जन्मानंतर केलेल्या विष प्रयोगाच्या ‘कृती’ ने रोखले २९ बालविवाह

0

ज्या समाजाने तिला जन्माअगोदरच मारण्याचे फर्मान काढले तीच कृती आज आपल्या समाजातील अनिष्ट प्रथा – बालविवाह थांबविण्याचे प्रयत्न करीत आहे. जिला जन्मानंतर मारण्यासाठी विष दिले गेले, पण ती आज बालविवाहाची शिकार झालेल्या मुलांना आपले आयुष्य जगण्याची संधी देत आहे. राजस्थानच्या जोधपुर स्थित २८ वर्षीय कृती भारती ने बालविवाह मुक्त राजस्थानचा संकल्प सोडला आहे. ती देशातील पहिली महिला आहे, जिने सन २०१२ मध्ये बालविवाहाला कायदेशीर बंदी घालण्यात यश मिळविले. या यशाने तिचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये कोरले गेले, या शिवाय तिचा हा उपक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पाठ्यक्रमात पण सामील केला गेला आहे.


सन २०११ मध्ये बालविवाह रोखण्यासाठी व त्याला कायदेशीर बंदी घालण्याच्या मोहिमेसाठी सारथी ट्रस्टची स्थापना करणाऱ्या कृतीवर अनेकदा प्राणघातक हल्ले सुद्धा झाले परंतु तिचे मनोबल खचले नाही. त्यांची संस्था आजपर्यंत ८५० बालविवाह थोपवू शकली आहे. खरेतर बालविवाह थांबविण्याचे काम सरकारचे आहे परंतु अनेक स्वयंसेवी संस्था सुद्धा प्रयत्न करीत आहे पण बालविवाहाच्या विळख्यातून मुला – मुलींना बाहेर काढण्याचे काम फक्त ‘सारथी ट्रस्ट’ करीत आहे. ही संस्था मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्याबरोबरच बालविवाह थांबविण्याचे काम स्वतः करते. या शिवाय मुलांचे, पारिवारिक सदस्यांचे तसेच जातपंचायती चे समुपदेशन सुद्धा करते, तसेच ज्या मुलांना या सामाजिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असते अशा मुलांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कृती व तिची टीम उचलते. कृतीच्या मते "जर एखादा बालविवाह रोखला गेला तर समाज्याला ते मान्य नसते तेव्हा मुलांना त्यांचा सन्मान परत मिळवून देण्याचे काम मोठे जिकरीचे असते".


भारतीय कायद्यानुसार मुलगा आपल्या वयाच्या २४ वर्षापर्यंत व मुलगी २० वर्षापर्यंत आपला बालविवाह रद्द करू शकते. अशी मुले बालविवाहाच्या होणाऱ्या त्रासापासून स्वतःला वाचवू शकतात. बरेच लोक घटस्फोट व बालविवाहाचे रद्द होणे यातील फरक ओळखू शकत नाही. बालविवाह रद्द झाल्यानंतर विवाह झाल्या पासून केसचा निकाल लागेपर्यंत सदर विवाहाचे बंधन नसते. त्या मुलाला कुमार म्हणूनच संबोधले जाते. बाल विवाह रद्द करणे म्हणजे एक आव्हानच असते. बालविवाह थांबविण्यासाठी हे लोक प्रथम मुलांच्या परिवाराशी चर्चा करतात कारण मुलांच्या कुटुंबास समजावण्यात यश आले तरच मुलांची अडचण कमी होते. पंचांना समजावणे म्हणजे एक दिव्य असते कारण त्यांच्या जातीच्या इभ्रतीचा विषय असतो. या प्रकारच्या कामात फक्त धमक्याच नाही तर हल्ल्यांना पण सामोरे जावे लागते.

आम्हाला अनेक धमक्या मिळाल्या पण मुलांच्या भविष्यासाठी आम्ही त्यांना भीक घातली नाही. त्यांच्या मते दोन्ही उभयपक्ष्यांच्या सामोपचाराने बालविवाह लवकर थांबू शकतो आणि काम अधिक सोपे होते. कारण मी या वर्षी ३ दिवसात येथील सर्व बाल विवाह रद्द केले आहे.

एखाद्या मुलाच्या मदतीच्या याचनेसाठी त्यांना दोन आघाड्यांवर काम करावे लागते. एकीकडे बालविवाह रद्द करण्याच्या कायदेशीर लढाईची तयारी तर दुसरीकडे मुलाच्या पुनर्वसनाची. या साठी मुलांच्या मुलभूत गरजांकडे लक्ष द्यावे लागते. यात मुलांचे शिक्षण, वोकेशनल ट्रेनिंग व उपजीविका इ. चा समावेश असतो.

कृतीने एप्रिल २०१२ पासून आजपर्यंत २९ बालविवाह रद्द केले आहे. राज्यस्थान असे पहिले राज्य आहे की जिथे सर्वात जास्त बालविवाह रद्द झाले, आणि कृतीच्या प्रयत्नांना यशाचे फळ मिळाले. बालविवाह जनजागृतीसाठी सारथी ट्रस्ट आंगणवाडी, शाळा महाविद्यालय, व इतर सार्वजनिक ठिकाणी कँपचे आयोजन करतात. येथे फक्त माहितीच न देता बालविवाहाला बळी पडलेल्या मुलांचा पण शोध घेतला जातो. मुलांना बालविवाहापासून होणाऱ्या हानीची जाणीव करून दिली जाते. या साठी ट्रस्टने एक हेल्पलाईन सुद्धा सुरु केली आहे जेथे पिडीत मुले व इतरही लोक बालविवाह संबंधी तक्रारी नोंदवू शकतात. तसेच मिडिया द्वारे अनेक केसची माहिती मिळाल्यामुळे बालविवाह केलेल्या दुसऱ्या मुलांना सुद्धा आपला बालविवाह रद्द होण्याच्या आशा निर्माण होतात व ते मदतीसाठी आमच्याशी संपर्क साधतात.


कृती जरी एवढे चांगले काम करत असली तरी तिचे बालपण फार वाईट गेले. तिचे वडील डॉक्टर होते परंतु त्यांनी तिच्या जन्माअगोदरच तिच्या आईला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे नातेवाईकांनी कृतीला जन्म न देण्याविषयी व दुसरे लग्न करण्यासाठी सल्ला दिला. जन्मानंतर पण दुर्दैवाने पाठ सोडली नाही, तिला विष सुद्धा देण्यात आले. आज तिने ‘बालसंरक्षण व सुरक्षा’ या विषयात पीएचडी केली आहे. या कामाच्या यशाने तिला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळाले. सध्याच तिला लंडन सरकारने व थॉमस रॉयटर्स फाउंडेशनने मिळून फेलोशीप दिली आहे. आज कृतीची अशी एक इच्छा आहे की, "बालविवाहाचा समूळ नाश झाला पाहिजे व ही प्रथा फक्त इतिहासाच्या रूपाने पुस्तकांमध्येच सापडली पाहिजे की, " पूर्वी अशीही पण एक प्रथा होती ’’.

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे