कारागृहातील वेदनांनी घडविली त्यांच्यातील शेकडो अनाथांची माय, संदिप कौर यांच्या जीवनसंघर्षाची कहाणी!

कारागृहातील वेदनांनी घडविली त्यांच्यातील शेकडो अनाथांची माय, संदिप कौर यांच्या जीवनसंघर्षाची कहाणी!

Monday December 21, 2015,

6 min Read

आयुष्याचा एखादा क्षण असा असतो, जो जुने विचार, समज आणि जीवन जगण्याच्या पद्धती पूर्णत: बदलतो. त्या क्षणात ज्या संवेदना समोर येतात, त्या ख-या तर एक आशा बनतात आणि त्या आशेमुळे सुख आणि संतुष्टीची जाणीव होते. ही जाणीव नंतर अनेकांचे जीवन बदलण्यात मदत करते. असेच काहीसे झाले पंजाबच्या अमृतसरमध्ये राहणा-या संदीप कौर यांच्यासोबत.

image


संदीप कौर यांच्यावर फुटीरतावादी होण्याचा आरोप लागला, मात्र अनेक मुले त्यांना आई म्हणतात. त्यांच्यावर मुले चोरण्याचा आरोप झाला, मात्र आज त्यांनी शिक्षित केलेली काही मुले बीटेक, एलएलबी, एमबीए, एमसीए केलेले आहेत किंवा करत आहेत. पंजाबच्या अमृतसर मध्ये राहणा-या संदीप कौर महिला सबलीकरणाच्या जिवंत उदाहरण आहेत. गेल्या २५ वर्षापासून त्या अनाथ मुलं – मुलींचे आयुष्य सुधारत आहेत. अमृतसरच्या जवळ सुल्तानविंड मध्ये ‘भाई धर्मसिंह खालसा चँरीटेबल ट्रस्ट’मार्फत हे सर्व करणा-या संदीप यांच्या कुटुंबात आज देखील ९८ अनाथ मुली आहेत. ज्यांच्या खाण्यापिण्यापासून शाळा आणि महाविद्यालयात पाठविण्यापासून सर्व जबाबद-या त्या हसत हसत पार पाडत आहेत.

image


३१ वर्षापूर्वी अमृतसरच्या स्वर्णमंदिरमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारने अनेक लोकांच्या मनात खोलपर्यंत जखमा केल्या होत्या. याच लोकांमध्ये एक १२-१३ वर्षाची मुलगी देखील होती, तिचे नाव संदीप कौर होते. त्यांना या गोष्टीचा त्रास होता की, भारतीय सेनेने एका पवित्र धार्मिक स्थळावर या प्रकारचे ऑपरेशन का चालविले? त्यांच्या मनातील ही जखम अद्यापही ओलीच होती की, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ज्या प्रकारे दिल्लीत शिखांचा विरोध करण्यात आला, त्यामुळे त्यांना मनातून खूप निराश केले. अशातच त्यांच्या मनात बदल्याची भावना निर्माण झाली आणि त्या हा विचार करायला लागल्या की, ज्या लोकांनी आमच्यासोबत असे केले आहे, मग त्यांच्यासोबत देखील असेच केले तर.

image


याप्रकारे वर्ष १९८९ मध्ये जेव्हा, त्यांनी दहावीचे शिक्षण पूर्ण केले तेव्हा त्या बब्बरखालसाच्या एका संघटनेमध्ये दाखल झाल्या आणि स्वतःच्या इच्छेने संघटेनेचे एक सदस्य धर्मसिंह कश्तीवाल यांच्यासोबत विवाह केला. कारण संघटनेचे म्हणणे होते की, अविवाहित मुलीला संघटनेत सामिल करता येणार नाही. याचप्रकारे जवळपास साडे तीन वर्षांचे विवाहित आयुष्य घालविल्यानंतर, पोलिसांनी संदीप कौर यांना अटक करून कारागृहात टाकले. कारागृहात येऊन त्यांना सहा महिनेच झाले होते की, त्यांना बातमी मिळाली की, त्यांचे पति जालंधरमध्ये पोलिसांकडून झालेल्या गोळीबारामुळे मरण पावले आहेत. त्यांचे म्हणणे होते की, त्या दरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर खूप जबरदस्ती केली आणि दबाव देखील वाढविला की, त्यांनी मीडिया समोर हे कबूल करावे की, त्यांचा विवाह जबरदस्तीने झाला आहे. मात्र, संदीप कौर यांनी त्या कठीण परिस्थितीत देखील सत्याची साथ सोडली नाही, त्या आपल्या शब्दावर अटळ होत्या. त्यासाठी त्यांना अनेक प्रकारचे प्रलोभनदेखील देण्यात आले. जेव्हा संदीप कौर यांनी सत्याची साथ सोडली नाही, तेव्हा त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आहे. याप्रकारे त्यांना चार वर्षापर्यंत संगरुर कारागृहात रहावे लागले.

image


कारागृहात वर्ष १९९२ ते १९९६ दरम्यान राहताना संदीप कौर यांनी आपले उरलेले शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आणि संगरुर कारागृहात राहूनच शिक्षण सुरु ठेवले. याप्रकारे त्यांनी कारागृहात राहून केवळ १२वी पर्यंतचे शिक्षणच पूर्ण केले नाहीतर, कारागृहातच त्या बीए च्या पहिल्या वर्षात दाखल झाल्या. त्याच दरम्यान त्यांनी अजून एक निर्णय घेतला की, जेव्हा त्या कारागृहाबाहेर येतील तेव्हा त्या घरी जाणार नाहीत तर, अशा मुलांची देखरेख करतील, ज्यांचे आई-वडील पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडले आहेत किंवा ते अनाथ झाले आहेत. वर्ष १९९६मध्ये संगरुर कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्या आपल्या काही सहकारी महिलांसोबत पटियाला येथे आल्या. याप्रकारे त्या सात महिला पटियालामध्ये राहून अनाथ मुलांच्या मदतीच्या कार्यात गुंतल्या. त्यांच्या या कामात त्यांच्या वडिलांनी देखील त्यांची मदत केली.

पटियालात आल्यानंतर सर्वात पहिले त्यांनी अनाथ मुलांचा शोध घेतला आणि त्यांना स्वतः सोबत ठेवले. याप्रकारे त्यांच्याकडे आज १०० पेक्षा अधिक मुले आहेत. त्यानंतर त्यांनी त्या अनाथ मुलांच्या शिक्षणाची सोय केली. त्यासाठी संदीप कौर आणि त्यांच्या सहकारी मिळून लोकांना वर्गणी देखील मागायच्या. इतकेच नव्हे तर, कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्या एकप्रकारे अनाथ मुलांचे आयुष्य सावरत होत्या, तर दुसरीकडे स्वतःचे शिक्षण देखील पूर्ण करत होत्या. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत संदीप कौर सांगतात की, “मी पहाटे तीन वाजता उठल्यानंतर, पहिले स्वतः तयार होत होते, त्यांनतर मुलांना उठवायचे, त्यांना आंघोळ घालत असे आणि शाळेसाठी तयार देखील करायचे. त्यांनतर त्यांना शाळेत पाठविल्यानंतर माझ्याकडे इतका वेळ देखील शिल्लक नसायचा की, मी स्वतःसाठी नाश्ता करू, कारण मला वेळेत महाविद्यालयात पोहोचायचे असायचे.” एकीकडे त्या इतकी मोठी जबाबदारी पार पाडत होत्या, तर दुसरीकडे त्यांनी कधी कुणाकडूनही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. तेव्हा त्या महाविद्यालयात त्यांच्याबद्दल काहीच माहित नव्हते की, त्या कोण आहेत आणि काय करतात.

image


संदीप कौर यांनी अनाथ मुलांना मोठे करण्याच्या जबाबदारीला एखाद्या महत्वाकांक्षेप्रमाणेच घेतले. त्यामुळे त्या मुलांच्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे खूप लक्ष ठेवायच्या. त्या नियमित त्यांची नखे बघायच्या, त्यांचा घरचा अभ्यास बघायच्या, त्यांच्या शाळेत जायच्या. त्या सांगतात की, इतक्या मुलांना सांभाळणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हते. तेव्हा तर त्यांच्याकडे झोपण्यासाठी एक अंथरूण देखील नव्हते. कारण त्यांची अशी इच्छा होती की, कुठलीही सुविधा सर्वात पहिले अनाथ मुलांना मिळावी. तर दुसरीकडे त्यांच्याकडे राहणारी मुले देखील त्यांच्यावर खूप प्रेम करायची. इतके की, अनेकदा रात्री खूप सारी मुले त्यांच्या खोलीतच झोपी जायची. संदीप कौर यांचे म्हणणे होते की, “त्यावेळी मला आपले सर्व दु:ख विसरून जायला व्हायचे, जेव्हा मुले माझ्यासोबत माझ्या खोलीतच झोपायची आणि माझ्याकडे इतकीही जागा शिल्लक नसायची की, मी सरळ झोपू शकेन. हे असे काही क्षण होते, ज्यामुळे मला खूप शांत वाटायचे.”

संदीप यांचे म्हणणे आहे की, पटियालामध्ये जवळपास सात वर्षाच्या वास्तव्यादरम्यान, पोलिसांनी त्यांना तेथे देखील त्रास देणे सोडले नाही. तेथे देखील त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले. पोलिसांनी आरोप केला की, त्या मुलांना दहशतवादी बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत. त्याच्या उत्तरात त्या सर्वांना हेच सांगायच्या की, त्या मुलांना शिक्षित करत आहेत, त्यांचे भविष्य साकार करत आहेत, जेणेकरून हे देखील सामान्य लोकांप्रमाणे आपले आयुष्य व्यतीत करू शकतील. असे असूनही त्रासापासून वैतागून आणि मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी पटियाला सोडून अमृतसरला जाण्याचा निर्णय घेतला. याप्रकारे त्या वर्ष २००२ मध्ये अमृतसरला आल्या आणि जवळपास १०० पेक्षा अधिक मुलांना घेऊन दोन मजल्याच्या इमारतीत रहायला लागल्या. जेथे खालच्या मजल्यावर मुली रहायच्या, तर वरच्या मजल्यावर मुले राहायची. तर मुलांसाठी जेवण घराबाहेर एक तंबू बांधून बनविले जायचे. त्या व्यतिरिक्त संदीप कौर यांचे कुटुंबातील सदस्य देखील त्यांची मदत करायचे. असे असूनही संदीप कौर आणि त्यांच्या मुलांना येथे देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की, जर त्यांच्याकडे स्वतःची जागा असेल तर, त्यांच्या समस्या काही कमी होऊ शकतात. त्यांनतर त्यांनी अमृतसरच्या जवळच सुल्तानविंड मध्ये एक जागा घेतली आणि तेथे जाऊन आपल्या मुलांसोबत रहायला लागल्या आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणा-या संदीप कौर अभिमानाने सांगतात की, “माझ्या अनेक मुलांचे शिक्षण बीटेक, एलएलबी, एमबीए, एमसीए पर्यंत झाले आहे, एका मुलाची निवड मर्चंट नेवीमध्ये देखील झाली आहे. त्याव्यतिरिक्त माझी एक मुलगी सीए देखील करत आहे.”

१९९६ मध्ये सुरु झालेल्या ‘भाई धर्मसिंह खालसा चॅरीटेबल ट्रस्ट’ मार्फत संदीप कौर आज ९८ अनाथ मुलींची देखरेख आणि शिक्षणाची जबाबदारी पार पडत आहेत. त्याव्यतिरिक्त अनेक मुली अशा देखील आहेत, ज्या वसतिगृहात राहतात आणि त्यांचा खर्च उचलतात. इतकेच नव्हे तर, संदीप कौर यांची ही ट्रस्ट मुलांचे विवाह देखील करून देतात. हेच कारण आहे की, येथे मोठ्या झालेल्या मुली आज ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, इटली येथे आपल्या कुटुंबियांसोबत स्थायिक झाल्या आहेत. त्या सांगतात की, आज त्यांची अनेक मुले त्यांना भेटण्यासाठी येतात, ट्रस्टची मदत करतात. जे मोठ्या हुद्द्यावर आहेत. येथे राहणा-या मुली केवळ पंजाबच्याच नाहीत तर, हरियाणा आणि युपी च्या मुलांची देखील जबाबदारी संदीप कौर उचलत आहेत. त्या या अनाथ मुलांमध्ये चांगले संस्कार आणि जीवन जगण्याच्या शिस्तीला किती गंभीरतेने शिकवितात, त्याचा अंदाज या गोष्टीने देखील लावू शकतो की, त्यांच्याकडे असे अनेक आई-वडील येतात, ज्यांना आपल्या मुलांना संदीप कौर यांच्याकडे सोडायचे असते, त्यासाठी ते त्यांना पैसे देखील द्यायला तयार आहेत. कारण त्यांना त्यांच्या मुलांना काहीतरी बनवायचे आहे.

image


लेखक: हरिश बिश्त

अनुवाद: किशोर आपटे.