फॅशन डिझाईनिंगमधील करिअर सोडून अॅसिड पीडितांच्या मदतीसाठी वाहून घेतलेली रिया शर्मा

0

एक मुलगी जी इंग्लंडला गेली होती फॅशन डिझायनर बनण्यासाठी, मात्र जेव्हा ती शिक्षण घेऊन परतली तेव्हा तिने नेमकं तिच्या कामाच्या उलट काम केलं जे आज कित्येक महिलांना दिलासा देत आहे. दिल्लीपासून जवळ असलेल्या गुडगावमध्ये रहाणारी रिया शर्मा आज अॅसिड हल्ल्याच्या शिकार झालेल्या महिलांसाठी लढाई लढत आहे, त्यांच्यावर उपचार करवते आहे, त्यांना कायदेशीर लढाई लढण्यास मदत करत आहे आणि विशेष म्हणजे अशा महिला स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्या यासाठी प्रयत्नशील आहे.

रिया शर्माने आपले शालेय शिक्षण गुडगावच्या एका शाळेत पूर्ण केले. त्यानंतर ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करण्यासाठी ब्रिटनला गेली. मात्र दोन वर्षांनंतरही त्यामध्ये तिचे मन लागेना. तिसऱ्या वर्षी तिचे प्रोफेसर तिला म्हणाले की ती जर अशाच प्रकारे अभ्यास करत राहिली तर त्याचे परिणाम चांगले असणार नाहीत. बोलता-बोलता प्रोफेसरांनी रियाला विचारले की ती काय करु इच्छिते? ज्याच्या उत्तरार्थ रियाने सांगितले की ती महिलांच्या अधिकारासाठी काम करु इच्छिते. पण असं काय काम तिने करावं याबाबत तिला काहीच माहिती नाही. तेव्हा तिला प्रोफेसर म्हणाले की घरी जा आणि याबाबत माहिती जमा कर.

रियाने घरी येऊन महिलांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर बलात्कार, अॅसिड हल्ले यासारख्या विषयांवर रात्रभर माहिती जमवली. तिचे मन हे जाणून घेऊन खूप दुःखी झाले की कसे लोक मुली आणि महिलांवर अॅसिड फेकून देतात. त्या भयानक त्रासाला सहन केल्यानंतर कसे त्या मुली आणि महिलांचे जीवन घराच्या चार भिंतींमध्ये सीमित राहते. त्यानंतर तिने अॅसिड हल्ल्यातील पीडितांविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला जास्त माहिती मिळाली नाही. कारण इंटरनेटवर एका ठिकाणी अॅसिड पीडितेची एक कहाणी लिहिलेली होती तर दुसऱ्या ठिकाणी तिच्याच विषयी दुसरीच कहाणी लिहिलेली होती. दुसऱ्या दिवशी तिने तिच्या प्रोफेसरना अॅसिड हल्ल्यातील पीडितांचे काही फोटो दाखवले आणि म्हणाली की ती त्यांच्यासाठी काम करु इच्छिते. तिचे प्रोफेसर खुप खुश झाले आणि त्यांनी रियाला व्हिडिओ कॅमेरा देऊन सांगितले की तू भारतात जाऊन या मुद्द्यावर डॉक्युमेंटरी तयार कर.

इथे येऊन रियाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अनेक मुलींच्या मुलाखती घेतल्या. या दरम्यान तिची कित्येक अॅसिड हल्ल्याच्या बळी ठरलेल्या मुली आणि महिलांशी मैत्री झाली. ती त्यांच्या छोट्या-छोट्या गरजा पूर्ण करु लागली. अशा प्रकारे तिचे अॅसिड पीडितांशी भावनिक बंध जुळले. ज्यामुळे तिच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल येऊ लागला आणि हळूहळू अशा लोकांची मदत करणे तिची आवड बनली. एकदा ती डॉक्युमेंटरी बनविण्यासाठी बंगळुरुच्या सरकारी रुग्णालयात गेली. तिथले दृश्य पाहून ती हादरली. तिने पाहिले की रुग्णालयात जमीन, भिंत, पलंग सगळीकडे रक्त आणि मांसाचे तुकडे पडलेले होते. रिया हे पाहून सुन्न झाली की तिथे डॉक्टरही पुरेसे नव्हते आणि इतर कर्मचारी, जसं की वॉर्ड बॉयला या सर्व गोष्टींमुळे काही फरक पडत नव्हता. त्या मांसाच्या तुकड्यांमधूनच लोक ये-जा करत होते.


रियाने सांगितले, “ते पाहून मी निर्णय घेतला की आता आपले आरामदायी आयुष्य सोडून या लोकांची मदत करायची आणि त्यांच्या हक्कासाठीची लढाई लढायची. जेव्हा की सुरुवातीला माझ्या या निर्णयामुळे माझ्या आई-वडिलांना थोडी काळजी वाटू लागली, मात्र लवकरच त्यांनी माझ्या निर्णयात मला साथ देण्याचा निर्णय घेतला.”

अशा प्रकारे तिने एप्रिल २०१४ मध्ये दिल्लीमधून आपल्या कामाची सुरुवात केली आणि आपली संस्था ‘मेक लव्ह नॉट स्केअर’च्या माध्यमातून अॅसिड पीडितांची मदत करण्याचा विडा उचलला. याद्वारे ती अॅसिड पीडितांना प्रत्येक प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न करते. रिया त्यांच्या औषध आणि शिक्षणासंबंधित गरजा तसेच त्यांची न्यायालयीन लढाई लढण्यापासून त्यांना भरपाई मिळूवून देण्यापर्यंत सर्व बाबतीत मदत करते. एका अॅसिड पीडितेला तिने ६०  हजार डॉलरची मदत करुन तिला न्यूयॉर्कच्या सर्वात चांगल्या फॅशन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.

रियाने अॅसिड ऍटॅक पीडितांच्या पुनर्वसनासाठी एक सेंटरसुद्धा सुरु केले आहे. जिथे ती अॅसिड पीडितांना व्यावसायिक आणि कौशल्य प्रशिक्षण देते. त्याचबरोबर त्यांना पुन्हा आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी त्यांचे काऊंसलिंगही करवते. जेणेकरुन त्या समाजातील मुख्य प्रवाहाशी जोडल्या जातील. मुलींना ती इंग्रजी आणि कॉम्प्युटरचे बेसिक ट्रेनिंग देते. त्यानंतर जी ज्या क्षेत्रामध्ये जाऊ इच्छिते त्यानुसार त्यांची मदत केली जाते. रिया या लोकांसाठी नृत्य, गायन, मेकअपच्या कार्यशाळा आयोजित करते. मेकअप आर्टिस्टच्या मदतीने ती अॅसिड पीडितांना मेकअपने चेहरा कसा झाकायचा ते शिकवते.

सध्या देशभरातील जवळपास ५५  अॅसिड पीडित तिच्याशी जोडलेल्या आहेत. ज्यामध्ये ६  महिन्याच्या मुलीपासून ६५  वर्षांपर्यंतच्या महिलांचा समावेश आहे. तिच्या संस्थेबरोबर सर्वात जास्त उत्तर प्रदेशातील मेरठ आणि लखनौच्या अॅसिड पीडित मुली आणि महिला जोडलेल्या आहेत. या वर्षाच्या शेवटापर्यंत देशाच्या इतर भागातही अशी सेंटर्स सुरु करण्याची त्यांची योजना आहे. अॅसिड पीडितांशी संबंधित काम पहाण्यासाठी त्यांची पाच सदस्यीय कोर टीम आहे. त्याचबरोबर देशाच्या विविध भागात त्यांचे स्वयंसेवकही आहेत, जे त्यांना त्यांच्या कामात मदत करतात.

रिया आणि तिची टीम ह्यूमन राईट लॉ नेटवर्कच्या सोबत काम करते, ज्यांचे देशभरात स्वतःचे वकील असतात. ज्या केसमध्ये पीडितांचे स्वतःचे वकिल नसतात तिथे रिया आणि तिची टीम ऍसिड पीडितांना वकिल उपलब्ध करुन देते. त्याशिवाय त्यांच्याकडे 2-3 वकिल आहेत जे त्यांना कायदेशीर कामांमध्ये सल्ला देतात. आपल्या समस्यांबाबत सांगताना ती सांगते की सर्वात मोठी समस्या आहे न्याय मिळण्यात होणारा उशीर, कारण त्यामुळे पीडितांना नुकसान भरपाई आणि त्यांचा हक्क वेळेवर मिळू शकत नाही. यामुळे त्यांच्यामध्ये निराशा उत्त्पन्न होते. रिया सांगते की एवढं मिळविल्यानंतरही काही लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत आणि म्हणतात की हे काम करण्यासाठी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे वय खूप कमी आहे. असं असतानाही रिया या कामाला स्वतःची आवड मानते. ती सांगते की, “जसं आईचा तिच्या मुलावर खूप जीव असतो, त्याचप्रमाणे हे काम माझ्यासाठी सर्व काही आहे आणि मी माझा सर्व वेळ याच कामाला देते.”

वेबसाइट : www.makelovenotscars.org

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

पाच अॅसिड हल्ला पीडित महिलांची ताजमहालाच्या सौंदर्याला टक्कर देणारी कामगिरी ‘शिरोज हँगाऊट’!

'रेड लाईट' भागातील चकाकणारे रंग बदलण्याचा प्रयत्न ‘कट–कथा’

गावपातळीवर प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर करण्यासाठी धडपडणाऱ्या मोरमबाई तंवर

लेखिका – गीता बिश्त
अनुवाद – अनुज्ञा निकम