राजस्थानमधील एका छोट्याश्या गावातील अशिक्षित महिला सोलर प्लेट्स बनविण्याचे प्रशिक्षण देऊन संपूर्ण जग करित आहेत प्रकाशमान 

1

असे म्हटले जाते की जर योग्य दिशेने प्रामाणिकपणे काम केले जात असेल तर त्याचे फळ तर चांगले मिळतेच. त्यामध्ये असफल होण्याची टक्केवारी खूपच कमी आहे. अशातच जर संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी असेल तर मग बघायलाच नको. यशस्वी होण्याची पूर्ण खात्री. किंबहुना म्हटले पाहिजे की असे काम केवळ यशस्वीच नाही तर सार्थकही होते.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की राजस्थानमधील एक छोटेसे गाव संपूर्ण जगाला प्रकाशमय करत आहे. तेही अशा महिलांमुळे ज्यांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही. या गावातील अशिक्षित महिला सौर ऊर्जेमध्ये इन्जिनिअरिंग करुन जगभरातून आलेल्या गावातील स्त्रीयांना सौर ऊर्जेचा वापर करुन गावाला प्रकाशमय बनविण्याचे तंत्र शिकवित आहेत. आजीच्या वयाच्या महिलांना सौर ऊर्जेची प्लेट बनवताना आणि सर्किट लावताना पाहून तुम्ही हैराण व्हाल. या ऊर्जा क्रांतीने जिथे गावातील महिलांना जगभरात ओळख मिळवून दिली आहे, तिथे गावातही शहराप्रमाणे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या रस्त्यावरच्या दिव्यांचा झगमगाट पहायला मिळतो.

जयपूरपासून जवळपास १०० किमी अंतरावर असलेले किशनगढमधील तिलोनिया गाव. केवळ दोन हजार लोकसंख्येचे हे गाव बाहेरुन कुठल्याही सामान्य गावासारखेच दिसते. मात्र जगाच्या नकाशावर हे गाव प्रकाश पसरविण्यासाठी ओळखले जाते. खरं तर इथे बुनकर रॉय द्वारा स्थापित सामाजिक संस्था बेयरफुट महाविद्यालय जवळपास ४०  वर्षांपासून कार्यरत आहे. याच बेयरफुट कॉलेजमध्ये २००९  मध्ये सौर ऊर्जेचे प्रोजेक्ट सुरु करण्यात आले होते, ज्यामुळे गावातील महिलांचे आयुष्यच बदलले. या कार्यक्रमात सुरुवातीला या महिलांना प्राथमिक शिक्षण देण्यात आले आणि नंतर त्यांना सौर ऊर्जेचे सर्किट बनविण्याची जबाबदारी देण्यात आली. जेव्हा गावातील महिला या कामात निपुण झाल्या तेव्हा मग त्यांनी बनविलेले सोलर लॅम्प गावांमध्ये विकले जाऊ लागले. तेव्हापासून या गावातील महिलांनी पाठी वळून पाहिले नाही. पाहता पाहता या प्रोजेक्टच्या यशस्वीतेने तिलोनियाच्या महिलांमध्ये एवढा उत्साह भरला की त्या देशभरातून आलेल्या महिलांना सौर ऊर्जेचे तंत्र शिकवू लागल्या. आता तर या गावात वरचेवर तुम्हाला परदेशी महिला पहायला मिळतील. सांगितले जाते की गावात नेहमी तीस ते चाळीस आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि आशियातील दुसऱ्या देशांच्या महिला सौर ऊर्जेचे तंत्र शिकत असतात.

सोलर प्रोजेक्टवर काम करणाऱ्या मोहनी कंवरने (जी आता इथे शिक्षिका आहे) युअरस्टोरीला सांगितले, “बेयरफुटमुळे ह्या गावात या सर्व सुविधा आहेत. आता या गावात वीजेवर नाही प्रत्येक वस्तू सोलारवर चालते.”

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिलोनियातील महिला असो वा परदेशातील महिला, यामध्ये कोणीही दहावी पास नाही. मात्र यांचे इन्जिनिअरिंगचे कौशल्य पाहून सर्वच जण तोंडात बोट घालतील. शिकण्या-शिकविण्यासाठी सर्वात जास्त गरज असते भाषेची. मात्र इथे भाषेचा अडसर येत नाही. रंग आणि इशाऱ्याने या महिला एकमेकांशी संवाद साधून तांत्रिक ज्ञान अवगत करत आहेत. इथे शिक्षिका म्हणून काम करणारी मोहनी कंवर सांगते की कशा प्रकारे आम्ही त्यांना गावात अतिशय आपुलकीने काम शिकवतो. इथे काम करणारी दुसरी शिक्षिका विभा सांगते, “जेव्हा मी येथे आले होते तेव्हा मला काहीच माहित नव्हतं. मी हिंदीही बोलू शकत नव्हते. आज मी इथे शिक्षिका म्हणून काम करते आणि दुसऱ्या महिलांना सौर ऊर्जेचे सर्किट बनवायला शिकवते.”

या केंद्राची संचालिका रतन देवी आधी एक गृहिणी होती. पूर्वी कधी घराबाहेर पाय ठेवला नव्हता. मात्र आज ती जगभरातील महिलांना प्रशिक्षण मिळवून देत आहे. रतनदेवीने युअरस्टोरीला सांगितले, “सूर्याचा हा प्रकाश महिला सबलीकरणामध्ये खूप मोठे योगदान देत आहे. महिला केवळ तंत्र शिकत नाही आहेत, तर पैसाही कमावत आहेत.”

बाहेरुन आलेल्या महिला सौर तंत्राबाबत जाणून घेऊन खुश आहेत. आफ्रिकी देशातून आलेली रोजलीन सांगते, “आमच्याकडे वीज नाही आहे. इथून सौर ऊर्जेचे तंत्र शिकून जाईन तेव्हा सर्वांना सोलर सिस्टीमने लाईट लावणं शिकवेन.” याच प्रकारे वोर्निकाही सांगते, “आमच्या देशांमध्ये स्त्रीया अशा प्रकारचं काम करत नाहीत. पण आम्ही शिकून गेलो तर आम्ही त्यांना शिकवू.”

केवळ परदेशीच नाही इथे बिहार, झारखंड आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या महिलाही सोलर सिस्टीम बनविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. आपल्या नवऱ्याला, मुलांना आणि कुटुंबाला सोडून या महिला सहा महिन्यांसाठी तिलोनिया गावात येऊन राहतात. तिलोनिया गावातील महिला प्रशिक्षण देण्यासाठी दृक-श्राव्य माध्यमाचा वापर करतात.

बिहारच्या बेतिया जिल्ह्यातील उजेमनी गावातील प्रभावती देवी इथे प्रशिक्षण घेण्यासाठी आली आहे. तिच्या गावात वीज नाही आहे. म्हणून पंचायत समितीने तिला इथे पाठविले आहे. चौथी पर्यंत शिकलेल्या प्रभावतीसाठी सोलर विषयी शिकणे सोपे नव्हते. आधी नवऱ्याला आणि घरच्यांना समजावले की सोलरविषयी शिकून येईन तर पूर्ण गावात प्रकाश आणेन आणि यामुळे उत्त्पन्नही वाढेल.

तिलोनिया गावातील बेयरफूट कॉलेजने आजवर अशा जवळपास १००  हून जास्त गावात सोलर लाईटचा प्रकाश पोहचवला आहे, जिथे वीज पोहचणे शक्य नव्हते. तिलोनियामध्ये लोक आपल्या घरांमध्ये आता केरोसिनचा दिवा लावत नाहीत. जरी गावात वीज असली तरी गावात सोलार सिस्टीमवरच जास्त ती कामे होतात. परिस्थिती अशी आहे की गावातच राहून सौर ऊर्जेच्या कामाशी संबंधित महिला जवळपास आठ हजार रुपयांपर्यंत कमवत आहेत. यामुळे घरची स्थितीही सुधारते आहे आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

सौरउर्जेला एक सक्षम पर्याय बनवण्याचा ध्यास

दुर्गम खेडी उजळवणारे अनोखे स्टार्टअप ग्राम उर्जा सोल्यूशन्स

अप-सायकलिंगच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या नव्या वाटेने चालताना...

लेखक – रुबी सिंग
अनुवाद – अनुज्ञा निकम