकथा येणाऱ्या काळालाही कष्ट आणि संघर्षाचे महत्त्व सांगत राहणार आहे. ‘डोशाचे डॉक्टर’ अशी ओळख असलेल्या ‘डोसा प्लाझा’चे मालक आणि संस्थापक प्रेम गणपती यांची ही यशकथा आहे. ‘डोसा प्लाझा’ हे रेस्टॉरंटच्या एका मोठ्या साखळीचे नाव आहे.

देशभरात ‘डोसा प्लाझा’चे कितीतरी आउटलेटस् आहेत. दररोज हजारो लोक त्यांतून डोसासह अन्य व्यंजनांचा आनंद लुटताहेत. याच डोसा प्लाझामागे आहे संघर्षाने भारलेली प्रेम गणपती यांची ही यशकथा! प्रेम गणपती आज दिवसाला लाखो रुपये कमवत आहेत, पण कधीकाळी ते मुंबईतील एका बेकरीमध्ये भांडी धुण्याचे काम करत असत, हे ऐकले की कुणालही नवल वाटावे. एखाद्या चांगल्या नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून प्रेम यांनी आपले मूळ गाव सोडले होते आणि मुंबईत पाउल ठेवले होते, पण टाकल्या पाउली त्यांचा विश्वासघात झालेला होता. आधार देणारेही कुणी नव्हते. स्वत:ला त्यांनी स्वत:च सांभाळले. एका अगदी अनोळखी शहरात परिस्थितीशी झुंज दिली.

image


प्रेम यांचा जन्म तामीळनाडूतील तुतीकोरिन जिल्ह्यातील नागलापुरम गावात झाला. सहा भाऊ आणि एक बहिण त्यांना आहे. वडिल योगशिक्षक होते. थोडीफार शेतीही होती. शेतीने ऐनवेळी दगा दिला. प्रचंड नुकसान झाले. दोनवेळच्या जेवणाचीही मारामार झाली. तेव्हा प्रेमने फैसला केला, की दहावीनंतर आता आपल्याला काही शिकायचे नाही. नोकरी करून वडिलांना हातभार लावायचा आहे. प्रेमने काही दिवस आपल्या गावातच लहानसहान कामे केली. गावात मोजकेच पैसे मिळायचे. मग चेन्नईला जायचे ठरवले. चेन्नईतही अशाच लहानसहान नोकऱ्या त्याला मिळाल्या. गरजा पूर्ण होत नव्हत्या. एका परिचिताने मुंबईत चांगली नोकरी मिळवून देतो म्हणून सांगितले. बाराशे रुपयांपर्यंत पगार मिळेल, असेही या परिचिताने आश्वस्त केले. प्रेम त्या परिचितासह चेन्नईहून मुंबईला निघाले. ‘व्हीटी’ स्टेशनवर (तेव्हा व्हिक्टोरिया टर्मिनल म्हणून ओळखले जाणारे सध्याचे छत्रपती शिवाज टर्मिनल) दोघे उतरले. मग लोकल रेल्वे धरली… आणि हा परिचित प्रेम यांना एकट्याला सोडून रफुचक्कर झाला. प्रेमकडे जे काही थोडेफार पैसे होते तेही या परिचिताने पसार केलेले होते.

प्रेमसमोर एकच प्रश्न होता ‘आता काय करावे?’ खिसा रिकामा होता. ओळखीचं कुणीही नव्हतं. वरून तमीळ सोडली तर कुठलीही भाषा प्रेम यांना समजत नव्हती. लोकांशी बोलण्यातही त्यांना अडचणी येत होत्या. हिंदी, मराठी, इंग्रजीतले त्यांना अ म्हणता ब कळत नव्हते. लोकलने वांद्रे स्थानकावर उतरले तेव्हा ते केवळ विमनस्क होते. लोकांची हे गर्दी. गर्दीतून आपण कोणत्या वाटेने जायचे, कुठे जायचे काही कळत नव्हते. मदतही कुणाला मागावी, कशी मागावी… प्रश्नच प्रश्न पुढ्यात होते. एका टॅक्सीवाल्याला प्रेमची दया आली आणि त्याने धारावीतील मारियम्मन मंदिरापर्यंत प्रेमला नेऊन पोहोचवले. मंदिरात येणारे बहुतांश तमीळ भाषक होते म्हणून टॅक्सीवाल्याला वाटले कुणीतरी याची मदत इथे करेल आणि प्रेम पुन्हा आपल्या गावी परतू शकेल. घडलेही तसेच. इथले तमीळ लोक प्रेमची मदत करायला तयार झाले. प्रेमने परत गावी जावे म्हणून ते तजवीज करू लागले. अशात प्रेमने सांगितले, की आपल्याला इथेच नोकरी करायची आहे. गावी परतायचे नाही.

दीडशे रुपये महिन्याने चेंबूरच्या एका बेकरीत भांडी स्वच्छ करण्याचे काम प्रेमला मिळाले. बरेच दिवस इथे प्रेमने काम केले, पण मोबदला फारच कमी होता. त्याचा स्वत:चा खर्चही त्यातून निघत नसे. त्याला तर घरीही पैसे पाठवायचे होते. मला वेटर म्हणूनही काम द्या, असे प्रेमने मालकाला सांगितले, पण तेव्हाची परिस्थिती लक्षात घेता मालकाने नकार दिला. प्रेम भांडी धुत राहिला. पण पुढे त्याने जोडीला रात्री चालणाऱ्या एका ढाब्यावर खानसाम्याचे कामही सुरू केले. प्रेमला डोसा बनवण्याचा छंद होता म्हणून या मालकानेही त्याला डोसा बनवण्याचे काम दिले. रात्रंदिवस कष्ट उपसून काही रक्कम जमवण्यात प्रेमला यश मिळाले. आता आपण आपले स्वत:चे काही काम सुरू करावे, असे त्याला वाटू लागले. जमलेल्या पैशांच्या बळावर इडली-डोसा बनवणारी यंत्रणा त्याने भाड्याने घेतली. काही भांडी विकत घेतली. स्टोव्ह घेतला. १९९२ ची ही गोष्ट. आपली लोटगाडी घेऊन प्रेम वाशी रेल्वे स्थानकावर पोहोचला आणि तिथे डोसाविक्री सुरू केली. स्वाद असा काही होता, की त्याचा सुगंध दरवळलाच आणि प्रेम लवकरच प्रसिद्ध झाला. लांबून-लांबून लोक प्रेमकडे डोसा खायला येऊ लागले. विद्यार्थ्यांमध्ये तर प्रेमचे डोसे विशेष लोकप्रिय ठरले. अनेक विद्यार्थी प्रेमचे मित्रही बनले. हेच विद्यार्थी प्रेमला व्यवसाय वाढवण्याचे मंत्रही देऊ लागले. विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनाने आणि मदतीने प्रेमने १९९७ मध्ये एक दुकान भाड्याने घेतले. दोन पगारी नोकर ठेवले. ‘डोसा रेस्टॉरंट’ सुरू झाले. ‘प्रेम सागर डोसा प्लाझा’ असे या रेस्टॉरंटचे नामकरण झाले. ज्या दुकानावर हे डोसा प्लाझा सुरू झाले, ते आधी ‘वाशी प्लाझा’ म्हणून ओळखले जात होते. ‘प्लाझा’ शब्द म्हणूनच प्रेमने कायम ठेवला, जेणेकरून लोकांच्या तोंडावर आपले नावही लवकर रुळावे. आणि झालेही तसेच. दुकान जोरात चालायला लागले.

विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रेम कॉम्प्युटर चालवायलाही शिकला. कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या मदतीने जगभर ठिकठिकाणी बनवण्यात येणाऱ्या व्यंजनांची माहिती तो मिळवू लागला व विविध पदार्थ बनवण्याचे कौशल्य त्याने आत्मसात केले. याचदरम्यान प्रेमला एक कल्पना सुचली आणि या कल्पनेने प्रेमचे आयुष्य बदलून टाकले. स्वप्नांना पंख दिले.

प्रेमने डोशांवर प्रयोग करायला सुरवात केली. वेगवेगळ्या प्रकारचे डोसे तो बनवू लागला. वेगवेगळ्या पदार्थांना डोशाशी जोडण्याचे कामही त्याने केले. चायनिज् पसंत करणाऱ्यांसाठी त्याने चायनिज डोसा बनवला. उत्तर भारतीयांसाठी खास डोशामध्ये पनिरचा वापर त्याने करून पाहिला. आपले प्रयोग यशस्वी ठरतील की नाही हे जाणून घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांना तो हे डोसे आधी खाऊ घालत असे. विद्यार्थ्यांनी ओके दिल्यानंतर मग तो ते विक्रीसाठी ठेवत असे.

लवकरच आपल्या रेस्टॉरंटमध्ये २० नाना प्रकारचे डोसे तो विकू लागला. लोकही गर्दी करू लागले. गर्दी आता आवरली जात नव्हती, मग त्याने रेस्टॉरंट वाढवले. लोकांच्या मागणीबरहुकूम नवनवे डोशाचे प्रकार प्रेमने शोधून काढले. २००५ पर्यंत डोशाचे वेगवेगळे १०४ प्रकार आता या रेस्टॉरंटमध्ये मिळू लागलेले होते. प्रेमचे डोशांमधील संशोधन इतके पुढे गेले, की लोकही त्यांना ‘डोशाचा डॉक्टर’ म्हणू लागले. प्रेमने आता रेस्टॉरंटची एक शाखाही सुरू केली. शाखा वाढतच गेल्या. काम आता आवरले जात नव्हते म्हणून प्रेम यांनी आपल्या भावाला गावावरून बोलावून घेतले.

प्रेम यांच्या डोशाची किर्ती आता अत्र-तत्र-सर्वत्र पसरली. मुंबईची सीमा तिने ओलांडली. देशातील विविध शहरांतून प्रेमचे डोसा प्लाझा सुरू झाले. सर्वत्र ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेला. आता प्रेमच्या डोशाने देशाची सीमाही ओलांडली. न्युझिलंड, दुबई, मिडलइस्टसह दहा विविध देशांतून प्रेमचा डोसा धडकला. इथेही प्रेमचे डोसा प्लाझा सुरू झाले. जगभरात ही लोकप्रियता वाढतच चाललेली आहे. ‘डोसा प्लाझा’तील १०५ प्रकारच्या डोशांपैकी २७ प्रकारांचे स्वत:चे असे ट्रेडमार्क आहेत. भारतातील विविध राज्यांतून लोक आता ‘डोसा प्लाझा’तील डोशांसह विविध व्यंजनांचा आनंद घेताहेत.

प्रेम गणपती यांची ही यशकथा खुप काही शिकवून जाणारी आहे. ही कथा म्हणजे संघर्षातून काय काय प्राप्त केले जाऊ शकते, त्याचा मासलेवाइक नमुनाच आहे. एक व्यक्ती जी कधी काळी लोकांची उष्टी भांडी धुण्याचे काम करत होती, ती आपल्या कल्पनाशक्तीच्या आणि कष्ट उपसण्याच्या तयारीच्या बळावर स्वत:ला आज शेकडोंचा पोशिंदा म्हणून प्रस्थापित करते. जगभरात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवते, हे खरोखर प्रेरक आहे.