अंध आणि विकलांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील अंध मार्गदर्शकाला गरज मदतीच्या हातांची

0

राहुल देशमुख.. खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा हुशार, होतकरु मुलगा. दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर भविष्याची स्वप्न रंगवत पुढच्या शिक्षणासाठी राहुल विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात दाखल झाला. मात्र पुण्यातील कुठल्याच हॉस्टेलमध्ये त्याला राहण्यासाठी प्रवेश दिला गेला नाही. कारण होते ते त्याचे अंधत्व. अंध-विकलांगांबद्दल समाजात असलेल्या गैरसमजांमुळे त्यांची क्षमता आणि बुध्दीमत्ता याचा संबंध नेहमीच त्यांच्यातील शारिरीक उणीवेशी लावला जातो आणि सामान्य आयुष्य जगण्याचा त्यांचा हक्क नेहमीच डावलला जातो. अमाप बुध्दीमत्तेच्या राहुल देशमुखबरोबरही हेच घडले. मात्र राहुलने हार मानली नाही. पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर मुक्काम थाटून त्याने फर्ग्युसन कॉलेजमधून आपलं शिक्षणाचं स्वप्न साकार करायला सुरुवात केली. मात्र या प्रवासादरम्यान त्याला आलेले कटू अनुभव त्याला स्वस्थ बसू देईनात. आपल्याबरोबर जे घडले ते आपल्या इतर अंध आणि विकलांग बांधवांबरोबर घडू नये या त्याच्या विचारामधूनच ‘स्नेहांकित’ आणि ‘नॅशनल असोसिएशन फॉर दि वेलफेअर ऑफ फिजीकली चॅलेंज्ड (एनएडब्ल्यूपीसी)’ या दोन संस्था अस्तित्वात आल्या. विशेष म्हणजे १९९९ मध्ये जेव्हा ‘स्नेहांकित’ ही अंधांसाठीची संस्था राहुलने स्थापन केली तेव्हा तो बारावीत शिकत होता आणि त्यानंतर दहा वर्षांपेक्षाही कमी कालावधीत २००८ साली ‘एनएडब्ल्यूपीसी’चीही सुरुवात करण्यात आली. आज या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून राहुल देशमुख यांनी शेकडो अंधांचे आयुष्य उजळविले आहे.


“प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकलांगांना आत्मनिर्भर बनविणे, त्यांना त्यांच्या उणीवांवर मात करण्यास मदत करुन एक सक्षम समाज घडविणे, त्यांना त्यांच्या क्षमतांच्या जोरावर समाजात स्वतःला सिद्ध करण्यासाठी मदत करणे आणि राष्ट्राच्या विकासात महत्त्वाचे योगदान देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करणे हा आमचा उद्देश्य आहे,” असं राहुल देशमुख सांगतात.

हा उद्देश्य साध्य करण्यासाठी संस्थेकडून अंध आणि विकलांगांसाठी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. या प्रकल्पांअंतर्गत दिले जाणारे शिक्षण व सुविधा अंध आणि विकलांगांना मोफत पुरविल्या जातात. “२००३ मध्ये आम्ही खास अंधांसाठी कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर सुरु केलं. केवळ पुण्यातीलच नाही तर राज्यातील अशा प्रकारचं हे पहिलं कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर आहे. आतापर्यंत जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी इथे प्रशिक्षण घेतलं आहे. त्यापाठोपाठ २००९ मध्ये आम्ही अंधांसाठी डिजीटल लायब्ररी हा आणखी एक नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरु केला. या उपक्रमामुळे आता आमचे अंध विद्यार्थी कॉम्प्युटरच्या मदतीने पाठ्यपुस्तके आणि अवांतर वाचनाची पुस्तकेही वाचू शकत आहेत. त्यांचे ह्युमन रिडर आणि ब्रेल लिपीमधील साहित्यावरचे अवलंबित्व यामुळे कमी झाले आहे,” असं राहुल सांगतात.

या संस्थेत अंध आणि विकलांगाच्या कलागुणांनाही वाव दिला जातो. त्यासाठी २०१० मध्ये रिक्रिएशन सेंटर सुरु करण्यात आले आहे. “२०१० मध्येच आम्ही आणखी एक प्रकल्प सुरु केला. प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुके, बहिरे, विकलांग आणि सेरिब्रल पाल्सी व यासारख्या इतर विकारांनी पीडित लोकांना आत्मनिर्भर बनविणे शक्य आहे हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठीही एक विशेष कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर सुरु केले. ज्यामध्ये त्यांना एमएस-ऑफीस, एमएस-सीआयटी आणि डीटीपी हे कोर्स शिकविले जातात,” असं राहुल सांगतात.

ते पुढे सांगतात, “अनेकदा अंध आणि विकलांग मुलं हुशार असूनही केवळ घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ती शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी २०११ मध्ये विशेष शिष्यवृत्ती सुरु केली. दरवर्षी १५० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते.”

गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना आर्थिक आधार दिला असला तरी खेड्यातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अंध मुलांना आपल्याप्रमाणे रहाण्याच्या गैरसोयीला सामोरे जावे लागू नये म्हणून २०१३ मध्ये राहुल यांनी संस्थेमार्फत पुण्यामध्ये अंध मुलांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असलेले ‘चैतन्यविश्व’ हे बॉईज हॉस्टेलही सुरु केले.

संस्थेच्या या विविध प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना या मोफत सुविधांचा फायदा खेड्यातून आलेल्या गरीब आणि होतकरु अंध व विकलांगानाच मिळावा याची दक्षता संस्थेकडून घेतली जाते. “आमच्या प्रकल्पांमधील प्रवेश प्रक्रिया सरकारी प्रवेश प्रक्रियांपेक्षा वेगळी आहे. राज्यभरातील खेड्यापाड्यातील मुलं, ज्यांनी आपले शालेय शिक्षण अंधशाळेमधून पूर्ण केले आहे, ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे, ज्यांना कुटुंबाचा आधार नाही अशा विद्यार्थ्यांनाच आम्ही प्रवेश देतो. फार कमी विद्यार्थी आहेत जे सधन आणि सुशिक्षित कुटुंबामधून आलेले आहेत. त्यांची योग्य मार्गदर्शन आणि करिअर करण्यासाठी आवश्यक सुविधांची गरज लक्षात घेऊन त्यांना इथे प्रवेश देण्यात आला आहे. त्यातही केवळ गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जात नाही. आम्ही इच्छुक विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतो. तो मुलगा भविष्यात खरंच काही करु इच्छितो आहे आणि त्यासाठी त्याची मेहनत घेण्याची तयारी आहे असे वाटल्यास परफॉर्मन्सवर आधारित प्रवेश देतो. त्याचप्रमाणे केवळ अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो असे नाही तर खेड्यापाड्यातील ज्या होतकरु विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहचली नाही, ज्यांना आमच्याबाबत माहिती नाही अशांना शोधून त्यांच्याही आयुष्यात बदल घडविण्याचा आमचा प्रयत्न असतो. मुळात अंध नसलेले, अपघात किंवा आजारामुळे अंधत्व आलेले चाळीशी पार केलेले काही विद्यार्थीही आमच्या संस्थेत आहेत. आज आमचे अनेक विद्यार्थी बँकिंग, टेलिफोन, शिक्षण अशा विविध क्षेत्रात विनासायास उत्तम दर्जाचे काम करत आहेत,” राहुल अभिमानाने सांगतात.

सामान्य मुलांमध्ये वावरत असताना हातावर फ्रेण्डशिप बँण्ड बांधून घेण्याचा अनुभव या शारिरीक उणीव घेऊन जगणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वचितच येत असावा. खरे तर याला सुदृढ माणसाच्या मनातील उणीवा कारणीभूत असतात. मात्र हे छोटे छोटे प्रसंग या विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण करु शकतात. समाजात मिळालेल्या वागणुकीमुळे त्यांच्या मनात निर्माण झालेले न्यूनगंड दूर करण्यासाठी फ्रेण्डशिप डे साजरा करण्याबरोबरच विविध स्पर्धा, बक्षिस समारंभ, यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ ‘एनएडब्ल्यूपीसी’ तर्फे आयोजित केले जातात.

या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी, त्यांचा सर्वांगिण विकास करुन त्यांच्या मनात स्वतःबद्दल सकारात्मक भाव निर्माण करण्यासाठी ‘एनएडब्ल्यूपीसी’द्वारे विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशन कार्यक्रम, इंग्रजी बोलण्याची कार्यशाळा, स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन, योग वर्ग आयोजित केले जातात. याचबरोबर विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणीही केली जाते. विविध सहली आयोजित करुन त्यांना नवनवीन ठिकाणांची माहिती करुन देण्यात येते. रक्षाबंधन, गुरुपोर्णिमा, दसरा, दहिहंडी यासारखे सणवार साजरे करुन अप्रत्यक्षपणे त्यांना आयुष्यातील आनंद टिपायला शिकविले जाते.

आज राहुल देशमुख केवळ या दोन संस्थांचे संस्थापक अध्यक्षच नाहीत तर विकलांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी कार्यरत सामाजिक कल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय समितीचे सदस्यही आहेत. मुळातच बुध्दिमान असलेले राहुल स्वतः उच्चशिक्षित आहेत. पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या आधाराने सुरु झालेला त्यांचा शिक्षणप्रवास बीए (सोशिओलॉजी), एमए(सोशिओलॉजी), एमए(पॉलिटीकल सायन्स), बी.एड, एमएसडब्ल्यू करत एमफील पर्यंत येऊन पोहचला आहे आणि विशेष म्हणजे बारावीत पुणे बोर्डात तिसरा, बीए- पुणे युनिव्हर्सिटीतून चौथा, एमए(सोशिओलॉजी) - पुणे युनिव्हर्सिटीतून पहिला , एमए(पॉलिटीकल सायन्स) - पुणे युनिव्हर्सिटीतून पाचवा अशा कौतुकास्पद निकालासह हे शिक्षण त्यांनी प्राप्त केले आहे. शिवाय अनेक कॉम्प्युटर सायन्सचे कोर्सही त्यांनी केले आहेत. बारावीमध्ये असताना मित्रांच्या विनंतीवरुन त्यांनी पाचवी ते सातवी आणि आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखनावर आधारित ‘मैत्री निबंधाशी’ नावाची दोन पुस्तकेही लिहिली आहेत.

भविष्यात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अंध आणि विकलांग विद्यार्थीनींसाठी वसतीगृह सुरु करण्याची त्यांची योजना आहे. त्याचबरोबर अंध आणि अपंगांना आवश्यक वस्तू आणि उपकरणं एकाच छताखाली मिळावी यासाठी रिसोअर्स सेंटरही सुरु करण्यात येणार आहे.

“संस्थेकडून राबविले जाणारे उपक्रम अंध आणि विकलांग विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करुन दिले जातात. त्यामुळेच या कामासाठी लागणारा पैसा उभा करणं हे आमच्यापुढचं मोठं आव्हान आहे. आजवर हे काम इथे स्वेच्छेने काम करणारे स्वयंसेवक आणि समाजातील सहृदयांच्या मदतीमुळे शक्य होऊ शकलं आहे. हे काम असंच पुढे सुरु ठेवता यावं यासाठी सरकारने आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा आहे. त्याकरिता आम्ही प्रयत्नही केले. मात्र आजवर सरकार दरबारी त्याची दखल घेतली गेली नाही,” असं राहुल खेदाने सांगतात.

राहुल यांना त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल 'आयबीएन 7 बजाज अलायन्झ सुपर आयडॉल पुरस्कार', 'मानवता पुरस्कार', 'सामाजिक गौरव पुरस्कार', 'राष्ट्रगौरव पुरस्कार' यासारखे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरचे एकूण २५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मात्र त्यांच्या कार्याची दखल केवळ पुरस्कार देण्यापुर्ती न घेता समाजातील दानशूर व्यक्तींनी, व्यावसायिकांनी आणि सरकारनेही त्यांना मदतीचा हात पुढे केल्यास समाजात दुर्लक्षिले गेलेले खूप मोठे मनुष्यबळ आत्मनिर्भर होऊन देशाच्या विकासात खारीचा वाटा उचलू शकेल.

युवरस्टोरी वरील यशोगाथा, प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.

वरीलप्रमाणे आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

अंधाने उघडली गरिबांसाठी शिक्षणाचे कवाडे

अंध वाचकांसाठी उमेश जेरे आणि सहकाऱ्यांचे निरपेक्ष कार्य

दोन हजारांपेक्षा जास्त अंधांच्या जीवनात प्रकाश दाखवणा-या मीरा बडवे यांचे ‘निवांत अंधमुक्त विकासालय’!