गृहिणी जर रांगोळी बनवू शकतात तर 'ग्राफिक डिझायनिंग' देखील करु शकतात

0

भारतीय समाजात बहुतांश महिला लग्नानंतर घरच्या कामात इतक्या व्यस्त होतात की त्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यांचे जीवन थांबते. ज्या उद्दिष्टांपर्यंत त्या पोहोचू शकतात त्याबाबत त्या लग्नानंतर विचार देखील करू शकत नाहीत. अशा महिलांना पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे करणे, त्यांना साक्षर करण्याच्या मोहिमेचे नाव आहे “आओ साथ मां” (सोबत या). राजधानी दिल्लीत ही मोहीम चालवते “लक्ष्य जीवन जागृती” नावाची एक संस्था. तिचे संस्थापक आहेत राहूल गोस्वामी आणि सुमैया आफरिन. मागील पाच वर्षांपासून त्यांची संस्था गृहिणी महिलांच्या सबलीकरणाचे काम करत आहे. त्यामुळेच त्यांच्या या मोहिमेचा फायदा आतापर्यंत त्रेसष्ट हजार महिलांना झाला आहे.

सुमैया यांनी बीसीए आणि त्यानंतर सामाजिक क्षेत्रातील मास्टर्सची पदवी घेतली आहे. शिकत असतानाच त्यांची भेट “लक्ष्य जीवन जागृती”चे सहसंस्थापक राहूल गोस्वामी यांच्याशी झाली. ते आयआयएम अहमदाबादसाठी काही सामाजिक कामांसाठी संशोधन करत होते. संशोधना दरम्यान त्यांनी पाहिले की, अशा अनेक महिला होत्या ज्या निरक्षर होत्या आणि काही कामकाजही करत नव्हत्या. त्यामुळे त्या जीवनात पुढे जाऊ शकत नव्हत्या. त्यावेळी या उभयतांनी विचार केला की, समाजात अशा इतरही महिला आहेत ज्या निरक्षर आहेत आणि त्यांनाही वाईट स्थितीचा सामना करावा लागतो. हिच गोष्ट लक्षात ठेऊन सुमैय्या आणि राहूल यांनी सन२00९मध्ये “लक्ष्य जीवन जागृती” नावाची संस्था सुरू केली. त्यानंतर त्यांनी महिला सबलीकरणाचे काम सुरू केले.

आपल्या कामाची सुरुवात त्यांनी दिल्लीच्या करोलबाग भागातून एका सर्वेक्षणाव्दारे केली. हे जाणून घेण्यासाठी की त्यांच्या आसपास अशा किती महिला आहेत ज्यांना पुढे शिकायची इच्छा आहे किंवा आपल्या जीवनात घरकामाशिवाय आणखी काही करू इच्छितात. सुमैय्या यांनी ‘युवर स्टोरी’ला सांगितले की, “ आम्ही पाच हजार महिलांचे सर्वेक्षण केले तेव्हा माहिती झाले की ब-याच जणींना शिकायचे आहे आणि पुढे काही कामकाजही करायची इच्छा आहे. हे सर्वेक्षण २१ ते ५० वयोगटाच्या महिलांमध्ये करण्यात आले. त्यातून हेच पहायला मिळाले की सा-याच महिलांना त्यांची स्वप्ने साकारण्यासाठी जीवनात पुढे जाण्याची इच्छा होती.”

खरेतर घरकाम केल्याने अनेकजणींना आपला पूर्वी केलेला अभ्यासही लक्षात राहिला नव्हता आणि त्यांची पुन्हा शिकण्याची इच्छा होती. याशिवाय अनेकजणींना घरकामाशिवाय इतर कामकाज करण्याची इच्छा होती. सर्वेक्षणात माहिती झाले की काही महिलांना त्यासाठीच शिकायचे होते जेणेकरून त्यांना आपल्या मुलांना शिक्षित करता यावे. अनेक महिला अशाही होत्या ज्यांना संगणकाच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती.

आपल्या कार्याची सुरूवात त्यांनी साक्षरता वर्गाने केली. त्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते ते या महिलांना सेंटरमध्ये घेऊन येण्याचे. कारण घरच्या कामातून वेळ काढणे कोणत्याही महिलेसाठी अवघड बाब होती. त्यासाठी त्यांनी महिलांना यासाठी सूट दिली की त्या त्यांना शक्य असेल त्या वेळेत केंद्रात येऊ शकतात. त्यासाठी केंद्रात “ आओ साथ मां” नावाने एक क्लब स्थापन करण्यात आला. या कल्बमध्ये समाजाच्या सा-या जाती समुदायातील महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. जसे कुणी गृहिणी निरक्षर असेल तर तिला हिंदी, इंग्रजी आणि गणित यांचे मुलभूत शिक्षण दिले जाते. तर दुसरीकडे एखादी साक्षर महिला असेल तर तिला केवळ इंग्रजी नाही तर संगणकाचे प्रशिक्षण दिले जाते.

महिलांना येथे ग्राफिक डिझायनिंग आणि वेब डिझायनिंगचा अभ्यासक्रम शिकवला जातो. सुमैया सांगतात की, “ जर महिला रांगोळी काढू शकतात तर का नाही त्या ग्राफिक डिझाइन करु शकणार?”

हे केंद्र सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत चालते. येथे येणा-या महिलांना दररोज दीड तास केवळ प्रशिक्षणच नव्हेतर संगणकाचे ज्ञान आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी समुपदेशन देखील केले जाते. आज या केंद्रातील महिला केवळ बँकेत किंवा रुग्णालयातच काम करत नाहीत तर अनेक गृहिणी महिलांनी स्वत:चा संगणकाशी संबंधीत रोजगारही सुरू केला आहे. तर काही महिला इतरांना शिकवण्याचे काम करत आहेत. “लक्ष्य जीवन जागृती” संस्था केवळ महिलांची शिकण्याची भूक भागवत नसून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सक्षम बनवित आहे. त्यासाठी संस्था त्यांना केवळ नोकरी शोधण्यासाठीच नाहीतर स्वत:चा रोजगार करण्यासाठीही मदत करत आहे.

त्यांच्या या यशस्वी व्यावसायिक मॉडेलच्या आधारे सन२०१३मध्ये आयआयएम इंदोरमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी पहिले स्थान मिळवले आहे. त्यानतंर टाटा सामजिक संस्थेच्या निवडक वीस संस्थामध्ये त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळेच त्यांची निवड ग्लोबल गुड फंड, वॉशिंग्टनसाठी झाली आहे. जेथे जगभरातील चौदाशे संस्थातून बारा संस्थाची निवड करण्यात आली. आतापर्यत यांच्या या संस्थेच्या माध्यमातून त्रेसष्ट हजारपेक्षा जास्त महिलांचा फायदा झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या संस्थेत येणा-या महिला सा-या जाती समूहातील आहेत. महिलांना साक्षर करण्यासाठी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी येथे दररोज दीडशे महिला येतात. त्यांच्या चमूत सातजण आहेत जे ही संस्था चालवितात. सुमैय्या यांची आकांक्षा आहे की, महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना स्कूल ऑफ मदर सुरु करायचे आहे.

लेखक : हरिश बिस्ट

अनुवाद : किशोर आपटे.