करूणेतून झाला ‘लगेजडिल्स’चा जन्म

0

आपल्या आयुष्यात घडलेली एखादी छोटी घटना देखील आपल्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलण्यास कारणीभूत होऊ शकते. याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत प्रशांत शाह. अहमदबादच्या निरमा विद्यापीठात आपले शिक्षण घेतलेल्या आणि काही वर्षे बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी केलेल्या प्रशांत शाह यांचे जीवन गेल्या वर्षी घडलेल्या एका घटनेनंतर पूर्णपणे बदलून गेले.

आपल्या बहिणीने पाठवलेली राखी आणि मिठाईचे कुरिअर आणण्यासाठी प्रशांत एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी एक महिला कंपनीच्या अधिका-यासोबत किंमतीविषयी घासाघीस करत आहे असे दृश्य त्यांनी पाहिले. आपले कुरिअर घेऊन निघणार तोच प्रशांत यांना त्या महिलेने आपली दु:खद कहाणी ऐकवली. त्या असहाय्य महिलेला राजस्थानातील एका खेडेगावात आपल्या आजारी वडिलांना कुरिअरने औषध पाठवायचे होते. परंतु त्यासाठी ४०० रूपयांची आवश्यकता होती आणि ते तिच्याकडे नव्हते. एका संस्थेच्या मदतीने तिने ही औषधे खरेदी केली होती, मात्र आता ती पाठवण्यासाठी आपल्याकडे फक्त १०० रूपयेच असल्याचे तिने प्रशांत यांना सांगितले

त्या महिलेची परिस्थिती पाहून प्रशांत यांनी कुरिअर कंपनीच्या अधिकार-याला बाकीचे पैसे दिले आणि त्या महिलेचे कुरिअर सांगितलेल्या पत्त्यावर पाठवण्याची विनंती केली. आपला एक भाऊ आहे, मात्र तो खूप स्वार्थी आहे. तो कधीही आपल्या आजारी आई-वडिलांची मदत करत नाही असे त्या महिलने आपल्या डोळ्यात अश्रू आणत प्रशांतला सांगितले. त्या महिलेने प्रशांत यांना पुढे सांगितले की, आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढी मदत मी माझ्या आई-वडिलांना करण्याचा प्रयत्न करते. त्या महिलेने पुढे सांगितले, “ ज्या प्रकारे आपण माझी समस्या पाहून कोणताही स्वार्थ न ठेवता माझी मदत केलीत, त्या वरून मला वाटले की आपण माझे बंधू आहात. आपल्याला ईश्वर सदैव आनंदी ठेवो. आपल्याला या बहिणीकडून रक्षा बंधनाच्या आगाऊ शुभेच्छा.”

प्रशांत यांच्यासाठी ही ह्रदय हेलावणारी घटना होती. एक छोटीशी रक्कम कितीतरी लोकांच्या आयुष्यात किती महत्त्वाची असू शकते याची प्रशांत यांना जाणीव झाली. या विचाराने प्रभावित होऊन प्रशांत यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ‘लगेजडिल्स’ची सुरूवात केली.

‘लगेजडिल्स’ हे एक ऑनलाईन पोर्टल आहे. ते पूर्णपणे वाहतूक आणि लॉजिस्टिक उद्योगाला समर्पित आहे. आपले पार्सल किंवा कुरिअर पाठवण्यासाठी या पोर्टलवर आपल्याला काही सवलती, ऑफर्स किंवा स्कीम्सचा फायदा देखील मिळू शकतो. उपयोगकर्त्याला केवळ या पोर्टलवर आपले रजिस्ट्रेशन करावी लागते. त्यानंतर तो या सवलती घेण्यास पात्र ठरतो. सध्या अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि मुंबई अशा देशातील चार शहरांमध्ये ‘प्रोफेशनल कुरिअर’ आणि ‘महावीर कुरिअर सर्वीस’ सारख्या कंपन्यांसोबत ‘लगेजडिल्स’ची सेवा सुरू आहे.

‘लगेजडिल्स’ हे पूर्णपणे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. प्रशांत यांना कुरिअर कंपनीत भेटलेल्या महिलेसारख्या लोकांपर्यंत या सेवांचा लाभ लवकर पोहोचेल असे नाही, परंतु या कुरिअर कंपनीची सेवा परवडणा-या दरात लोकांपर्यंत पोहोचवणे हा या कंपनीचा उद्देश आहे. हे पोर्टल म्हणजे एक असेही ठिकाणी आहे, जिथे दरांचे नियमन होते आणि ग्राहकांसोबतच कुरिअर कंपन्यांना देखील आवश्यक ती माहिती मिळत राहते.

प्रशांत यांनी या कामी स्वत:ला पूर्णपणे वाहून घेतले आहे. त्यांचे दोन भागीदार दिवसा नोकरी सुद्धा करतात. ‘लगेजडिल्स’ पोर्टलची ही प्राथमिक अवस्था आहे. या पोर्टलचे अजून बरेच काम बाकी असले तरी ते सुरू करण्यामागे अतिशय चांगली भावना आहे. प्रशांत सांगतात, “ भविष्यात आमच्या या पोर्टलला महानगरांपासून ते ३ आणि ४ टायर शहरांपर्यंत घेऊन जाण्याची आमची योजना आहे. यासोबत या पोर्टलचे एक मोबाईल अॅपसुद्धा सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत.”

जर आपण बारकाईने पाहिले तर आपल्या लक्षात येईल, की आज ई-कॉमर्सच्या क्षेत्रात लॉजिस्टिक एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या क्षेत्रातील अनेक कंपन्या अधिकाधिक चांगली कामगिरी व्हावी यासाठी नवे नवे उपाय करतानाही दिसत आहेत. त्याच दिवशी वितरण ( सेम डे डिलिव्हरी), एका तासात 'पत्रांच्या बटवडयाची हमी' अशा अंमलात आणलेल्या पायलट योजना म्हणजे भारतातील लॉजिस्टिक क्षेत्राच्या बदलत्या चित्राची उदाहरणे आहेत. प्रशात यांना ‘लगेजडिल्स’ सोबत फार मोठा पल्ला गाठायचा आहे. परंतु या क्षेत्रात अशा प्रकारे ग्राहकांना लाभ मिळावा या उद्देशाने विचार करणे आणि तो प्रत्यक्ष कृतीत उतरवणे यासाठी प्रशांत हे आपल्या प्रशंसेस नक्कीच पात्र आहेत.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe