कंपन्यांनी इंटर्नशीप नाकारल्याने नावारुपास आलेले ‘ढिन्चॅक’ स्टार्टअप

कंपन्यांनी इंटर्नशीप नाकारल्याने नावारुपास आलेले ‘ढिन्चॅक’ स्टार्टअप

Wednesday February 10, 2016,

6 min Read

समाजातील प्रत्येक वर्गाच्या काही समस्या अशा असतात ज्या त्या त्या वर्गासाठी मोठ्या असतात. या समस्यांचे गांभीर्य इतरांच्या लक्षात येत नाही. मात्र त्यांचे परिणाम संबंधित व्यक्ति भोगत असतात. स्वतःची खास ओळख प्राप्त नसलेल्या शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचीही एक अशीच व्यथा आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेपेक्षा, त्यांच्यातील कौशल्यांपेक्षा ते कुठल्या संस्थेचे आहेत हे पाहून काम देणाऱ्या दुनियेत या विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करायला संधी मिळणेच कठीण झाले आहे. एका साधारण कॉलेजमधून बीएमएम झालेला संकेत भट आणि त्याच्या मित्रांचीही हीच व्यथा होती. त्यांना इन्टर्नशिपसाठी प्रवेश द्यायला कुठलीही कंपनी तयार होईना. मात्र या परिस्थितीला संकेतने सडेतोड उत्तर दिले आणि त्याचेच फलित म्हणून आज मुंबईमध्ये ‘ढिन्चॅक मीडिया एलएलपी’ नावारुपाला येत आहे.


image


संकेतचे पूर्ण कुटुंब कॅटरिंग बिझनेसमध्ये असल्यामुळे त्याच्या मनातही व्यवसायाचे बीज लहानपणीच रुजले गेले होते. यातूनच त्याने बीएमएम करण्यापूर्वीच वयाच्या १६ व्या वर्षी ‘मोक्ष वर्ट्स’ ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरु केली होती. पदवी अभ्यासक्रमानंतर इन्टर्नशिपसाठी वारंवार मिळालेला नकार त्याला अस्वस्थ करुन गेला. मात्र त्याने हार मानली नाही. इतर कंपन्यांमध्ये जाऊन हात पसरण्यापेक्षा आणि केवळ नावाजलेल्या कॉलेजचे लेबल नसल्यामुळे नकार मिळविण्यापेक्षा ‘मोक्ष वर्ट्स’लाच मीडिया आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या रुपात मोठे करायचे त्याने ठरविले. मात्र मोठमोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या पुढे टिकाव धरण्यासाठी हा व्यवसाय हटके पद्धतीने करणे गरजेचे आहे हे संकेत आणि टीमच्या लक्षात आले आणि यामधूनच २०११ साली ‘ढिन्चॅक मुंबई डॉट कॉम’ या ऑनलाईन मीडिया वेबसाईटची सुरुवात झाली.

मीडिया आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात आपले नाव निर्माण करण्यासाठी संकेत आणि टीमने सुरुवातीला मुंबईतील महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित करायचे ठरविले. “कॉलेजचे फेस्टीव्हल्स ही मुंबईतील कॉलेजेसची खास ओळख असते. अशा पद्धतीचे कॉलेजमध्ये होणारे सर्व इव्हेंट मॅनेज करायचे आणि ‘ढिन्चॅक मुंबई डॉट कॉम’च्या माध्यमातून त्यांना ऑनलाईन प्रेझेंस मिळवून द्यायचा असं आम्ही ठरवलं,” असं संकेत सांगतो.

image


घडाळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई जितकी व्यस्त आहे तितकीच ती कूलही आहे आणि मुंबईतील याच कूलनेसचे अपडेट्स पुरविणारी ही वेबसाईट असल्याने तीचे नावही बम्बईया स्टाईलने ठेवण्यात आले आहे. “ही वेबसाईट मुंबईकरांना आपलीशी वाटावी याची आम्ही पूर्ण काळजी घेतली आहे. म्हणूनच यावरचा कन्टेन्ट मुंबईकरांना भावेल अशा भाषेत मांडण्यात आला आहे,” असं संकेत सांगतो. ‘ढिन्चॅक मुंबई डॉट कॉम’ आता कॉलेजमधील इव्हेंटबरोबरच मुंबईत घडणाऱ्या इतर मनोरंजनात्मक घडामोडींची माहिती उपलब्ध होण्याचे एकमेव ऑनलाईन पोर्टल ठरले आहे.

या ऑनलाईन पोर्टलमुळे संकेतचे महाविद्यालयांमधील लोकांशी चांगले सूर जुळायला लागले. याचाच फायदा घेत संकेत आणि टीमने पुढच्या दोन वर्षात ‘ढिन्चॅक कम्युनिकेशन’ हा आणखी एक प्रोजेक्ट सुरु केला. “‘ढिन्चॅक’ कम्युनिकेशन ही एक प्रमोशनल एजन्सी आहे. युवा किंवा विद्यार्थ्यांशी संबंधित उत्पादने निर्माण करणाऱ्या अनेक कंपन्यांना कॉलेजेसमध्ये आपलं प्रमोशन करायचं असतं. मात्र त्यासाठीच्या परवानग्या काढणं त्यांच्यासाठी काहीसं अवघड आणि मेहनतीचंही असतं. कॉलेजबरोबर चांगले संबंध प्रस्थापित झाल्यामुळे त्यांच्या तुलनेत आम्ही हे काम सहजरित्या करु शकतो. अशा रितीने कंपनी आणि कॉलेजमधील दुवा बनून आम्ही कंपनीच्या प्रोडक्टचं प्रमोशन करतो. त्याचबरोबर कॉलेज फेस्टीव्हलचं प्रमोशन आणि इतर प्रमोशनल ऍक्टिव्हिजही ‘ढिन्चॅक कम्युनिकेशन’ मार्फत केल्या जातात,” असं संकेत सांगतो.

इव्हेन्ट मॅनेजमेन्ट, ऑनलाईन मीडिया वेबसाईट आणि प्रमोशनल ऍक्टीव्हिटीज यावरच संकेत शांत बसला नाही. त्याने थोड्याच दिवसात ‘ढिन्चॅक लाईव्ह’च्या माध्यमातून आपल्या क्लायंट्सना आणखी एक सुविधा उपलब्ध करुन दिली. “आतापर्यंत आम्ही केवळ इव्हेंट मॅनेज करत होतो. त्याचं प्रमोशन करत होतो, त्याला ऑनलाईन प्रझेन्स मिळवून देत होतो. आता आम्ही हे प्रोग्रॅम लाईव्ह दाखवायला सुरुवात केली. ऍपच्या माध्यमातून हे प्रोग्रॅम कुणीही मोबाईल किंवा टॅबवर लाईव्ह पाहू शकतो.”


image


मुंबईमध्ये शेकडो छोट्या-मोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या असताना नवनवीन क्लृप्त्या लढवून नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट राबवून संकेत आणि टीमने अल्पावधीत या क्षेत्रात आपला जम बसवला आहे. २०१५ मध्ये आपले सगळे प्रोजेक्ट्स ‘ढिन्चॅक मीडिया एलएलपी’ या कंपनीच्या अंतर्गत चालवायला संकेतने सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसात ‘ढिन्चॅकवाले’ या नव्या प्रोजेक्टचाही यात समावेश होणार आहे.

‘ढिन्चॅकवाले’ बद्दल संकेत सांगतो, “विशेष करुन अगदी छोट्या स्तरावरचे इव्हेंट मॅनेज करण्यासाठीही उपयोगी ठरेल असे हे एक मोबाईल ऍप आहे. एखादा इव्हेंट मॅनेज करण्यासाठीच्या सर्व गरजा पूर्ण करणारे हे वन स्टॉप सोल्यूशन असणार आहे. सर्वसामान्य लोकांना नजरेसमोर ठेऊन ही संकल्पना आम्ही राबवत आहोत. छोटीशी बर्थडे पार्टी, लग्नकार्य किंवा कॉर्पोरेट पार्टी आयोजित करण्यासाठी मोठ्या मोठ्या इव्हेंट कंपन्यांना मॅनेजमेंटचं काम सोपवणं शक्य नसतं आणि त्याकरिता मोजावी लागणारी किंमतही अनेकांना परवडणारीही नसते. म्हणूनच सर्वांना परवडेल अशा किंमतीत दर्जेदार काम करुन देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि विक्रेत्यांची यादी आम्ही या ऍपवर उपलब्ध करुन देणार आहोत. मग लाईट, साऊंड पासून टॅटू मेकर पर्यंत सगळे इथे उपलब्ध असतील. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही बुक करु शकता,” असं संकेत सांगतो.

तो पुढे सांगतो, “अशा प्रकारचं हे एकमेव ऍप असेल. सर्व प्रकारच्या वेंडर्सचे संपर्क क्रमांक उपलब्ध असलेल्या ऍग्रीगेटिव्ह वेबसाईट्स उपलब्ध आहेत. मात्र या ऍग्रीगेटिव्ह वेबसाईट्स आणि ‘ढिंचॅकवाले’ यामध्ये खूप फरक आहे. या वेबसाईट्सने फक्त वेंडरची माहिती उपलब्ध करुन दिलेली असते. त्या वेंडरने पुरविलेल्या सेवेच्या दर्जाची जबाबदारी ती वेबसाईट घेत नाही. मात्र ‘ढिंचॅकवाले’ने पुरविलेल्या वेंडरच्या कामाची जबाबदारी ‘ढिंचॅकवाले’ची असणार आहे आणि आमच्या ऍपवर उपलब्ध कॉन्ट्रॅक्टर्स आणि वेंडर्सकडून उत्तम दर्जाची सेवा पुरविली जाईल याची आम्हाला खात्री आहे. म्हणूनच मार्केट ट्रेण्डच्या विरुद्ध जाऊन आम्ही १०० टक्के आगाऊ रक्कम घेण्याचे ठरविले आहे. जिथे १०० टक्के चांगल्या दर्जाचं काम करुन मिळत असेल तिथे कोणताही ग्राहक १०० टक्के आगाऊ रक्कम द्यायला हसत हसत तयार होईल असं आम्हाला वाटतं.”

image


संकेत पुढे सांगतो, “या ऍपमुळे दोन चांगल्या गोष्टी घडतील. ग्राहकांना अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागणार नाही. त्यांना वाजवी दरात चांगली सेवा एका क्लिकवर उपलब्ध होईल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इव्हेट मॅनेजमेंटसाठी आवश्यक गोष्टींचा पुरवठा करणारे अनेक छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर्स आणि वेंडर्स आहेत. मात्र त्यांची सेवा चांगली असूनही त्यांना म्हणावं तसं काम मिळत नाही. त्यांनाही काम मिळेल. त्याचप्रमाणे ढिन्चॅकवालेच्या माध्यमातून आम्ही आणखी एक चांगली गोष्ट करु पाहतोय आणि ती म्हणजे या क्षेत्राचे प्रमाणीकरण. फिल्म इण्डस्ट्रीप्रमाणेच इव्हेंट इण्डस्ट्रीही आजच्या घडीची सगळ्यात जास्त कर भरणारी इण्डस्ट्री आहे. मात्र तरीही दुर्लक्षित आहे. या इण्डस्ट्रीचे आजवर प्रमाणीकरण झालेले नाही. ढिंचॅकवालेच्या माध्यमातून आम्ही ते करणार आहोत. यावर ग्राहकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांचे दर प्रमाणित असतील. ज्यामुळे ग्राहकांची लूट होणार नाही आणि व्यवसायात पारदर्शकता राहिल.”

संकेतच्या या प्रवासात त्याला त्याच्या सहकारी मित्रांची खूप साथ लाभली. त्यांच्या सहकार्यामुळेच हा व्यवसाय सुरु असतानाच संकेतने फ्रान्समधील ‘केड्ज बिझनेस स्कूल’मधून ‘इव्हेंट ऍण्ड स्पोर्ट्स’ या विषयात मास्टर्सही पूर्ण केले. “मास्टर्ससाठी फ्रान्समध्ये असताना इथे कंपनीची संपूर्ण जबाबदारी कंपनीचे इतर दोन डायरेक्टर्स रोहित निगोट आणि जिसेल मेण्डीस यांनी यशस्वीरित्या सांभाळली. टीममधील इतर सहकाऱ्यांनीही त्यांना चांगली साथ दिली. ते दीड वर्ष मी केवळ स्काईपवरुन या सर्वांच्या संपर्कात असायचो,” असं संकेत सांगतो.

कंपनीच्या वार्षिक उलाढालीमध्ये दरवर्षी ६० ते ७० टक्क्यांची वाढ होत असल्याचे संकेत सांगतो. आतापर्यंत केवळ मुंबईपुरती मर्यादित असणारी ही कंपनी येत्या तीन महिन्यात ठाणे आणि नवी मुंबईमध्येही आपल्या व्यवसायाचा विस्तार करणार आहे. त्याचबरोबर दिल्ली आणि बंगळूरुमध्येही काम सुरु करणार असल्याचं संकेत सांगतो.

बीएमएम झाल्यानंतर कंपन्यांनी इन्टर्नशिप नाकारल्यामुळे सुरु झालेल्या या स्टार्टअपने इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याबरोबरच अपरिचित संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना इण्टर्नशीपची संधीही उपलब्ध करुन दिली आहे. “आजपर्यंत जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी आमच्याकडे इन्टर्नशिप पूर्ण केली आणि आज ते विविध चांगल्या चांगल्या न्यूज चॅनेल, प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करत आहेत,” असं संकेत अभिमानाने सांगतो.

यासारख्या काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

नवीन उद्योजकांसाठी मराठीतून व्हिडीओ ब्लॉग, पुण्याच्या अविनाश जोशी यांचा अभिनव प्रयोग

भारतातल्या बटाटा सम्राटांनी सीरीज-बी फंडींगमधून मिळवलेत २५ कोटी रुपये!

कोकणातील जांभूळपोळीला परदेशवारी घडविणाऱ्या छाया भिडे

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा.