कामाक्षी सिवरामकृष्णनः सायन ते सिलिकॉन व्हॅली एक अद्भुत प्रवास

कामाक्षी सिवरामकृष्णनः सायन ते सिलिकॉन व्हॅली एक अद्भुत प्रवास

Tuesday April 05, 2016,

7 min Read

अस्सल मुंबईकर असलेल्या कामाक्षी सिवरामकृष्णन यांचे बालपण गेले ते सायनमध्ये... तेदेखील अशा एका दक्षिण भारतीय कुटुंबात, जेथे उच्च दर्जाच्या शिक्षणाला विशेष महत्व होते, खास करुन गणित आणि विज्ञान या विषयांवर तर कुटुंबाचे खास प्रेम.... सहाजिकच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी करणे, हे आपल्या रक्तातच असल्याची जाणीव कामाक्षी यांना सुरुवातीपासूनच होती. आयुष्यात चालून येत गेलेल्या संधीचे सोने करत, कामाक्षी यांनी स्वतःचे वेगळेपण वेळोवेळी सिद्ध करुन दाखविले.

मुंबईत घेतलेले शिक्षण, स्टॅंडफोर्डमधील काम, नासाचे अतिशय हायप्रोफाईल अंतराळ यान न्यू हॉरिझॉन टू प्लुटो यासाठी त्यांनी केलेले काम आणि गुगलमध्ये मिळविलेले यश या सगळ्यामध्ये कदाचित आपल्याला कोणतेच साम्य दिसू शकणार नाही, फक्त एक गोष्ट वगळता... ती म्हणजे, कामाक्षी ज्या ज्या ठिकाणी गेल्या, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी नियमांची चौकट मोडत, प्रस्थापित समजांच्या विरुद्ध जाण्याचे धाडस दाखविले. गंमत म्हणजे “ तुम्ही हे कसे केले?” अशी विचारणा जेंव्हा आपण त्यांच्याकडे करतो, तेंव्हा त्या सहजपणे सांगतात की, “ हे खूपच सोपे आहे. हे करु नकोस, असे कुणीच मला सांगितले नाही.”

कामाक्षी यांच्या मते, पश्चिमेकडील काही अव्वल शैक्षणिक संस्थांशी तुलना करता भारतातील अभियांत्रिकीच्या वर्गातील लिंग गुणोत्तर हे त्यापेक्षा तरी ठीकच असल्याचे त्यांना बऱ्याच प्रमाणात निश्चितपणे वाटते. “याचा अर्थ असा नाही की आपण काही फार मोठा मापदंड घालून दिलेला आहे, पण तरीही भारतातील टक्केवारी किमान दोन अंकी तरी आहे. मात्र मी जेंव्हा माझे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेले, तेंव्हा तर परिस्थिती आणखीच कठीण झाली,” त्या सांगतात.

मुंबईमधून पदवीपूर्व पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, कामाक्षी इन्फॉर्मेशन थेअरी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी स्टानफोर्डला गेल्या – नावातच उल्लेख असल्याप्रमाणेच हा विषय सैद्धांतिकच असल्याचे त्या सांगतात.

“ माझ्या क्षेत्रातील लोक हे बहुतेक करुन शैक्षणिक संस्थांमध्ये तरी जातात किंवा वॉल स्ट्रीटवरील आर्थिक बाजारात संख्यात्मक ट्रेडींग हाताळू लागतात. पण मला मात्र नेहमीच माहित होते, की मला एक उच्च परिणाम साधणारी व्यक्ती बनण्याची इच्छा आहे. मी कारकिर्दीचा मार्ग निवडला तोच मुळीच नियमात बसणारा नव्हता,” त्या सांगतात.

त्यांनी जो मार्ग निवडला होता, त्या मार्गावरुन जाणाऱ्या स्त्रियांचे फारच थोडे आदर्श समोर होते. त्यावेळी इन्वेस्टमेंट बॅंकर्सकडून त्यांना भरभरुन येणाऱ्या ऑफर्स या आपल्यापैकी कोणालाही भुरळ पाडतील, अशाच होत्या, पण, या चक्राची केवळ एक आरा होण्यापेक्षा अधिक काही तरी करण्याची कामाक्षी यांची नेहमीच इच्छा होती.

चाकोरीबाहेरील काहीतरी कळण्याची त्यांची ही तळमळच त्यांना ऍडमॉबपर्यंत (AdMob) घेऊन गेली. त्यावेळी एक स्टार्टअप असलेल्या या कंपनीमध्ये त्या आघाडीच्या शास्त्रज्ञ होत्या आणि मशीन लर्निंग स्टॅकच्या कल्पनेवर त्यांचे काम सुरु होते. याबाबत खूपच उत्सुकता वाटल्याने आम्ही त्यांच्याकडून याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

“ मी पदवीधर झाले, त्या काळात मोठ्या कंप्युटींग इन्फ्रास्ट्रक्चरचा जणू उद्रेकच झाला होता – प्रचंड डेटा – माझ्यासारखी पार्श्वभूमी असलेल्यांसाठी नवीन विद्याशाखेचा उदयही होत होता. ऍडमॉबमध्ये जेंव्हा मी पहिल्यांदा सुरुवात केली, तेंव्हा ऑनलाईन जाहिरात हे माझ्यासाठी खूपच नवीन होते, आणि मोबाईल जाहिरांतीबद्दल तर विचारुच नका. याचा अशा प्रकारे विचार करा – निरीक्षणे नोंदवा – आणि तंत्रज्ञान निर्मितीचा प्रयत्न करा – हो, या आधीच्या निरिक्षणांच्या आधारावरच मी पुढील निरक्षणे नोंदवू शकते. हे सर्व कदाचित अगदी मुलभूत तत्वांच्या आधारे संचालित असेल – पण ते तयार करण्यामध्ये अतिशय गुंतागुंतीचे गणित आणि अल्गोरीदम्स असतात आणि खूप जास्त सूचक यंत्रणा.. माझे लक्ष्य होते ते वापरकर्त्यांना जाणून घेण्याचे आणि त्यांना जाहिरातीत गुंतून रहाण्यासाठी अनुकूलता निर्माण करण्याचे. आकडेवारी आणि युजर थिअरीजचा वापर करुन अल्गोरीदम विकसित करण्याचे मार्ग माझ्याकडे आहेत, जेणे करुन क्लिक किंवा संवादाच्या माध्यमातून ग्राहकांच्या प्रतिक्रियेचा अंदाज वर्तविता येतो,” त्या सांगतात.

image


कामाक्षी यांचे ऍडमॉबबरोबर असणे आवश्यक होते कारण त्या त्यांच्याबरोबर एक नवीन दृष्टीकोन घेऊन आल्या – जो गुगल्स किंवा ऍपल्समधील कामाच्या शैलीपेक्षा वेगळा... त्याशिवाय त्यांची वृत्ती अशी होती की, एक महिला म्हणून त्यांच्या प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्या मुळीच विचलित होत नसत. “ जेंव्हा मी पहिल्यांदा येथे आले, त्यावेळी त्या टीममध्ये मी एकटीच महिला होते. स्टार्टअप्स या बहुतेकदा अशा लोकांना आकर्षित करतात, जे खूपच महत्वाकांक्षी आहेत, एक प्रकारे दुसऱ्या कंपन्यांमध्ये चपखलपणे बसू शकत नाहीत आणि ज्यांना काही परिणाम साधायचा आहे, सर्जनशील व्हायचे आहे आणि व्यावसायाच्या आकांक्षा आहेत,” त्या सांगतात.

मात्र एकूणच हे क्षेत्र पुरुषप्रधानच आहे. “ तो एकप्रकारचा बंधुभावच असतो आणि अनेक बायका या वागणूकीमुळे यापासून दूर जातात. पण, माझे व्यक्तिमत्वच असे आहे, की मला यामुळे काहीच फरक पडत नाही. मी माझे अस्तित्व दाखवून देण्यास आणि प्रभाव पाडण्यास शिकले आहे,” त्या सांगतात.

कामाक्षी पीएचडी करत असतानाच त्यांचा प्रबंध हा एका मोठ्या विश्वासाठीही खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरु लागला होता. त्या ज्या तंत्रज्ञानावर काम करत होत्या त्या तंत्रज्ञानाचा वापर नासाच्या 'न्यू हॉरीझॉन्स' या अतिशय दूरवरच्या अशा प्लुटोवर जाणाऱ्या अंतराळ मोहिमेत करण्यात आला.

“ त्या वेळी नासाचा हा प्रकल्प किती महत्वाचा आहे, याची जाणीव मला झाली नाही. नासाने बांधणी केलेले ते सर्वात महागडे यान होते. त्यामध्ये सात महत्वाच्या प्रयोगांचा समावेश होता – त्यापैकी एक होते आरईएक्स – अर्थात हा रेडीओ विज्ञान प्रयोग होता. यामध्ये या यानातून प्लुटोच्या पृष्ठभागावर रेडीओ सिग्नल्स पाठविण्यात येणार होते आणि या लाटेच्या विवर्तनामधून त्या पृष्ठभागाची वैशिष्ट्ये आणि त्याचबरोबर वातावरणाविषयीही बरीच माहिती मिळणार होती. यानामध्ये असलेली चिप, जी या सिग्नल्स गोळा करत होती आणि ते तीन अब्ज मैल अंतरावरील अवकाश स्थानकामध्ये पाठवित होती, मात्र हे करुनही मोहिमेच्या शेवटपर्यंत पुरु शकेल एवढी उर्जा त्यामध्ये शिल्लक होती. मात्र प्लुटोपर्यंत जाणे याचा अर्थ असा होता, की तुम्ही अशा एका चिपबद्दल बोलत आहात, जिचे डिजाईन अशा प्रकारे करण्यात आले आहे, ज्यात कमीत कमी उर्जेचा वापर केला जाईल,” त्या सांगतात. त्यावर त्यांनी एक नवीन अल्गोरिदम बनविले आणि अशी एक चिप तयार केली, जी त्या ग्रहाबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहचवेल, ज्याच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्नचिन्ह होते.

image


या कामातूनच त्यांना मर्यादीत वेळ, पैसा आणि संसाधनांच्या मदतीनूच समस्या सोडविण्यास शिकविले आणि शून्यातून सुरुवात करण्यास सक्षम बनविले. जरी त्या केवळ योगायोगानेच उद्योजक बनल्या असल्या, तरी ड्रॉब्रीजच्या रुपात त्यांचे स्वतःचे कुशल तंत्रज्ञान तयार करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि या कंपनीने पुढे अमेरिकेतील महिलांनी चालविलेल्या सर्वाधिक वेगवान प्रगती करणाऱ्या आयएनसी ५००० मध्ये स्थान मिळविले.

कॅलिफोर्नियातील सॅन मटेओ मध्ये बस्तान बसविलेल्या कामाक्षी या सध्या अधिक गुंतागुंतीचे अल्गोरीदम्स तयार करण्याचे काम करत असून, त्याद्वारे वापरकर्त्यांचा ऑनलाईन जाहिराती आणि त्याचबरोबर स्मार्टफोन्स, टॅबलेटस्, लॅपटॉप्स, इत्यादींवरील संवाद अधिक अभ्यासपूर्ण होण्यास मदत होईल. ड्रॉब्रीजला त्या वापरकर्त्याने मोबाईलवर जाहिरात पाहिली आहे का ते समजेल आणि त्याचबरोबर हे देखील समजेल की प्रत्यक्ष खरेदी ही कदाचित वापरकर्त्यासाठी सोयीच्या असलेल्या आणखी दुसऱ्याच उपकरणावरुन करण्यात आली आहे.

त्याशिवाय, ड्रॉब्रीजची ग्राहकांचा असा एक निनावी डेटाबेस तयार करण्याची इच्छा आहे, ज्यामुळे विक्रेत्यांना त्यांची ओळख कळणार नाही, मात्र त्यांचे प्राधान्यक्रम आणि आवडी मात्र समजू शकतील. “माझे इंटरनेट हे तुमच्या इंटरनेटपेक्षा कसे वेगळे आहे, यावर इंटरनेटचे भविष्य आहे. माझे अनुभव, माझा मजकूर हा माझ्या गरजांना पूर्ण करण्यासाठीच तयार केलेला असेल,” त्या सांगतात.

“ मी नेहमीच माझ्या नवऱ्याला गंमतीने म्हणते, की माझ्या शाळेपासून ओळखीच्या असलेल्या अशा अगदी कमी महिला आहेत, ज्यांच्याबरोबर माझे व्यावसायिक समीकरण आहे किंवा ज्यांच्याबरोबर मी कामाविषयी बोलू शकते. अनेक कारणांसाठी त्यांनी काही पर्याय निवडले आहेत आणि कामाक्षी यांच्या आयुष्यातील दिवस हा मी ओळखत असलेल्या कोणासारखीच्याच आयुष्यातील दिवसासारखा नाही,” त्या सांगतात.

“ पण आता मला याची सवय झाली आहे. एखाद्या खोलीत प्रवेश केल्यावर तेथील एकमेव महिला असणे – टेक फोरम्स, गुंतवणूकदारांच्या बैठका – सगळ्यांचे डोळे माझ्यावरच रोखले असल्यासारखे मला वाटते. जर तुम्ही चांगले केलेत, तर तुमचे वेगळेपण दिसते, पण जर तुम्ही वाईट केलेत तर तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. असं म्हणता येईल की तुम्हाला संशयाचा फायदा मिळू शकत नाही, तुम्हाला तेथे सगळ्यांचा विश्वास कमवावा लागतो,” त्या सांगतात.

पण तंत्रज्ञान क्षेत्रात इच्छुक असणाऱ्यांना माझा सल्ला आहे की, कठीण प्रसंगातही अस्वस्थ होऊ नका. बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच केल्या जातात, ज्या कठीण असतात. पण ते स्वीकारा. त्याशिवाय हे लक्षात ठेवा की यश हे केवळ एकाच्याच बळावर मिळत नाही. योग्य टीम उभारा आणि योग्य तो पाठींबा मिळवा. आणि जर व्यावसायिक बनल्यावर तुम्ही धोका पत्करण्याची तयारी ठेवली नाहीत, तर ती तुमची घोडचूक ठरेल. व्यवसाय चालविणे म्हणजे लाखो छोटेछोटे धोके एकत्र करणे आहे. तुम्हाला ज्या सगळ्याचा शेवटी अभिमान वाटेल, अशा गोष्टी या धोके यशस्वी ठरल्यानेच, तुम्ही साध्य करु शकाल,” त्या सांगतात.

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित :

बंगळुरु ते धारावी, टेसरॅक्टच्या यशस्वी प्रवासाची गोष्ट... 

बदलांना वाव आहे, इच्छाशक्ती हवी : जेसिका टैंजेल्डर

'गेमिंग' विश्वात पुरुषांच्या मक्तेदारीला मात देणाऱ्या : अनीला अँद्रादे

लेखक – बिंजल शाह

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन