लक्ष्य २०१७ – ‘प्रभाग तुमचा नगरसेवक तुमचा’

लक्ष्य २०१७ – ‘प्रभाग तुमचा नगरसेवक तुमचा’

Monday August 08, 2016,

5 min Read

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या जगात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून आपण ज्या शहरात, विभागात, प्रभागात राहतो तेथील नगरसेवकांच्या कामाच्या माहितीपर्यंत सारे काही क्षणात संगणकावर उपलब्ध होऊ शकते. हे करण्यासाठी अनेक सर्च इंजिन, संकेतस्थळं किंवा मोबाईल अॅप उपलब्ध होत आहे. हे सारे उपलब्ध करून देणारा एखादा व्यक्ती किमान संगणकीय शिक्षण नसतानादेखील केवळ छंद आणि आवड म्हणून एखादे संकेतस्थळ निर्माण करू शकतो यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. पुण्यातील पिपरी-चिंचवड येतील उमेश सरोदे या सफाई कामगार असलेल्या घरातील तरुणाने असेच एक अभिनव संकेतस्थळ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.

image


 युवर स्टोरी मराठीला या स्वतःच्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी त्याने संपर्क साधला आणि सांगितले की युवर स्टोरी मराठीच्या अनेक प्रेरणादायी कहाण्या वाचता-वाचता मला आपणही अशा प्रकारे काहीतरी नाविन्यपूर्ण करू शकतो याची जाणीव झाली.

जानेवारी २०१७ नंतर राज्यातील महानगरपालिका, जिल्हापरिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुकींच्या तयारीसाठी राजकीय पक्ष, माध्यमं, आणि समाज माध्यमं मोठ्या प्रमाणावर कामाला लागली आहे. परंतु गाव, गल्ली आणि वस्तीत राहणाऱ्या सर्वसामान्य मतदाराला केवळ मतदानाच्या दिवशी काही मिनिटे मतदान यंत्रावर उपलब्ध असलेल्या उमेदवारांची तपशीलवार माहिती मिळावी आणि त्यांना योग्य उमेदवार निवडता यावा जो त्यांच्या दृष्टीने खरोखर विभागातील कामे करण्यास सक्षम असेल असे त्यांना वाटते. उमेश यांनी सांगितले की, फेसबुक आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक उमेदवारांनी आपण केलेल्या आणि न केलेल्या कामाची माहिती देताना लक्ष्य २०१७ असे वारंवार म्हटल्यानंतर खरोखरच या उमेदवारांनी काय कामे केली आहे आणि ते सांगतात ते कितपत सत्य आहे हे मतदारांना कळले पाहिजे असा त्यांनी विचार केला. उमेश सांगतात की, जर मला हा प्रश्न पडू शकतो तर अनेकांना हा प्रश्न पडत असेल मग त्यांना ही माहिती कशी उपलब्ध करून देता येईल याचा शोध घेताना ‘लक्ष्य २०१७’ या संकेतस्थळाचा विचार सुचला.

image


काय आहे लक्ष्य २०१७ – ‘प्रभाग तुमचा नगरसेवक तुमचा’

www.lakshya2017.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकांना आपल्या मोबाईल वर कॉम्पुटर वर काही क्षणात त्यांच्या प्रभागातील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची माहिती मिळू शकणार आहे, तसेच यावरून ते प्रत्येक उमेदवारांना त्यांच्या माहितीनुसार, केलेल्या विकासकार्यानुसार मत सुद्धा देऊ शकतील. लोकांना उमेदवारांची वैयक्तिक माहिती, सामाजिक माहिती, राजकीय माहिती, त्यांनी प्रभागात केलेले उपक्रम, विकासकार्य, फोटो, व्हिडीओ याद्वारे पाहता येऊ शकेल तसेच सर्व उमेदवारच्या कार्याची माहिती पाहून आपले अमुल्य मत कोणाला द्यायचे हे ठरवता येऊ शकेल.

आणि या माध्यमातून उमेदवारांना सुद्धा त्यांची माहिती त्यांची कार्य विविध उपक्रमांची माहिती प्रभागातील मतदारांपर्यंत पोहचविता येऊ शकेल आणि मतदारांच्या कल्पना, त्यांची मते आणि प्रभागातील लोकांशी संवाद साधू शकतात. तसेच या माध्यमातून स्वतःच्या आवाजातून सुद्धा ते मतदारांशी संवाद साधू शकतात.

image


केवळ उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेश याला कौटुंबिक परिस्थितीमुळे प्रस्थापित शिक्षण घेता आले नाही आणि घरकामापासून रोजीरोटी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या नोकऱ्या करत तो लहानाचा मोठा झाला. बालपणीच वडिलांचे निधन झाल्याने सफाई कामगार असलेल्या आईचा त्यांना एकमेव आधार आहे. त्यामुळे शिक्षणात प्रगती करण्याची संधी मिळाली नाही. ते सांगतात की, त्यावेळी मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. आणि बारावी नंतर वाणिज्य शाखेत असलेला अभ्यास करणे अवघड झाल्याने शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागले. असे असले तरी शिक्षणाची पार्श्वभूमी नसलेल्या सफाई कामगार घराण्यातील या तरुणाने आपल्यातील चिकित्सक, अभ्यासू आणि हरहुन्नरी वृत्तीच्या बळावर आयटी कंपनीत सहाय्यकाचे काम करता करता केवळ उत्सुकतेपोटी लोक संगणकावर काय काम करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि संगणकावर आपणही काहीतरी काम करावे ही ओढ मनात निर्माण झाली त्यातूनच मग एमएससीआयटी आणि संगणक जुळवणीचे लहान मोठे अभ्यासक्रम त्याने पूर्ण केले. त्यातून संगणकाची जुळवणी करणे, हार्डवेअर साॅफ्टवेअर याबाबतचे बारकावे त्यांना अवगत होत गेले. आज वयाच्या २९ व्या वर्षी नोकरी सांभाळून सोशल मिडीयाच्या मदतीने माहिती गोळा करून ती एका संकेतस्थळाच्या माध्यमातून माहिती संकलित करून ती मतदाराला जाणाऱ्या मतदाराला पोचवण्याचा उपक्रम उमेश यांनी हाती घेतला आहे. आपली माहिती प्रामाणिक असावी. त्यात सत्यता आणि वस्तुस्थिती याचे आकलन असावे आणि कोणत्याही राजकीय पक्षाला फायदा करून देण्याचा त्यामागे उद्देश नसावा अशी प्रामाणिक भावना हे काम करताना उमेश यांच्या मनामध्ये आहे.

image


हे सारे काम करत असताना त्यातील खाचखळगे, अडीअडचणी, आर्थिक, सामाजिक, तांत्रिक जबाबदारी याचे भान त्यांना आहे. आपल्या या संकेतस्थळाचा योग्य तोच वापर व्हावा यासाठी आवश्यक काळजी घेताना ते दिसत आहे. या संकेतस्थळामध्ये अनेक तांत्रिक सुधारणा करता येऊ शकता. गूगल सारख्या सर्च इंजीनला ते जोडले गेले पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील आहे. कोणताही तांत्रिक, आर्थिक मार्गदर्शनाचा पाठींबा नसताना केवळ सर्वसामान्य मतदारांना त्यांच्या शहर, विभाग प्रभागातील उमेदवाराची यथायोग्य माहिती पोहोचावी हा लक्ष्य २०१७चा प्रामाणिक हेतू आहे. युवर स्टोरी मराठी वरून प्रेरणा घेतल्याचे सांगणाऱ्या उमेश यांनी युवरस्टोरीला आपल्या उपक्रमाची माहिती दिली यातून त्यांच्या ह्या सामान्य भासणाऱ्या धडपडीतील मोठेपण दिसून येते. 

image


आज निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक दर्जा आणि स्वायत्तता असणाऱ्या संस्था मतदार जाणीव जागृतीसाठी लोकशाहीच्या संवर्धनासाठी जे मोलाचे काम करत आहे, त्यात उमेश सारख्या सामान्य कुटुंबातील धडपड्या तरुणाचे हे लक्ष्य २०१७ देखील नक्कीच दखलपात्र ठरेल यात शका नाही. मतदाराने योग्य त्याच उमेदवाराची निवड करावी. जे उमेदवार निवडून आल्यावर देश, शहर आणि समाजाला योग्य दिशेनेच घेऊन जातील याची तंत्रज्ञानाच्या मदतीने उमेश यांच्या सारखा एक सामान्य माणूस देखील कशी काळजी घेऊ शकतो याचे हे बोलके उदाहरण आहे.

आपले हे संकेतस्थळ जानेवारी २०१७ नंतर पूर्णत्वाने लोकांच्या सेवेत रुजू होईल यासाठी धडपडणाऱ्या उमेश यांच्या या प्रयत्नाला युवर स्टोरीचा सलाम. 

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

व्यवसाय वृद्धीसाठी मागणीनुसार वेबसाईट आणि मोबाईल अॅप सेवा ‘ClickExcel.com’

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरसावले २० वर्षीय तरुण शेतकरी विनायक हेगाणा

मित्रांचे मित्र शोधून देणारं दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांचं नवीन अॅप 'व्हेअरअबाउट'

    Share on
    close