हिरव्यागार शेतापासून सिनेमाच्या रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास

0

ख्वाडा सिनेमातल्या लक्षवेधी व्यक्तिरेखांमध्ये सर्वात अग्रभागी रहाते ती सिनेमातला नायक बाळूची व्यक्तिरेखा. स्वतःची पिळदार शरीरयष्टी आणि दिसण्यावर लट्टू असलेला बाळू खरेतर आजच्या अनेक तरुणांचा प्रतिनिधी आहे, वडिलोपार्जित चालत आलेला धनगरी पेशा त्याला नाही करायचाय तर कुस्तीवीर बनण्याची स्वप्नं तो पहातोय. बाळूची भूमिका पडद्यावर यशस्वीपणे साकारणारा अभिनेता भाऊराव शिंदे आता नव्या सिनेमात व्यस्त झालाय.

ख्वाडा सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदरच भाऊला लक्षवेधी अभिनेत्याचा संस्कृती कलादर्पण पुरस्कार मिळाला शिवाय प्रभात पुरस्कारानेही त्याला सन्मानित केले गेले.. ख्वाडामुळे भाऊ आणि त्याच्यासारख्या अनेक ग्रामीण तरुणांना नवा चेहरा मिळाला, ओळख मिळाली आणि ही ओळख फक्त त्यांच्या गावांपर्यंतच सीमित नाही हे महत्वाचे. भाऊ सांगतो की “मी जन्माने आणि कर्माने एक शेतकरी आहे पण काहीतरी वेगळे शिकावे म्हणून अहमदनगर येथील न्यु आर्टस अँड सायन्स महाविद्यालयातनं मी फिल्म मेकिंगचे शिक्षणही घेतले. ख्वाडा सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव माझा मित्र, खरेतर त्याला मदत म्हणून मी सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी या सिनेमासाठी सांभाळत होतो.

ख्वाडाचा विषय अत्यंत रांगडा आणि अस्सल मातीतला होता, त्यामुळे या सिनेमातल्या बाळूच्या भुमिकेसाठी आम्हाला तसाच रांगडा आणि भारदास्त नायक हवा होता. आमच्या टीमने ख्वाडाच्या नायकासाठी अनेक ऑडिशन्स घेतल्या पण एकही नायक पसंतीस पडत नव्हता.”

भाऊ पुढे सांगतो की “एके दिवशी अचानक भाऊरावने मला वजन वाढवायला सांगितले, मला काहीच समजले नाही तेव्हा तो बोलला की मी सांगतो तसे कर बस्स.. खरेतर तेव्हाही माझे वजन ६४ किलो होते, भाऊरावने मला माझे तब्बल ७५ किलोपर्यंत वजन वाढवायला सांगितले आणि तेही एक महिन्यात. मग काय मी कामाला लागलो, तब्बल महिनाभरात मी माझे वजन ७७ किलो केले. आणि जेव्हा भाऊरावला भेटलो तेव्हा त्याने बाळूसाठी माझी निवड पक्की झाल्याचे मला सांगून धक्काच दिला.”

शेतकरी घरात जन्मलेल्या भाऊच्या आई वडिलांना तो मोठा साहेब व्हावा असे वाटत होते पण गावातल्या तरुणांप्रमाणे भाऊला सिनेमाची भारी आवड, सिनेमा दिग्दर्शित करावा ही त्याची इच्छा. पण म्हणतात ना आयुष्यात आपण ठरवतो एक आणि घडतं काहीतरी वेगळंच, भाऊच्या बाबतीतही हेच झालं.

ख्वाडातल्या त्याने साकारलेल्या बाळूमुळे, पीळदार शरीरयष्टी असणारा गावरान भाऊ आज अवघ्या सिनेसृष्टीचा चर्चेचा विषय बनलाय. अर्थात कॅमेरासमोर वावरणं ही सोपी गोष्टी नव्हती, कॅमेरासमोरचा वावर, संवादफेक या सगळ्याच गोष्टी त्याच्यासाठी नव्या होत्या, दिग्दर्शक भाऊराव आणि सिनेमातले सहकलाकार आणि प्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे यांच्या मार्गदर्शनामुळे या गोष्टी जमत गेल्या. भाऊ सांगतो, “मी देखणा नाही, रुबाबदार नाही हे मलाही माहीतीये पण ख्वाडामधला बाळू मात्र स्वतःला देखणा मानतो, रुबाबदार मानतो. ख्वाडात अभिनय करताना माझी सुरुवात सर्वात आधी इथून झाली, स्वतःबद्दलचा विश्वास आणि चार लोकांमध्ये त्या विश्वासाने वावरणं ही ख्वाडाची मला देण आहे.”

बाळूबद्दल बोलताना भाऊ सांगतो की “मी यापुर्वी ला स्ट्राडा हा फ्रेडेरीको फेलीनीचा सिनेमा पहिला होता. या सिनेमातील जेलेटा मसिनाचा अभिनय आणि यातले बारकावे मी नोंद केले होते, बाळू साकारताना या बारकाव्यांची मला मदत झाली.”

भाऊ हे चांगलंच जाणून आहे की या क्षेत्रात जर कायम रहायचं असेल तर फक्त एका सिनेमाचा अनुभव पुरेसा नाही, सातत्य ठेवायला हवं, नवीन गोष्टी आणि प्रयोग करत रहायला हवं, भाषा स्वच्छ असावी त्यावर प्रभुत्व बनवावं लागेल. ज्याच्या तयारीत भाऊ सध्या मग्न आहे.