बाळाच्या वापरलेल्या जुन्या वस्तू खरेदी -विक्रीसाठी ‘प्रीकेअर्ड’

0

जे आपल्या व्यक्तीगत समस्येवरचा उपाय शोधण्यासाठी प्रेरित होतात आणि काही तरी नवे करण्याविषयी विचार करतात अशा उद्योजकांमध्ये तबरेज खान यांचा समावेश होतो. आपल्या बाळाच्या वापरलेल्या जुन्या वस्तू विकण्यासाठी तबरेज खान यांनी ‘प्रीकेअर्ड’ची सुरूवात केली होती. पण भारतात अशा प्रकारचे कोणतेही व्यासपीठ नव्हते. ही त्यांच्यासाठी मोठी निराशेची गोष्ट होती. अशा परिस्थितीत त्यांच्या समोर केवळ एकच पर्याय होता. आणि तो म्हणजे एक तर ते सामान भंगारात विकणे किंवा मग आपल्या घरातील स्टोअरमध्ये धूळखात पडण्यासाठी ठेवून देणे.

या वस्तू विकण्याबाबत ते बराच विचार करत होते. अशा प्रकारे वापर केलेले सामान विकण्यासाठी काही ना काही जागा नक्कीच असणार असे त्यांना सतत वाटत होते. खूप विचार केल्यानंतर तरबेज खान यांनी २०११ मध्ये ‘प्रीकेअर्ड’ची सुरूवात केली. तबरेज खान यांनी घेतलेल्या या पुढाकारावर युवरस्टोरी लक्ष ठेवूनच होती. परंतु कालांतराने हा विषय दृष्टीआड झाला. काही आठवड्यांपूर्वी तबरेज खान यांनी आम्हाला फोन केला आणि सांगितले की, त्यांच्याकडे सांगण्यासारख्या खूपच मनोरंजक अशा गोष्टी आहेत.

‘प्रीकेअर्ड’ लाँच केल्यानंतर तबरेज खान धीम्या गतीने का होईना, पण सतत पुढे जात राहिले आहेत. तरबेज खान यांनी सांगितले, “ मी गोळा केलेल्या वस्तूंची संख्या चांगली आहे. ‘प्रीकेअर्ड’ या व्यासपीठावर चांगल्या संख्येने ग्राहकांनी वस्तू गोळा केली आहेत.” ‘प्रीकेयर्ड’ने नोव्हेंबर, २०११ मध्ये ‘मायफर्स्टचेक’च्या माध्यमातून पहिल्यांदा फंड सुद्धा गोळा केला आहे. जुलै, २०१२ पर्यंत ‘प्रीकेयर्ड’ सुमारे ४ लाखांची यादी तयार करण्यात यशस्वी झाली. परंतु, जुलै, २०१२ मध्ये मुंबईत आलेल्या महापुराने गोदामात ठेवलेले सर्व सामान वाया गेले.

ही घटना म्हणजे तरबेज खान आणि प्रीकेयर्डसाठी मोठा धक्का होती. ही यादी तयार करण्यासाठी तरबेज खान यांना एक वर्षाचा कालावधी खर्च करावा लागला होता. परंतु पाऊस आणि महापुराने या साऱ्यावर पाणी फेरले.

‘प्रीकेअर्ड’वर लहान मुलांनी वापर केलेल्या वस्तू (उत्पादने) विकल्या जातात. सर्वप्रथम ही उत्पादने साफ करून सॅनीटाईझ केली जातात. त्यानंतर त्यांच्या स्थिती नुसार त्यांची वर्गवारी केली जाते. ‘प्रीकेअर्ड’वर मुलांची खेळणी, आंघोळीचे सामान, कारची सीट, प्रॅम्स, क्रॅडल्स सारखी उत्पादने ऑफरमध्ये उपलब्ध आहेत.

सुरूवातीला ‘प्रीकेअर्ड’ आई-वडिलांकडून त्यांच्याकडे असलेली सर्व उत्पादने विकत घेत असे, मात्र महापुरात झालेल्या नुकसानानंतर तबरेज खान यांनी आपल्या धोरणात बदल केले. जानेवारी, २०१४ नंतर तबरेज खान यांनी आई-वडिलांकडून सर्वच्या सर्व सामान विकत न घेता ते काही प्रमाणात घेणे सुरू केले. या अंतर्गत ते वस्तूंच्या किंमतीच्या ५ टक्के भागाची रक्कम चुकती करत असत, तर उर्वरीत रक्कम उत्पादनाच्या विक्रीनंतर देत असत. ‘प्रीकेअर्ड’ आजही एका व्यक्तीचे संघटन असून अधिकांश काम हे बाहेरील स्त्रोतांकडून केले जाते. तबरेज खान स्वत: सर्व उत्पादनांचे पीक-अप पाहतात. या कामात त्यांना आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांची देखील मदत मिळते.

सामानाची तपासणी, ग्रेडींग आणि पॅकेजींगच्या कामासाठी एक वेगळी टीम कार्यरत आहे, तर याच्या लॉजिस्टीकचे काम पाहण्यासाठी सुद्धा एक वेगळी टीम आहे. ‘प्रीकेअर्ड’वर विकण्यात आलेले सामान जर परत करायचे असेल, तर ते १५ दिवसांच्या आत परत करावे असा नियम आहे. परंतु तबरेज खान सांगतात, की विकलेले सामान परत घेण्याचे फारच कमी प्रसंग आलेले आहेत. तरबेज सांगतात, “ जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा मला स्टार्टअप, उद्योजकता अशा गोष्टींविषयी काही एक माहिती नव्हती. माझ्या साठी केवळ ती एक मला अतिशय प्रभावित करणारी संकल्पना होती. ही संकल्पना बाजारात लागू करून काय परिणाम होतो हे मला पहायचे होते. या व्यवसायाची सुरूवात केल्यानंतर मला कितीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या.”

विकल्या गेलेल्या उत्पादनांची( वस्तूंची) सुरक्षितता ही ‘प्रीकेअर्ड’ची प्राथमिकता राहिली आहे. पुढचा धडा हा लोकांना चांगला प्रस्ताव देण्याचा आहे. ग्राहकांना उत्पादनांमध्ये विविधता हवी असते. ग्राहक हे थोडी थोडकी नव्हे तर भरपूर उत्पादनांची अपेक्षा करत असतात. हे एक मोठे आव्हान राहिलेले आहे. कारण साईटवर ग्राहकांनी आपल्या लिस्टमध्ये कोणकोणती उत्पादने समाविष्ट केली आहेत या गोष्टींवर उत्पादनांची विविधता अवलंबून असते. आणि अशा प्रकारे विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी ग्राहकांना ऑनलाईन लिस्ट करावी लागते. या आव्हानाला पार करण्याचा एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी साईटला भेट द्यावी आणि आपल्या उत्पादनाला ऑनलाईन लिस्ट करावे. हळूहळू ही गोष्ट पसरू लागली जास्तीत जास्त लोक साईटवर येऊ लागले. ग्राहकांच्या निवडीसाठी आज ‘प्रीकेअर्ड’वर ३०० हून अधिक उत्पादने आहेत ही सध्याची स्थिती आहे.

तबरेज खान सांगतात, “ साईटवर मोठ्या संख्येने भेटी देऊन लोकांनी आपली रूची दाखवलेली आहे. मुंबईत आलेल्या महापुरात माझे सर्व सामान वाहून गेल्यानंतर हे काम बंद करावे असा मी विचार करत होतो. परंतु मला ग्राहकांचे सतत फोन येत राहिल्यामुळेच केवळ मी हे काम सुरू ठेवले. त्यावेळी माहिती घेण्यासाठी मला दररोज सरासरी दहा फोन येतच होते.” तबरेज खान ‘प्रीकेअर्ड’च्या प्रचारासाठी ‘गूगल अडवर्ड’चा सुद्धा उपयोग करतात.

‘प्रीकेअर्ड’साठी नेहमीच मुंबई हे शहर प्रमुख बाजार राहिलेला आहे. शहरांच्या यादीत बंगळुरूचा क्रमांक दुसरा आहे. तबरेज खान म्हणतात, “अधिकतर मागणी ही ‘न्यूक्लिअर फॅमिली’ अर्थात छोट्या कुटुंबाकडून येते. अशा प्रकारच्या उत्पादनांचा वापर करणारे नव्या पिढीचे आई-वडिल सुद्धा या उत्पादनांची मागणी करतात. अशा प्रकारच्या उत्पादनांची मागणी करणारे हे आई-वडिल कदाचित पहिल्या पिढीचे आई-वडिल आहेत.” साईटवर सरासरी ३५०० रूपयांची खरेदी होते. ज्यांनी यापूर्वी प्रीकेअर्डवर खरेदी केलेली आहे अशा साईटवर येणा-या ग्राहकांची संख्या २८ टक्के इतकी आहे.

‘प्रीकेअर्ड’वर विकल्या जाणा-या उत्पादनांची किंमत ही त्या उत्पादनांच्या मूळ किंमतीच्या निम्मी असते. तबरेज खान यांच्या म्हणण्यानुसार तर या साईटवर येणा-या अधिकतर वस्तू या काही महिन्यांपूर्वीच खरेदी केलेल्या असतात. याचा अर्थ अर्ध्या किंमतीत मिळणा-या अधिकांश वस्तू या फार जुन्या नसतात. ‘प्रीकेअर्ड’ जी कल्पना घेऊन पुढे आली, ती कल्पना भारतातील लोकांसाठी अगदी नवी गोष्ट आहे. परंतु भारतीय लोकांमध्ये वस्तू रिसायकल करण्याची सवय मात्र जुनीच आहे. लहानपणी आपल्याला आपल्या मोठा भाऊ किंवा बहिणीची खेळणी खेळण्यासाठी दिली जायची हे आपणा सर्वाना आठवत असेल. हे रिसायकलचेच एक उदाहरण म्हणता येईल.

आंतरराष्ट्रीय स्तरावर हे काम खूपच लोकप्रिय असून ते फार पूर्वीपासून सुरू आहे. भारतीय लोकांच्या तुलनेत विदेशात लोक ‘बेबी केअर प्रोडक्ट’चा वापर फार पूर्वीपासून करत आले आहेत हे ही याचे कारण आहे. तबरेज खान यांच्या म्हणण्यानुसार भारतात या बाजारात सुमारे ४००० ते ६००० कोटी रूपये इतकी उलाढाल होते. या क्षेत्रात प्रथम असल्या कारणाने प्रीकेअर्डला त्याचा फायदा मिळेल हे नक्की.

आपले मागचे सर्व दिवस विसरून तबरेज खान यांनी या व्यवसायाला आणखी पुढे घेऊन जाण्याची योजना आखली आहे. भारतात ज्या प्रकारे ‘बेबी केअर मार्केट’ जलद गतीने विकास करत आहे हे पाहता तबरेज खान यांनाच त्याचा फायदा मिळेल हे नक्की.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe