माझी एखादी कल्पना कौटुंबिक जीवनाचा भाग व्हावी हे माझं स्वप्न : व्यावसायिक जेसिका जयनेचा तिच्या नवीन अविष्कारा बाबत प्रतिसाद

0

जेसिका जयनेला तिच्या व्यवसायात आलेल्या अपयशाबद्दल अजिबात कमीपणा वाटत नाही. " मी २१ वर्षांची असताना एक नियतकालिक सुरु केलं होतं पण त्याला अपयश आलं. त्यानंतर मी शार्कफिन नावाचं विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू विक्रीचं दुकान सुरु केलं. मला पहिल्यापासूनच विविध कलाकृती, कलात्मक गोष्टी आणि फॅशनची आवड होती. अशा वस्तू तयार करणं आणि त्याची विक्री करणं हे मला आवडतं. गेल्या काही वर्षात मी अशा प्रकारचं काम करण्यात तरबेज झाले आहे. शार्कफिनने देशातील उत्तम ब्रांड तयार केले आणि त्याच बरोबर एका पेक्षा एक सुंदर कलाकृतीही तयार केल्या."


पण जस जशी जेसिका प्रगल्भ होत गेली तसं अजून काहीतरी वेगळं करावं असं तिला वाटायला लागलं. शार्कफिनच्या यशाबद्दल जेसिकाला अभिमान आहे, त्यामुळेच तिला वेगळी ओळख मिळाली. पहाडी लोकल हा तिने तयार केलेला सर्वोत्कृष्ट ब्रांड ठरला. ऑरोस ऑर्गनिक प्रायव्हेट लिमिटेड या सेंद्रिय उत्पादनं बनवणाऱ्या कंपनीची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी तिने हा ब्रांड तयार केला होता.

ती सांगते," आम्ही हिमालयातील काही वैशिष्ठ्यपूर्ण उत्पादनं शोधतो आणि त्या आकर्षकरित्या बाजारात आणून पहाडी भागातील वस्तूंचा शहरांमध्ये प्रचार करतो. आमचा हा साधा कार्यक्रम उत्पादनांची गुणवत्ता, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि इतर गोष्टींसाठी उपयुक्त आहे. उत्पादनाची गुणवत्ता जपण्यासाठी त्याची नोंदणी, तपासणी, त्यावरील प्रक्रिया आणि त्यासाठीचा ग्राहक निर्माण करणं अशा अनेक गोष्टी करायला लागतात.


जेसिका मुंबईत जन्मली आणि तिथेच लहानाची मोठी झाली. ती सिमल्याला जाण्याआधी पूर्णपणे शहरी मुलगी होती. जर्दाळूच्या बियांच्या तेलाचे फायदे जाणून घेण्यासाठी ती काही काळासाठी सिमल्याला गेली होती. " त्या दरम्यान माझ्या जाणीवा बदलल्या आणि मला मिश्रित वस्तूंपेक्षा नैसर्गिक गोष्टी अधिक आवडायला लागल्या. त्यानंतर मी कमी प्रक्रिया केलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी झगडायला लागले आणि त्यापासून मला अपेक्षित बदल दिसायला लागले. जेव्हा मला जर्दाळूच्या बियांपासून बनवलेल्या तेलाचा शोध लागला ती म्हणजे एक जादू होती. मी त्या तेलाचा उपयोग कोरड्या त्वचेसाठी, वेदना, मुरगळ, खाज, त्वचेवरील डाग आणि केसांसाठी वापरत होते. त्या तेलाचे विविधांगी उपयोग आणि त्याचे फायदे बघून मी आश्चर्यचकित झाले. तेलावर केलेल्या अनेक संशोधनानंतर त्यामध्ये कर्करोगाला प्रतिबंध करण्याचे गुण आहेत तसंच इतरही अनेक गुण निदर्शनाला आले. हे बहुगुणी तेल जगाला माहित व्हावं असं मला वाटायला लागलं."


जेसिकाला विश्वास आहे की, बाजारपेठेत पहाडी लोकलचं वर्चस्व निर्माण व्हायला ही योग्य वेळ आहे. रसायनं नसलेली आणि नैसर्गिक उत्पादनांना आणि सौंदर्य उत्पादनांना मागणी वाढत आहे. हा उलटा प्रवास सुरु झाला आहे. आपण पुन्हा मूळ स्वरूपातील वस्तूंचा वापर करायला लागलो आहोत, आणि एखादी वस्तू जेवढी साधी असेल तेवढीच ती आकर्षक असते."

तिच्या या प्रायोगिक प्रयोगाला यश मिळाल्याने तिचा आत्मविश्वास वाढला. ग्राहकांच्या आवडी निवडी जाणून घेण्यासाठी मी एक वर्ष द्यायचं ठरवलं हा कालावधी त्यासाठी पुरेसा होता. माझा अनुभव अतिशय सकारात्मक होता. मला अतिशय उत्तम पाठींबा मिळाला, माझा मित्र परिवार आणि इतर काही मिसमालिनी आणि ब्राऊन पेपर बॅग यासारख्या संस्थांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला. पहाडी लोकलच्या माध्यमातून हॉटेल्स, स्पा, सलोन्स, आरोग्य केंद्र आणि दुकानं यांच्याशी संपर्क साधला. अशा उत्पादनांची अतिरिक्त नोंदणी आमच्याकडे झाली. आता उत्पादनं बाजारात आणण्याची वेळ झाली होती." ती हसत हसत सांगते. शहरात या सेंद्रिय आणि पहाडातील नैसर्गिक उत्पादनांच स्वीकार केला जाईल याची खात्री होती. हिमालयातील नाजूक पर्यावरण व्यवस्थेला इतक्या मोठ्या प्रमाणावर मागणी झेपेल का?


जेसिका माहिती देते," उत्पादनांच्या पुरवठ्याची प्राथमिक मागणीपेक्षा पुरवठा अधिक असेल. पहाडी भागातील फळांवर अतिरिक्त मागणीचा परिणाम होतोय असं कधीतरी जाणवलं तर मी तिथून माघार घेईन. मला सेंद्रिय उत्पादनांच्या क्षेत्रात काम करायचं आहे आणि मागणी आणि पुरवठा यातील समतोल राखायचा आहे."  

ती पुढे सांगते," ही सुरवात आहे पण आम्ही 'सीएसआर' गुंतवणूक करायला सुरवात केली आहे. आम्ही रोजगार निर्मिती करत आहोत, मुलभूत सेवा सुविधा निर्मितीसाठी मदत करत आहोत, तसंच आम्ही सिमल्यातील एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तिकडे कामं करत आहोत. ही संस्था महिला सक्षमीकरण आणि मुलांच्या शिक्षणा संदर्भात काम करत आहे."

जेसिकाचा हा आगळा वेगळा व्यवसायामुळे ती तिच्या कामाच्या बाबतीत नेहमी उत्साही असते. त्यामुळे तिचं काम कमी होण्या पेक्षा सतत वाढत आहे. ती सांगते," माझ्या प्रत्येक व्यवसायात माझी थोडीशी तरी झलक आहे, सर्जनशीलता, काळजी, आणि ग्राहकांचा अनुभव हे माझे अंतर्गत गुण आहेत."

शार्कफिनमुळे अधिक कलात्मक गोष्टी बनवायची संधी मिळाली, ते पण कपडे, चामड्याच्या वस्तू यापासून ते किचेन पर्यंत. मी खूप नशीबवान आहे, कारण मला यामुळे अनेक नामवंत व्यक्ती आणि संस्थांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. दिएगो, पेर्नोड रिकार्ड, वायाकोम १८, राजस्थान रॉयल्स हे त्यापैकी काही.

शायनी हैप्पीची निर्मिती झाली कारण मला लहान मुलं आवडायची आणि माझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्यांना एकाच वेळी मुलं झाली त्यामुळे त्यांना भेट द्यायची म्हणून या उत्पादनाची निर्मिती झाली. त्या उत्पादनाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

पहाडी लोकल हे माझ्याबरोबरच मोठं झालं. यामुळे मी प्रगल्भ झाले तसंच मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली. मला असं वाटतंय आता परत देण्याची वेळ आली आहे, यासाठी ग्राहकांना आणि उत्पादकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. पहाडी लोकल या नावाशी आम्ही एकनिष्ठ आहोत, आमची उत्पादनं स्थानिक आहेत, ती शुद्ध स्वरुपात आहेत, आणि आम्ही ग्राहकांना खात्री देतो की आमची उत्पादनं दर्जेदार आहेत आणि ती शहरी भागात अजून पोहोचली नाहीत, पण ती प्रमुख भागात उपलब्ध आहेत."

पहाडी लोकल बाबतच तिचं स्वप्न हे तिने तिचे इतर व्यवसाय सुरु केले तेंव्हा जे होतं तेच आताही होतं." माझी एखादी कल्पना प्रत्यक्षात येते आणि ती दैनंदिन जीवनाचा भाग होते हेच माझं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाची रोज जाणीव होणं आणि ते पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न करणं यातच खरा आनंद आहे."

लेखिका : राखी चक्रवर्ती

अनुवाद :श्रद्धा वार्डे

Related Stories

Stories by Team YS Marathi