वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरून वाणी भाटियांनी उद्योजकतेत निर्माण केले नवे स्थान

0

केवळ १७ वर्षांच्या वयात वाणी भाटिया यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. त्यांच्या आईला आपल्या कुटुंबाच्या व्यवसायाबाबत काही एक माहिती नव्हती. तशात वाणी यांचा भाऊ ही अगदी १३ वर्षांचा अल्पवयीन होता. या पार्श्वभूमीवर वाणी छोट्याशा वयात फार मोठ्या व्यक्तीगत संकटांच्या भोव-यात अडकल्या होत्या.

अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या आईच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले पाहिजे याची जाणीव त्यावेळी त्यांना झाली. यानंतर आपल्या वडिलांचा व्यवसाय पुन्हा एकदा उभा करता यावा या उद्देशाने त्या आपल्या आईला मदतही करत होत्या आणि आणि प्रोत्साहित सुद्धा करत होत्या. आत्तापर्यंत त्यांची आई केवळ एक गृहिणी म्हणूनच घरातील जबाबदा-या पार पाडत आली होती. यामुळे आपल्या वयाच्या ४२ व्या वर्षी आपल्या कौटुंबिक व्यवसायात ताळमेळ बसवणे त्यांना फारच कठीण वाटत होते. परंतु सुरूवातीच्या आव्हानांना पार केल्यानंतर त्यांच्या आईला व्यवसायातील बारकावे हळू हळू समजू लागले होते.

हा काळ वाणी यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा काळ होता. कारण याच काळात त्यांना लोकांबाबत शिकायला मिळाले. शिवाय संकटांच्या काळात लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची संधी सुद्धा त्यांना मिळाली.


Gritstones.com या लोकप्रिय फॅशन पोर्टलच्या संस्थापिका वाणी म्हणतात, “ आपण आपल्या चांगल्या दिवसांकडून कधीही काही शिकण्यात यशस्वी होत नाही. परंतु जीवनात आलेली वाईट वेळ आपल्याला बरेच काही शिकवते. निश्चित हा परिक्षेचा काळ होता आणि यातून मी काहीतरी शिकण्यात यशस्वी झाले.”

एक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या आणि दिल्लीमध्ये वाढलेल्या वाणी यांनी दिल्लीमध्येच आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कॉमर्सची पदवी घेतल्यानंतर ‘इंटरनॅशनल कॉलेज ऑफ फॅशन’ या संस्थेतून फॅशनमध्ये त्यांनी मास्टर्सची पदवी संपादन केली.

फॅशन कोर्स करत असताना वाणी यांना ‘सर्वाधिक सर्जनशील डिझायनर’ची उपाधी मिळाली. या उपाधीने गौरव झाल्यानंतर वाणी आपला स्वतंत्र व्यापार करण्याच्या उद्देशाने पुढे निघाल्या. वाणी सांगतात, “ माझ्या आईने मला एमबीए करता यावे म्हणून काही पैसे जमा करून ठेवले होते. परंतु हे पैसे व्यापारात गुंतवण्यासाठी तिला तयार करण्य़ात मी यशस्वी झाले. तथापि, ती सुरूवातीला तयार झाली नाही. परंतु मी तिचे मन वळवण्यात यशस्वी झाले.” सुरूवातीला त्यांनी काही स्थानिक ब्रॅड्ससाठी काम करणे सूरू केले. त्यानंतर त्यांना व्हिडिओकॉन सारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली.

सुरूवातीची आव्हाने पार केल्यानंतर व्हिडिओकॉन सारख्या मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कामाची पारख केली. त्यानंतर त्यांना कॉर्पोरेट ऑर्डर्स मिळू लागल्या. इथून मग त्यांना यश मिळणे सुरू झाले. लवकरच मग त्या ‘बीबा’, ‘गुड अर्थ’ आणि ‘युनायटेड कलर्स ऑफ बेनेटन’ सारख्या मोठ्या ब्रँड्ससोबत काम करू लागल्या.

वाणी सांगतात, “ एक वेळ अशी आली, जिथे मला जाणवले की या ब्रँड्ससोबत काम करण्याच्या जागी मी माझ्या स्वत:च्या ब्रँडसाठी काम करणे सुरू केले पाहिजे. आणि अशा प्रकारे २०११ या वर्षी ‘ग्रिटस्टोन्स’ (Gritstones) ची स्थापना झाली. त्या काळात ई-कॉमर्सचा बाजार गतीने आपले पाय पसरत होता आणि आम्ही या ऑनलाईन बाजाराचा फायदा उचलण्यासाठी आमचा ब्रँड ऑनलाईन आणण्याचा निर्णय घेतला." अतिशय साधी सुरूवात करत त्यांनी सुरूवातीला खूप छोटी-छोटी पावले उचलली. परंतु काळाबरोबर पुढे जात जात, विस्तार करत त्यांनी गुजरातमधील अहमदाबादेत आपले पहिले ऑफलाईन स्टोअर उघडले.


खूपच छोट्या स्तरावरून आपल्या कामाची सुरूवात करत वाणी यांनी एक खूपच मोठा पल्ला गाठण्यात यश मिळवले. सध्या त्यांच्या कपड्यांचे दोन ब्रँड ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. एक म्हणजे Gritstones (ग्रिटस्टोन्स) आणि दुसरा Vvoguish (वोगुईश). यांपैकी ग्रिटस्टोन हा पुरूषांसाठी पोशाख तयार करणारा ब्रँड आहे, तर दुसरा महिलांचे पोशाख तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ग्रिनस्टोनचे कपडे मंत्रा, जंबोग, फ्लिपकार्ट आणि मेजन सारख्या जवळजवळ सर्व ऑनलाईन पोर्टल्सवर उपलब्ध आहेत, तर दुसरीकडे वोगुईशचे कपडे होमशॉप १८ सारख्या टीव्ही चॅनेल्सवर उपलब्ध आहेत.

सर्जनशील प्रतिभेची मालकीण असलेल्या वाणी सांगतात की भविष्यात जर त्या स्टायलिश पोशाख तयार करत नसतील तर त्या टीव्ही मालिका किंवा चित्रपटांच्या दिग्दर्शनात स्वत:ला तपासून बघत असतील

आता जरी त्या एक यशस्वी महिला व्यावसायिक असल्या तरी देखील खूपच छोट्या वयात आपल्या वडिलांना गमावण्याचे मोठे दु:ख आणि पश्चाताप त्यांना होतो. या व्यतिरिक्त एक महिला असल्याने या पुरूषप्रधान व्यवसायात त्यांना स्वत:चे आपले एक वेगळे नाव निर्माण करण्यासाठी खूप अडचणींचा समाना करावा लागला. वाणी म्हणतात, “ आपल्यावर उत्कृष्ट कामगिरी करण्याचा दबाव तर नेहमी असतोच, परंतु या व्यतिरिक्त स्वत:ला वेळोवेळी सिद्धही करावे लागते. कारण लोक सहजासहजी तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवत नाहीत. अशा परिस्थितीत आपला स्वत:चा व्यवसाय उभा करणे, तसेच वित्त व्यवस्था सांभाळत संपूर्ण व्यापाराची काळजी घेणे हे माझ्यासमोर एक मोठे आव्हान होते.”

आपल्या व्यावसायिक आघाडीवर सुद्धा वाणी या वर्षाच्या अखेरीला आपल्या कॅटलॉगचा विस्तार करण्याच्या उद्देशाने त्यात ‘डेनिम’, ‘ब्लेझर’ आणि ‘समर कोट’ सारख्या ब्रँड्सचा देखील समावेश करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. या व्यतिरिक्त त्या फ्रँचाईजी मॉडेलचा प्रयोग करत, तसेच इतर काही ऑफलाईन स्टोअर्स उघडून व्यापार आणि ब्रँड्सच्या नावाचा विस्तार करण्याची योजनाही तयार करत आहेत.

व्यक्तीगत आघाडीवर पाहिले तर त्या एका व्यवसायाचे यशस्वीपणे संचलन करत आहेत. त्यांचे वडील जर आज जिवंत असते, तर त्यांची प्रगती पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असता या जाणीवेने त्या अतिशय आनंदी होतात. त्या नेहमीच आपल्या वडिलांशी मनाने जोडलेल्या राहिल्या आणि आपले वडिल आपल्या मुलांच्या कार्यकर्तुत्वाच्या माध्यमातून जिवंत रहावेत या उद्देशाने काही करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. आणि खरोखर त्या असे करण्यात यशस्वी झाल्या आहेत. त्यांचे बंधू धीरज भाटिया हे या कंपनीचे दूसरे संचालक आहेत.

वाणी भाटीया यांना चित्रपट पाहण्याचा छंद आहे. जेव्हा त्यांना मोकळा वेळ मिळतो तेव्हा त्यांना चित्रपट पाहणे खूप आवडते. या व्यतिरिक्त आणखी एक काम करायला त्यांना खूप आवडते. ते म्हणजे इतरांच्या समस्या सोडवणे, त्यांच्या परिस्थितीचे विश्लेषण करणे, समस्यांचे मूळ काय आहे याचा शोध घेणे आणि त्यावर योग्य उपाय शोधून काढणे या कामात त्या व्यस्त असतात. प्रश्नांकडे पाहण्या ऐवजी त्या उत्तरे शोधण्यात यशस्वी होतात ही त्यांच्या विश्लेषणात्मक बुद्धीची कमाल आहे.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe