वयाच्या ५५ व्या वर्षी ज्वेलरी डिजायनर बनलेल्या प्रग्ना दोशी

0

भारतीय स्त्रीच्या जीवनात सौभाग्याचे लेणे किंवा माहेरवाशीणीचे वाण म्हणून दागिन्यांना फार महत्व आहे. सुंदर दिसण्याची हाउस कोणाला नसते, संस्कृती आणि आवड यांचा संगम झाला की त्या दागिन्यांना देखील वेगळेच सौदर्य लाभते. प्रत्येक भारतीय स्त्रिला  म्हणूनच जिव्हाळा आणि सौदर्य यांच्या ओढीने दागिने महत्वाचे वाटतात आणि मग शोध सुरु होतो अशा दागिन्यांना तुमच्यापर्यंत घेऊन येणाऱ्यांचा.

कल्पनांचा अविष्कार आणि त्यातून उद्योग निर्मिती कुठल्याही वयात करता येऊ शकते.  मुंबईत राहणाऱ्या प्रग्ना महेश दोशी यांच्याबाबतीत हे तंतोतंत खरं ठरलंय. त्यांनी वयाच्या ५५  व्या वर्षी आपला ज्वेलरी डिजाईन्सचा व्यवसाय सुरु केला आणि गेल्या पाच वर्षात त्यांनी मुंबईतल्या नावाजलेल्या ज्वेलरी डिजायनर म्हणून नाव कमवलंय. काही वर्षापूर्वी जर त्यांना कुणी सांगितलं असतं की तुम्ही चांगल्या ज्वेलरी डिजायनर्स व्हाल तर त्यावर प्रग्ना यांचा विश्वास बसला नसता. पती पत्नी आणि तीन मुली असा त्यांचा संसार. तीन मुलींचं शिक्षण झालं. त्यांची लग्न झाली. तोपर्यंत त्यांचं विश्व हे घरातल्या चार भिंतीतच होतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मुंलींना काय हवंय. नवऱ्याचा डबा वेळेवर गेला की नाही, हे सर्व करण्यात त्यांचा दिवस जात होता. पण सर्वात लहान मुलीचं लग्न झालं. त्यानंतर त्यांचं जीवन बदललं. त्यांना खूप वेळ मिळू लागला. मुली आपआपल्या घरी निघून गेल्या आणि घर सुनंसुनं झालं. कधी कधी ते खायला उठायचं. एकटं बसण्याची सवय नव्हती. मग आपण काय करु शकतो याचा विचार त्या करु लागल्या आणि एक दिवस अचानक ज्वेलरी डिजाईन्सचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी सुरुवात केली. 

प्रग्ना सांगतात, ” मला दागिन्यांची आवड होती. पण कधी डिजाईन्स करु शकेन असं वाटलं नव्हतं. सर्वात शेवटच्या मुलीचं लग्न झाल्यावर एकटेपण आलं. मन कुठेतरी रमणं गरजेचं होतं. काय माहित देवाच्या कृपेनं असेल किंवा महाराजांच्या आशिर्वादानं असेल मला अचानक ज्वेलरी डिजाईन्स करण्याचं मनात येऊन गेलं. मग मी बाजारात गेले आणि पहिल्यांदाच  देवासाठी मोत्याचा हार बनवला, तो मला आवडला तो मंदिरातल्या देवाच्या फोटोला  घातला आणि त्यातून मला जे आंतरिक समाधान मिळालं ते मी व्यक्त करु शकत नाही. मग मार्केटमध्ये जाऊन आणखी साहित्य आणलं. त्यातून वेगवेगळ्या डिजाइन्स बनवल्या. त्या मुलींना दाखवल्या. त्यांनाही त्या आवडल्या. मग आजूबाजूच्या मैत्रिणींना दाखवल्या, त्यांना ही आवडल्या. कुठून आणल्या असं त्यांनी विचारलं तर मी त्यांना सांगितलं की, मीच बनवलं. त्यांनाही विश्वास बसला नाही. त्यांनी आम्हालाही हे बनवून हवंय. तुम्ही द्याल का अशी विचारणा केली. तिथूनच माझ्या या ज्वेलरी डिजाईन्सची सुरवात झाली. आणि विस्तार होत गेला.” 

मैत्रिंणींनी आपली आवड त्यांना कळवली होती. प्रग्ना यांनी ज्वेलरी डिजाईनसाठी लागणारं साहित्य जमा करायला सुरुवात केली. त्यांनी काही कारागिर गाठले. त्यांना आपल्या कल्पनेतल्या डिजाईन्स समजावून सांगितल्या. सर्व साहित्य त्यांना दिले. आणि रोज त्यांच्याकडे जाऊन त्यांनी त्या डिजाईन्स योग्य बनतायत की नाही याचा पाठपुरावा केला. पहिल्या ऑर्डरला चांगला प्रतिसाद मिळाला. मग माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून प्रग्ना यांचं नाव त्या राहत असलेल्या सोसायटी आणि विभागातून सर्वदूर पोचलं. त्यांना अधिकाधिक ऑडर्स येऊ लागल्या. त्यांना आता आपला हा व्यवसाय वाढवायचा होता. मग त्यांनी अनेक प्रदर्शनांमध्ये आपला स्टॉल लावला. तिथं ही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. मग एक एक करत अनेक प्रदर्शांनामधून त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती वाढू लागली. त्यांनी मुलींनाही बरोबर घेतलं. मुलीनी आईच्या या ज्वेलरी डिजाईनला नाव दिलं, दिवा फॅशन ज्वेलरी. त्याचं फेसबुक पेज सुरु करण्यात आलं आणि त्यातून मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता.

“ ज्वेलरी डिजाईन्सचं प्रशिक्षण मी कुठून घेतलेलं नाही. एखादी डिजाईन करताना मी विचार करते जर हा दागिना मला घालायचा असल्यास तो मला आवडेल का? याचं उत्तर होय आलं की मग तो कसा असला पाहिजे, त्याची रंगसंगती कशी असावी, त्या रंगसंगतीला आणखी आकर्षक कसं बनवावं याचा मी विचार करायला लागते. आणि हळूहळू तो दागिना आकार घेऊ लागतो. माझ्या कल्पनांचा तो आकार असतो आणि ही देवाचीच कृपा आहे तो इतरांना आवडतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला समाधान मिऴतं.” प्रग्ना सांगत होत्या. 

दिवा फॅशन ज्वेलरीचे अल्बम पाहिले की प्रग्ना यांना आत्ताच्या फॅशनची किती जाण आहे हे कळतं. अगदी जुन्या जमान्यातल्या भरलेल्या दागिन्यांपासून मॉडलिंगसाठी लागणाऱ्या नाजूक दागिन्यापर्यंत सर्वकाही त्यांच्याकडे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या स्वत: ते बनवून घेतात आणि ते ही एस्क्लुसिव.

“माझ्याकडे एका सारखा दुसरा दागिना तुम्हाला पहायला मिळणार नाही. मी जे काही बनवते ते खास असतं. म्हणूनच त्याला बनवायला ही जास्त वेळ लागतो आणि त्याची किंमतही इतरांपेक्षा जास्त असते. मी माझं कुठलही डिजाईन रिपीट करत नाही. याचा अर्थ असा जो दागिना माझ्याकडून घेतलाय तो फक्त आणि फक्त तुमच्याकडेचं असेल. त्याची कॉपी नसेल म्हणजे तो आकर्षक दागिना फक्त एक्सुसिव्हली तुमच्यासाठी.” 

सध्या तरी दिवा फॅशन ज्वेलरी फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून विकली जात आहे.  स्वत:चं स्टोअर सुरु करण्याचा त्यांचा मनसुबा नाही. त्यांच्या मुलींनी अनेकदा त्यांना तसं करण्याचा सल्ला दिला. पण प्रग्ना सांगतात “मी याकडे व्यवसाय म्हणून पाहत नाही. सध्यातरी शोरुम सुरु करायचा विचार नाही. तसं न करता ही माझ्या ऑडर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. हीच माझ्यासाठी मोठी समाधानाची गोष्ट आहे. पुढचं पुढे बघू.”    

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

आत्मसंतुष्ट न होता, सतत नव्याचा ध्यास असलेल्या यशस्वी उद्योगिनीची कथा

सर्वसामान्यांपर्यंत कला पोहचवण्याकरता कलाकार, क्युरेटर आणि उद्योजिका सुरभी मोदींचे अथक प्रयत्न

आई झाल्यावर घेतला स्वतःतील उद्योजिकेची शोध, अशिनी यांच्या स्टार्टअपच्या जन्माची कहाणी !