भारतीय गिर्यारोहण क्षेत्राचा चेहरा बदलण्याचा दिलशाद मास्टर कुमार यांचा निर्धार

0

वयाच्या ४९ व्या वर्षी कॅन्सरशी लढा देणाऱ्या दिलशाद मास्टर कुमार यांनी यापुढे दुसऱ्यासाठी कष्ट करण्यापेक्षा स्वत:साठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. आपल्यानंतर चार वर्षांच्या मुलीला त्याचा फायदा होईल अशी त्यांची भावना होती.

दिलशाद यांनी टीव्ही क्षेत्रात २२ वर्ष काम केलंय. त्यांनी स्टार मूव्हीजची भागीदारी असलेल्या झी सिनेमाची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्टारसोबत काम करत एनजीसी आणि हीस्ट्री चॅनेलचं हिंदी भाषिक चॅनेल सुरू केलं. टीमची उभारणी करणं आणि कामं सुरळीत करणं याची दिलशाद यांना आवड आहे. “ आता या क्षेत्रात भरपूर काम झालं असं वाटल्यानं मी रॉनी स्क्रूवाला यांच्यासोबत १८ महिने काम केलं,” असं दिलशाद सांगतात. त्यांनी यूटीव्हीसाठी दोन चॅनेलची निर्मिती केली. दीर्घकाळ काम केल्यानं अनेक नवीन गोष्टी शिकता आल्या असं त्या सांगतात. एखाद्या कंपनीच्या मालकासोबत काम करण्याचा अनुभव हा एखाद्या कंपनीच्या सीईओसोबत काम करण्यापेक्षा अधिक वेगळा असतो. त्यामुळे रॉनी स्क्रूवाला यांच्याकडून उद्योजक कसा असावा याबाबत खूप काही शिकता आलं असंही त्या सांगतात.

*जेव्हा तुम्ही वाटाघाटी करत असता तेव्हा तुमचा इगो त्या खोलीच्या बाहेर ठेवा.

*तुम्ही काम करत असलेल्या गोष्टींबद्दल जास्त भावनिक होऊ नका...त्याची निर्मिती करा आणि मग ते सोडून द्या.

*तुम्ही उभारत असलेल्या कोणत्याही उद्योगात भावनिकदृष्ट्या गुंतू नका. तो उद्योग उभारा आणि सोडून द्या.

*तुमच्या आर्थिक सल्लागारापेक्षा तुमची आर्थिक स्थिती तुम्हीच जास्त चांगली जाणून घ्या.

याच तत्वांमुळे दिलशाद यांनी स्वत: चं काही निर्माण करण्याच्या दृष्टीनं पुढचं पाऊल टाकलं. त्यांनी२००८ मध्ये स्वत:ची आयकृती न्यू मिडीया ही सोशल मिडीया कंपनी स्थापन केली. सोशल मिडीया आणि टीव्ही अर्थात् दूरचित्रवाणी यांच्यामध्ये खूप मोठी पोकळी असल्याचं त्यांना जाणवलं. त्यावेळेस टीव्ही चॅनेल्सना डिजीटल मिडीयाबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे मी एनजीसी, चॅनेल व्ही आणि स्टारच्या डिजीटल मिडीयाच्या कँपेनसाठी काम केलं. ही मोहीम सुरु असेपर्यंत मला खरोखरच ते काम करताना खूप मजा आली. प्रत्येकाला आपल्या मोहिमेचा प्रसार करायचा होता. पण मोहिमेचा प्रसार करणं ही बाजारपेठेची रणनीती असते, हे कोणीही समजून घ्यायला तयार नव्हतं, असं दिलशाद सांगतात. साधारण त्याचवेळेस मी माझे मित्र सोम पॉल आणि सचिन बन्सल यांच्यासोबत एडव्हेंचर ट्रॅव्हल ऑपरेटर्ससाठी नवा व्यवसाय खुला करून दिला.


हे अत्यंत असंघटीत क्षेत्र असल्याचं आमच्या लक्षात आलं. सुमारे सात वर्षांपूर्वी या क्षेत्रात जवळपास १० हजारपेक्षाही जास्त ट्रॅव्हल व्यावसायिक होते. त्यांच्याकडे त्यांची स्वत:च्या वेबसाईट्स, प्रवासाबद्दलची माहितीपत्रकं, सहली होत्या. त्यांना त्यांची ही सगळी माहिती आमच्या वेबसाईटवर टाका असं सांगणं हे अत्यंत अवघड आणि खरंतर अशक्य असं काम होतं. या सगळ्यांकडून ही सगळी माहिती गोळा करून ती आमच्या वेबसाईटवर टाकण्यासाठी काही मुलं ठेवण्याचाही आम्ही विचार केला. पण हे क्षेत्र खूप अस्थिर आहे. एखाद्या ठिकाणची ढगफुटी किंवा एखाद्या ठिकाणी आलेला पूर यामुळे संपूर्ण व्यवसाय एका रात्रीत कोलमडून जातो.त्यामुळेच एखादा धाडसी ट्रॅव्हल समूह स्थापन करणं हा अजिबात शहाणपणाचा निर्णय नव्हता, असं दिलशाद सांगतात. आम्ही आमच्या गुंतवणुकदारांसोबत सतत चर्चा केल्या. तुम्ही या सगळ्यांत कसं तग धरणार हाच प्रश्न दरवेळेस आम्हाला विचारला जायचा. वेबसाईटवर माहिती टाकण्यासाठी पैसे खर्च करून माणसं नेमणं हा एकदम तोट्याचा सौदा होता. आम्हाला काहीतरी ठोस व्यावसायिक निर्ण घ्यावाच लागणार होता. त्यामुळे आम्ही तो सगळा प्रकल्प गुंडाळला आणि www.fairinto.com चं रुपांतर एका प्रवासाविषयक सर्व माहिती उपलब्ध असेल अशा मासिकात केलं.

त्याचवेळेस दिलशाद यांचे पती अक्षय हे मर्क्युरी हिमालयन एक्पेडिशन्स ही कंपनी चालवत होते आणि त्यांना त्यांची कामं सुरळीत करण्यासाठी कोणाची तरी गरज होती. दिलशाद यांना या गोष्टीचा चांगला अनुभव असल्याचा खूप फायदा झाला. कर्करोगावरचे उपचार घेत असताना त्यांना स्वत:चं काहीतरी सुरु करण्याची अत्यंत तीव्र इच्छा होती. त्यांना त्यांच्या मुलीसाठी काहीतरी वारसा सोडायचा होता आणि त्यांच्या कामाचे तास कमी करून कुटुंबीयांसाठी वेळ द्यायचा होता.


हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी धाडसी ट्रॅव्हल व्यवसायात खोलवर शिरायचं ठरवलं आणि एमएचइचा इतरांपेक्षा कसा फायदा होईल यादृष्टीनं काम करायला सुरुवात केली. ट्रॅव्हल व्यवसाय समजून घेत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे २०१३ मध्ये स्थानिक पर्यटकांची संख्या १,००० दशलक्षपेक्षा जास्त होती आणि ही संख्या वाढतच होती. जरी मी यांच्यापैकी ५ टक्के लोकांसाठी काम केलं तरी तेही खूप महत्त्वाचं होतं, असं दिलशाद सांगतात. याचमुळे एमएचइ इतरांपेक्षा वेगळं होण्यासाठी त्यांनी काही अत्यंत अविश्वसनीय असे निर्णय घेतले.

सियाचीनच्या प्रदेशात भारताचा झेंडा फडकावल्याच्या घटनेला ३५ वर्ष पूर्ण झाली. तो सोहळा आम्ही आयोजित केला. हा कार्यक्रम नेहमीच माझ्या जिव्हाळ्याचा राहिला आहे. हा झेंडा फडकावणारे कर्नल नरेंद्र बुल कुमार यांच्यासोबत ही सहल आम्ही काढली होती. संरक्षण मंत्रालयाची विशेष परवानगी आणि कर्नल नरेंद्र यांचं सहकार्य यामुळेच हे गिर्यारोहन शक्य झालं, दिलशाद आठवण सांगतात. हे सगळं घडवून आणण्यासाठी आणि अन्य कोणीही याचा साधा विचारही करणार नाही, अन्य कोणालाही हे शक्य होणार नाही अशा पद्धतीनं आयोजन करण्यासाठी दिलशाद यांनी प्रचंड कष्ट घेतले.

इतक्या वर्षांच्या सहलींचा असा प्रचंड अनुभव असल्यामुळे एमएचइकडे फोटो आणि व्हिडिओजसाठी अजून खुला न झालेला प्रचंड खजिना आहे. या सगळ्याचा दिलशाद यांना आता योग्य उपयोग करायचा आहे. आतापर्यंत त्या हिमालयाबाबत विशिष्ट उद्दीष्टांसाठी असलेल्या माहितीपटांवर काम करायच्या. गेल्यावर्षी प्रसिद्ध गिर्यारोहक रेनहोल्ड मेसनेर आणि त्याच्या स्वीस युनिटसाठी एमएचईने हिमालयातील शूटिंगचं आयोजन केलं होतं. आता त्यांना या कामाचं व्यवसायात रुपांतर करायचं आहे. यातून चित्रीकरण मोहीम आणि माहितीपट तयार करणाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा त्यांचा उद्देश आहे. गंगेचं उगमस्थान असलेल्या उत्तराखंडमधील गोमुख ते कोलकातामधील गंगासागरपर्यंत गंगेच्या संपूर्ण प्रवाहामार्गाचं गिर्यारोहण करणाऱ्या ८ महिला गिर्यारोहकांच्या ६० दिवसांच्या मोहीमेचं त्यांनी आयोजन केलं आहे.


दिलशाद या स्वत: एक गिर्यारोहक आहेत. त्यांनी एव्हरेस्टच्या तळाशी असलेल्या कॅम्पपर्यंत त्यांनी गिर्यारोहण केलंय. लोकांच्या मते ईबीसी हा गिर्यारोहणाचा सारांश असला तरी दिलशाद यांच्या मते गिर्यारोहणातील धाडस अनुभवण्याच्या संधी भारतात जास्त आहेत. एव्हरेस्ट बेसकॅम्प हा गिर्यारोहणाचे योग्य मार्ग, स्वच्छता असलेला भाग आहे, असं दिलशाद म्हणतात. पण भारतीय गिर्यारोहण मार्गात याचा अभाव असल्याचं त्या सांगतात. यासाठी त्या उत्तराखंडमधील गढवालमधल्या कौरी पास ट्रेकचं उदाहरण देतात. याची उंची फक्त १२ हजार ५०० फूट असली तरी तो आव्हानात्मक आहे असं त्या सांगतात. हा भाग वातावरणानुसार बदलत असतो. एकदा तर संपूर्ण डोंगरच वाहून गेला होता. त्यामुळे पाच मिनिटांच्या अंतरासाठी अडीच तास लागल्याचं त्या सांगतात. त्यांच्यासोबत असलेल्या मार्गदर्शकांना अपरिचित मार्गानं ध्येय गाठावं लागलं होतं असंही त्या सांगतात. याच आव्हानात्मक परिस्थितीमुळे दिलशाद यांना गिर्यारोहणाचं आकर्षण वाटतं. पण भारतातील या आव्हानात्मक गिर्यारोहण मार्गांचा प्रसार होत नसल्याबद्दल त्यांना वाईट वाटतं. पण नाराज न होता त्यांनी आता भारतीय गिर्यारोहण क्षेत्रासाठी कंबर कसली आहे.

लेखक – इंद्रजित चौधरी

अनुवाद- सचिन जोशी