मुंबईत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र सुरू  

1

उद्योग क्षेत्रातील सर्व प्रकारच्या वादांचे निराकरण करणे मुंबईतील आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रामुळे शक्य होईल, तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रासाठी जोरदार प्रयत्न करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते  ट्रायडंट हॉटेल येथे इंटरनॅशनल अरबीट्रेशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अरबीट्रेशन सेंटर मुंबईत व्हावे म्हणून 18 महिन्यापासून काम सुरू होते. आता हे केंद्र सुरु झाल्यामुळे सिंगापूरला जायची गरज नाही. या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असून संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असेल. सरकारने अरबीट्रेशन संदर्भात खूप चांगले धोरण तयार केले असून हे धोरण लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

आर्थिकदृष्ट्या भारत जगाच्या पाठीवर पुढे जावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया द्वारे साऱ्या जगाचे लक्ष वेधले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जगभरचे उद्योग मुंबईत येत आहेत. त्यांच्या उद्योग धंद्यातील अडचणी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लंडन, सिंगापूर, हाँगकाँग येथे जाण्याची आता गरज नाही. मुंबईचे लवाद केंद्र खुले झाले आहे. येथे उत्तम प्रकारे काम चालेल याची आपल्याला खात्री आहे. आशिया खंडातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हे केंद्र उत्तम प्रकारे वाद मिटवणारे केंद्र बनेल. लवकरच या लवाद केंद्राची स्वत:ची नवी इमारत उभी करण्यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र सुरु करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून लवकरच कार्यवाही सुरू होईल, असेही  फडणवीस यांनी  सांगितले.

मुख्य सचिव  क्षत्रिय म्हणाले की, ऑक्टोबर महिना हा मुंबई आणि महाराष्ट्रासाठी फारच चांगला ठरला आहे. या महिन्यात संपूर्ण मुंबई परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी सिसिटीव्ही कॅमेरे लावले आहेत. जनतेच्या सोईसाठी ऑनलाईन सेवा सुरू केल्या. नागपूर शहर हे डिजिटल सिटी म्हणून जाहीर झाले. आता मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानी मध्ये अरबीट्रेशन सेंटर सुरू झाले. या सर्व नव्या सोईसुविधा जनतेसाठी सुरू करताना खुपच आनंद होत आहे. मुंबईत सुरू केलेले लवाद केंद्र हे उद्योग क्षेत्रातील वाद, समस्या सोडविण्याचे उत्तम प्रकारे काम करेल.

या कार्यक्रमात खा. श्रीमती महाजन यांनी लवाद केंद्रास शुभेच्छा देऊन मेक इन इंडिया अंतर्गत पंतप्रधान श्री. मोदी यांनी सुरु केलेल्या मोहिमेची माहिती दिली. यावेळी उद्योग आणि विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.