क्वर्कस्मिथः ज्वेलरी स्टार्टअपद्वारे चांदीला नवी झळाळी आणण्याचा बत्रा भगिनींचा प्रयत्न 

0

महिलांना मनापासून प्रिय असलेली गोष्ट म्हणजे दागिने... त्यातही हिरा हा तर त्यापैकी बहुतेकींचा ‘बेस्ट फ्रेंडच’ असतो. पण दिव्या बत्रा यांच्याबाबत मात्र हे म्हणता येत नाही.. म्हणजे त्यांना दागिन्यांची आवड नाही, असे मुळीच नाही, पण त्यांचे मन जडलंय ते हिऱ्यावर नाही तर चांदीवर.... चांदीचे हटके दागिने त्यांना खऱ्या अर्थाने आकर्षित करतात. त्यातच दिव्या या व्यवसायाने ज्वेलरी डिजाईनर आहेत... त्यामुळे आपल्या आवडीचे दागिने तयार करणे त्यांच्यासाठी मुळीच कठीण नाही. पण आपल्यासारखीच आवड असणाऱ्या महिलांनाही आपल्या या कौशल्याचा फायदा करुन देण्याच्या उद्देशानेच सप्टेंबर, २०१४ त्यांनी क्वर्कस्मिथची (Quirksmith) स्थापना केली. या उपक्रमात त्यांना मोलाची साथ मिळाली ती त्यांच्याप्रमाणेच चांदीच्या दागिन्यांची चाहती असणाऱ्या धाकट्या बहिणीचीच अर्थात प्रग्या बत्रा यांची....

क्वर्कस्मिथच्या दागिन्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यावे, ही तर या बहिणींची स्वाभाविक इच्छा होतीच, पण त्याचबरोबर चांदीच्या दागिन्यांची खास आवड असणाऱ्या महिलांना एकत्र आणण्याचाही त्यांचा मानस होता. या दोन बहिणींचे नाते मोठे अनोखे आहे. त्यांचे एकमेकींवर नितांत प्रेम तर आहेच, पण त्याचबरोबर त्या खऱ्या अर्थाने परस्परपूरक आहेत आणि त्यामुळे एकत्र येऊन काहीतरी सुरु करण्याची त्यांची नेहमीच इच्छा होती.


“ तुम्ही एक खूपच सुंदर कानातले घातले आहे, याची जाणीव तुम्हाला तेंव्हा होते, जेंव्हा एखादी स्त्री तुमच्याशी नाही, तर तुमच्या कानाशीच बोलत रहाते (अर्थात, तुमच्याशी बोलत असताना ती एकटक तुमच्या कानातल्याकडे पहात असते) आणि क्वर्कस्मिथचे प्रत्येक उत्पादन नेमके हेच साध्य करताना दिसते. आम्ही अनेकदा आमची स्वतःची डीजाईन्स घालून बाहेर पडतो आणि अगदी हीच भावना घेऊन घरी परततो,” त्या दोघीही आपले अनुभव मोकळेपणाने सांगतात.

नात्याचा बंध

या दोन्ही बहिणींचा जन्म आग्रा येथे झाला. बत्तीस वर्षीय दिव्या दोघींमध्ये थोरली... दिव्या या व्यवसायाने ज्वेलरी डिजायनर असून, अकरा वर्षांहून जास्त काळ त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत.

एनआयएफटीमधून, २००४ मध्ये आपली पदवी मिळविल्यानंतर, लगेचच त्यांनी आम्रपालीसाठी डिजाईन्स करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर जयपूर येथील पर्ल ऍकॅडमी येथे एक वर्षभर शिकविण्याचा अनुभवही त्यांची गाठीशी आहे. त्यांनी लंडन फॅशन वीक, २००७ च्या निमित्ताने फॅशन डिजाईनर मनीष अरोरा यांच्यासाठी दागिन्यांचे डिजाईन केले होते. तर २००८ पासून त्या फॅब ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, या हिऱ्यांच्या दागिने उत्पादकासाठी डिजाईन स्टुडीयो चालवित आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात त्या मुंबई सोडून बंगळुरु येथे गेल्या.

३१ वर्षीय प्रग्या यांनी आयआयटी दिल्ली येथून आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले तर आयएनएसईएडी येथून २०१२ मध्ये एमबीए केले. सुरुवातीला त्यांनी बेन ऍन्ड कंपनीबरोबर काम केले असून सध्या त्या इनमोबी मध्ये स्ट्रॅटेजी आणि ऑपरेशन्स या विभागात काम करत आहेत. वीकएन्डला अर्थात शनिवार-रविवारी त्या क्वर्कस्मिथचे काम करतात. हे दिवस जणू त्यांनी क्वर्कस्मिथलाच समर्पित केले आहेत.

जयपूर ते बंगळुरु – मार्गातील आव्हाने

दिव्या या डिजाईनचे काम करतात तर प्रग्या विपणनाची जबाबदारी सांभाळतात. क्वर्कस्मिथ हे बंगळुरु स्थित असले तरी त्यांचे कारागिर हे मात्र जयपूर येथूनच काम करतात. आपल्या आम्रपालीच्या दिवसांपासून दिव्या या कारागिरांबरोबर काम करत आहेत. त्यामुळे डिजाईनचे सर्व काम जरी बंगळुरुलाच होत असले, तरी सर्व कच्चा माल आणि प्रत्यक्ष उत्पादन हे जयपूरमधील एका छोट्या काराखान्यातूनच होते.

दोन वेगवेगळ्या शहरांमधून चालणारे काम आणि शनिवार-रविवारी क्वर्कस्मिथसाठी द्यावा लागणारा वेळ, ही या बहिणींसमोरील प्रमुख आव्हाने होती. त्या त्यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर बंगळुरुमध्ये भरणाऱ्या बहुतेक फ्लि मार्केट ( जसे की सोल सांटे, किश्च मंडी यांसारख्या आठवड्यातून एकदा भरणाऱ्या बाजारांतून) आपल्या मालाची विक्री करतात. त्याचबरोबर बंगळुरुमधील ‘टीमरी’ या दुकानामध्येही त्यांच्या दागिन्यांची विशेष कलेक्शन उपलब्ध आहेत.

पण चांदीच्या दागिन्यांसाठी ग्राहक मिळविणे हे त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान होते. “ तुम्हाला सामान्य फॅशन ज्वेलरीसाठी मिळाणाऱ्या बाजारपेठेएवढी ही बाजारपेठ मोठी नाही आणि येथे किंमतीही थोड्या जास्त असतात. पण आमच्याकडे सध्या असलेले मर्यादीत ग्राहक हे आपल्या अनेक मागण्या घेऊन पुन्हापुन्हा आमच्याकडेच येत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे,” दिव्या सांगतात.

पाठींब्यातून मिळणारी ताकद

त्यांच्या उत्पादनाला मिळत असलेले प्रेम आणि कौतुक यातूनच त्यांना हे उत्पादन अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणखी मेहनत घेण्याची प्रेरणा मिळत आहे.

जेंव्हा दिव्या त्यांच्या डिजाईन स्टुडिओसाठी लोकांची नेमणूक करतात, तेंव्हा ते काय घेऊन येतात हेच त्यांच्यासाठी महत्वाचे असते. “ माझ्या टीममधील सगळेच जण काही ज्वेलरी डिझायनर्स नाहीत, मात्र ते जे कोणते काम हाताळतात, ते काम मात्र त्यांना उत्तमपणे जमते,” दिव्या सांगतात.

भविष्यातील योजना

यंदाच्या वर्षी क्वर्कस्मिथसाठी या बहिणींनी मोठी योजना आखली आहे. आगामी काही महिन्यांमध्ये विविध ई-कॉमर्स पोर्टल्सच्या माध्यमातून विक्री करण्याची त्यांची इच्छा आहे. “ विविध प्रकारच्या ऑनलाईन पोर्टल्सची चाचणी घेण्याची आमची योजना आहे आणि आमच्या ग्राहकांसाठी कोणते पोर्टल सर्वोत्तमपणे काम करते ते आम्हाला यातून पहायचे आहे. त्याशिवाय आमच्या स्वतःच्या संकेतस्थळाचे कामही सुरु आहे. तर पुढच्या महिन्यापर्यंत पेर्निया’ज पॉप अप शॉपबरोबर आम्ही लाईव्हही जाणार आहोत,” दिव्या सांगतात.

२०१६ च्या अखेरपर्यंत त्यांच्या सध्याच्या दरमहा उत्पादनात चौपट वाढ करण्याचा क्वर्कस्मिथचा मानस आहे. पुढील दोन महिन्यांत या बहिणी त्यांच्या कारखान्याचा विस्तार करणार आहेत आणि अधिक कारागिरांना बरोबर घेणार आहेत. दिल्ली आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्येही आपला खास ब्रॅंड ग्राहकांपर्यंत पोहचविण्याच्या हेतूने तेथील विविध प्रदर्शनांमध्ये क्वर्कस्मिथ सहभागी होणार असल्याने, आता या शहरांमध्येही या ब्रॅंडचे दागिने उपलब्ध होऊ शकतील.

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

त्या तिघींच्या स्वप्नपूर्तीची गोष्ट : ‘अवर स्टोरी – बिस्ट्रो ऍन्ड टी रुम’

‘मोहा’ची दुनिया

ʻ'कैंडिड्ली कचूअर'ʼ इशिता यांचा छंदापासून व्यवसायापर्यंतचा प्रवास

लेखक – तन्वी दुबे

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन