‘वीमेन कॅब’ – महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणाचा दुहेरी प्रवास

 ‘वीमेन कॅब’ – महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणाचा दुहेरी प्रवास

Thursday October 29, 2015,

4 min Read

एक महिलेचे एकटीने घराबाहेर पडणे, प्रवास करणे हे भारतीय समाजात नेहमीच चिंतेचा आणि चर्चेचा विषय राहिलेला आहे. मग ती महिला ऑफिसच्या कामानिमित्ताने घराबाहेर पडलेली असो किंवा मग शाळा किंवा महाविद्यालयातून घरी परतत असो. आज सुद्धा भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात महिलांना तिचे हक्काचे स्वातंत्र्य मिळत नाही ही खूपच दु:खाची गोष्ट आहे. आजही भारतात महिला आपले सशक्तीकरण आणि सक्षम बनण्यासाठी समाजाशी संघर्ष करत आहेत. तथापि, बहुतेक शहरांमध्ये महिलांच्या प्रवासासाठी साधने तर उपलब्ध आहेत, परंतु ती सुरक्षेच्या दृष्टीने किती योग्य आणि सक्षम आहेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दिल्ली सारख्या मोठ्या मेट्रो शहरांमध्ये देखील कॅब ड्रायव्हर्स कडून महिलांसोबत गैरवर्तनाचे प्रकार घडलेले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेतली तर महिलांना देखील आता कॅब ड्रायव्हरच्या नोक-या देण्याची नितांत गरज आहे हे सहज लक्षात येते. अशी व्यवस्था निर्माण केली तर महिलांना रोजगार देखील उपलब्ध होईल आणि प्रवास करणा-या महिलांच्या मनात सुरक्षेची भावना देखील निर्माण होईल. ‘ओला कॅब’, ‘उबर कॅब’ सारख्या कितीतरी कंपन्या सध्या बाजारात पूर्वीपासून कार्यरत आहेत. परंतु, या कंपन्यांच्या वर्गामध्ये आता ‘वीमेन कॅब’ ही कंपनी सुद्धा सहभागी झाली आहे. ‘वीमेन कॅब’ची स्थापनाच मुळी महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेली आहे. ‘वीमेन कॅब’ ची सुरूवात करणा-या ‘आरटूआर’ या कंपनीचे संस्थापक शैलेंद्र सिंह म्हणतात, “ बहुतेक महिला ड्रायव्हर्स या गरीब, पीडित, शोषित आणि ज्यांच्याकडे जगण्याच्या साधनांचा अभाव आहे अशा वर्गातूनच आलेल्या आहेत. जर महिलांना संधी मिळाली तर त्या कोणतेही कर्तृत्व गाजवण्यासाठी सक्षम आहेत असा संदेश देणारे उदाहरण समाजासमोर ठेवून या महिला समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.”


image


पार्श्वभूमी

१२ वर्षे भारतीय सैन्य दलात आपली सेवा दिल्यानंतर शैलेंद्र यांनी ‘आयबीएम’ आणि ‘सत्यम’ सारख्या आयटी कंपन्यांमध्ये चांगल्या पदांवर काम केले. ७ वर्षे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर शैलेंद्र यांनी सामाजिक उद्योगाच्या क्षेत्रात काम करणे सुरू केले. ‘आयआयटी’मध्ये दोन वर्षांचा कोर्स करत असताना महिलांना रोजगार मिळेल अशी कंपनी आपण स्थापन करावी असा विचार त्यांच्या डोक्यात आला. सैन्य दलातील एक माजी अधिकारी असल्यामुळे समाजासाठी काहीतरी करावे अशी शैलेंद्र यांची कायम इच्छा होती. याच विचारांसोबत महिलांना सक्षम बनवण्याच्या दिशेने शैलेंद्र यांनी हे पाऊल उचलले. महिलांची सुरक्षा आपल्या दृष्टीसमोर ठेऊन शैलेंद्र यांनी आपल्या या विचारांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच ‘वीमेन कॅब’ ची सुरूवात झाली.

महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीरपणे विचार करत शैलेंद्र म्हणतात, “ जर एखादी महिला एकटी बाहेर पडली तर ती सुरक्षितपणे आपल्या घरी परतू शकेल एवढी सुरक्षा आपला समाज महिलांना देतो का ? जर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे तर मग महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याच्या दिशेने पुढाकार घेणे आवश्यक होऊन बसते.”

महिला कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करु शकते असा विश्वास ‘आरटूआर’ टीमला वाटतो. आणि याच कारणामुळे ‘वीमेन कॅब’ ही कंपनी महिलांच्या विचारांसोबत पुढे वाटचाल करण्यात यशस्वी झाली आहे.

image


मार्गातील आव्हाने

नोव्हेबर २०११ मध्ये शैलेंद्र यांनी ‘वीमेन कॅबची’ स्थापना केली. ‘वीमेन कॅब’साठी शैलेंद्र यांनी ३५ महिलांना दोन वर्षे प्रशिक्षण दिले. त्यानंतर मग ऑक्टोबर २०१४ मध्ये त्यांनी या महिलांच्या सोबतीने ‘वीमेन कॅब’ला बाजारात लाँच केले. शैलेंद्र सांगतात की या महिलांना केवळ ड्रायव्हिंगशी संबंधीतच विस्तृत माहिती दिली जात नाही, तर त्यांना ‘सॉफ्ट स्कील्स’ बाबत देखील प्रशिक्षित करण्यात आले आहे. सध्या या प्रशिक्षणाचा कालावधी दोन महिन्यांचा आहे. त्यानंतर मग कोणतीही महिला ‘वीमेन कॅब’सोबत जोडली जाते. या दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर दर आठवड्याला प्रत्येक महिला ड्रायव्हरला सहा तासांचे टेक्निकल प्रशिक्षण आणि रिफ्रेशर प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासोबतच त्यांना वागणूकीबाबतचे (बिहेवियरल) प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. ‘मारूती ड्रायव्हिंग स्कूल’च्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली महिला ड्रायव्हर्सचे हे प्रशिक्षण दिले जाते. समाजाच्या एका निश्चित झालेल्या स्वरूपाला आपण आपल्या या पुढाकाराने सकारात्मक दिशेने नक्कीच बदलू शकतो असे शैलेंद्र यांना वाटते.


महिला कॅब ड्रायव्हर्सची सुरक्षा

ड्रायव्हिंगसोबत महिलांना गाडीचे मेंटेनन्स, ग्राहकांशी संवाद, संपर्क आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. महिलांना आपली सुरक्षा करता यावी म्हणून माजी सैनिकांकडून त्यांना स्वसंरक्षणाचे डावपेच शिकवले जातात. इतकेच नाही, तर त्यांना संकटाच्या काळी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंबंधी विशेष प्रशिक्षण देखील दिले जाते. यामुळे संकटाच्या काळी आपल्या स्वत:च्या सुरक्षेबरोबरच आपल्या प्रवाशांची सुरक्षा करण्यात देखील त्या सक्षम असाव्यात हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर ‘वीमेन कॅब’ ही कंपनी रिटेल ग्राहकांना देखील आपली सेवा देते. प्रत्येक कॅबला ‘जीपीएस’ सिस्टमसोबत जोडण्यात आलेले आहे. यामुळे कॅबला २४ तास ट्रॅक करणे शक्य होते. यासोबत कॅबमध्ये एक ‘पॅनिक’ बटन देखील असते. संकटाच्या काळी हे बटन दाबल्यावर कंट्रोल रूमला तात्काल ‘अलर्ट’ची सूचना मिळते.

निवड प्रक्रिया

‘वीमेन कॅब’मध्ये नोकरी मिळवण्यासाठी एखादी महिला कमीत कमी दहावी पर्यंत तरी शिकलेली असणे आवश्यक आहे. या सोबत तिचे वय २१ वर्षांपेक्षा कमी नसावे. ‘वीमेन कॅब’मध्ये नोकरी करणारी महिला किंवा मुलगी समाजातील अतिशय निम्न स्तरातून आलेली असते. या कंपनीत नोकरी सुरू केल्यानंतर मग आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यात ती सक्षम बनते. ‘आरटूआर’च्या या ‘वीमेन कॅब’मध्ये ६५ प्रशिक्षणार्थी महिला काम करत आहेत. ‘वीमेन कॅब’ बंगळुरूमध्ये आपल्या ५ कॅबची सेवा देत आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत ही संख्या २५ पर्यंत नेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. २०१५ हे वर्ष संपेपर्यंत आणखी तीन मोठ्या शहरांमध्ये ‘वीमेन कॅब’ सेवा सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. या योजनेद्वारे जवळजवळ १०० कॅब्स सोबत प्रशिक्षित महिला जोडल्या जाणार आहेत.